सजीवांच्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत आदिकेंद्रकी व एकपेशीय सजीवांचा समावेश होतो. या सजीवांना जीवाणू (बॅक्टेरिया) म्हणतात. १८६६मध्ये एर्न्स्ट हाइन्रिख हेकेल या वैज्ञानिकाने मोनेरा ही संज्ञा वापरली. जीवाणू हे सूक्ष्मदर्शी असून पृथ्वीवर सर्वत्र तसेच सजीवांच्या शरीरात आढळतात. निसर्गात ते गरम पाण्याचे झरे, समुद्रतळाला असलेल्या ज्वालामुखीच्या उगमस्थानी, आम्लीय मातीमध्ये, बर्फाखाली तसेच वाळवंटात अशा प्रतिकूल परिस्थितीतही वाढतात.
जीवाणू हे एकपेशीय सजीव असून त्यांमध्ये पेशीपटल, पेशीभित्तिका आणि संपुटिका असे स्तर आतून बाहेर या क्रमाने असतात. जीवाणूमध्ये केंद्रक प्राथमिक स्वरूपाचे असून त्याला केंद्रकाभ म्हणतात. अन्य सृष्टीतील सजीवांच्या पेशीतील केंद्रकाभोवती पटल असल्यामुळे त्यांच्यातील केंद्रक स्पष्ट दिसते. मात्र जीवाणूंच्या केंद्रकाभोवती असे पटल नसते. त्यांच्या पेशीमध्ये अंगठीच्या (वेटोळ्याच्या) आकाराचे डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल) रेणूपासून तयार झालेले एकच गुणसूत्र असते. काही जीवाणूंमध्ये पेशीद्रव्यात डीएनए रेणू अनियमितपणे विखुरलेले असतात. तसेच पेशीद्रव्यात रायबोसोम, मिसोझोम्स व प्लाझमिड ही पेशीअंगके असून या अंगकांनाही पटल नसते. मात्र त्यात तंतुकणिका, गॉल्जी यंत्रणा इ. पेशीअंगके नसतात. काही जीवाणूंमध्ये हरितलवके असतात. यांखेरीज पेशीद्रव्यात पुटिका असून त्यांमध्ये बहुशर्करा (ग्लायकोजेन), नायट्रोजन, सल्फर (गंधक) इ. पदार्थ साठलेले असतात. हालचालीसाठी जीवाणूंना कशाभिका (फ्लॅजेला) आणि झलरिका (पीली) असतात. त्यांच्यात ऑक्सिश्वसन, विनॉक्सिश्वसन आणि ऑक्सिविनॉक्सिश्वसन घडून येते. जीवाणूंमध्ये अलैंगिक (द्विखंडन) व लैंगिक (संयुग्मन) प्रजनन घडून येते.
मोनेरा सृष्टीचे वर्गीकरण आर्कीबॅक्टेरिया आणि यूबॅक्टेरिया या दोन संघांत केले जाते.
संघ आर्कीबॅक्टेरिया : यांना आदिजीवाणू किंवा आद्यजीवाणू असेही म्हणतात. ते प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. पेशीभित्तिका लवचिक असते. त्यांचे पुढील तीन प्रकार केले जातात : उष्ण अधिवासी, मिथेन अधिवासी आणि लवण अधिवासी.
(१) उष्ण अधिवासी जीवाणू : गरम पाण्याचे झरे, वाळवंट व समुद्रतळाशी असलेल्या ज्वालामुखीच्या उगमस्थानी हे जीवाणू आढळतात. उदा., पायरोलोबस फ्युमेरी. (२) मिथेन अधिवासी जीवाणू : रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या आतड्यात हे जीवाणू असतात. उदा., मिथेनोबॅक्टेरियम ब्रँटी. (३) लवण अधिवासी जीवाणू : हे मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात असतात. उदा., हॅबॅप्रिकम सलायनम.
संघ यूबॅक्टेरिया : यांना खरे जीवाणू असेही म्हणतात. ते निसर्गात सर्वत्र वाढतात. पेशीभित्तिका दृढ असते. पोषण, आकार आणि रंजकद्रव्य चाचणीला प्रतिसाद या बाबींनुसार त्यांचे प्रकार केले जातात.
पोषण : या प्रकारात स्वयंपोषी आणि परपोषी असे दोन गट करतात.
(अ) स्वयंपोषी यूबॅक्टेरिया : हे स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांचे प्रकाशसंश्लेषी आणि रसायन विघटनकारी असे प्रकार आहेत.
(१) प्रकाशसंश्लेषी यूबॅक्टेरिया : त्यांच्यात असलेल्या हरितद्रव्याच्या मदतीने ते स्वत:चे अन्न तयार करतात. उदा., नॉस्टॉक आणि ॲनाबिना. (२) रसायन विघटनकारी यूबॅक्टेरिया : हे नायट्राइट, नायट्रेटे, अमोनिया इ. रसायनांचे विघटन करतात. उदा., लेजिओनेला, सेलेनोमोनास.
(आ) परपोषी यूबॅक्टेरिया : परजीवी, मृतोपजीवी आणि सहजीवी यूबॅक्टेरिया असे त्यांचे गट करतात.
(१) परजीवी यूबॅक्टेरिया : हे अन्नासाठी आश्रयींवर अवलंबून असल्यामुळे ते आश्रयींना घातक असतात. उदा., रिकेट्सिया क्विंटाना (खंदक ज्वराचा जीवाणू), मायक्रोबॅक्टेरियम लेप्री (कुष्ठरोगाचा जीवाणू), साल्मोनेल्ला एण्टेरिका, क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी (धनुर्वाताचा जीवाणू). (२) मृतोपजीवी यूबॅक्टेरिया: हे सजीवांच्या मृत शरीरावर वाढतात आणि त्यांचे विघटन घडवून आणतात. उदा., झायमोमोनास ॲसिटोबॅक्टर. (३) सहजीवी यूबॅक्टेरिया : हे आश्रयींवर वाढताना आश्रयींसाठी उपकारक ठरतात. उदा., एश्चेरिकिया कोलाय.
आकार : या प्रकारात जीवाणूंचे आकार वेगवेगळे असतात. त्यानुसारही त्यांचे वर्गीकरण केले जाते.
(अ) गोलाणू : हॅलोकॅाकस सेडिमनीकोला; (आ) दंडाणू : बॅसिलस सेरियस, एश्चेरिकिया कोलाय;
(इ) मळसूत्री : व्हिब्रिओ कॉलरी ; (ई) तंतुमय : स्पिरिलियम, मायरस स्ट्रेप्टोमायसिस.
रंजकद्रव्य चाचणीला प्रतिसाद: (अ) काही जीवाणूंवर क्रिस्टल व्हायोलेट हे रंजक टाकल्यास जीवाणूंच्या पेशीभित्तिकेचा रंग जांभळा होतो. अशा जीवाणूंना ग्रॅम-पॉझिटिव्ह जीवाणू म्हणतात. उदा., मायक्रोबॅक्टेरियम. (आ) काही जीवाणूंच्या पेशीभित्तिकांवर या रंजकाची क्रिया घडून येत नाही. अशा जीवाणूंना ग्रॅम-निगेटिव्ह जीवाणू म्हणतात. उदा., एश्चेरिकिया कोलाय, साल्मोनेल्ला एण्टेरिका, रिकेट्सिया क्विंटाना.
पहा : जीवाणू.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.