एक ख्रिस्ती धर्मपंथ. ईजिप्तमधील कॉप्ट्स व मोनोफिझाइट्स यांसारखाच पण रोमन कॅथलिक आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स या चर्चशी संबंध नसलेला असा हा एक जुना ख्रिस्ती धर्मपंथ आहे. सुरुवातीस या पंथाचे अनुयायी सिरिया व इराक या देशांमध्ये प्रामुख्याने होते. म्हणूनच ‘सिरियन ऑर्थोडॉक्स (वा जॅकोबाइट) चर्च’ या नावानेही हा पंथ ओळखला जातो. संत जेम्स हे आपल्या पंथाचे संस्थापक असल्याचा दावा जरी या पंथाचे लोक करीत असले, तरी सहाव्या शतकातील इडिसाचे बिशप जेकब बॅराडी (इ.स. ४९०—५७८) हेच ह्या पंथाचे संस्थापक असण्याची जास्त शक्यता आहे. सु. ५४३ मध्ये जेकब यांची तुर्कस्तानात इडिसाचे बिशप म्हणून नेमणूक करण्याबाबत सम्राट जस्टिनियन याची पत्नी राणी थिओडोरा ही मोनोफिझाइट पंथाचीच असल्यामुळे तिने मध्यस्थी केली. त्यानंतर ते मोनोफिझाइट पंथाचे प्रमुख नेते झाले.

सेंट जॉर्ज जॅकोबाइट सिरियन चर्च, केरळ

ह्या पंथाचे अनुयायी मुख्यत्वे इराक, भारत व सिरिया या देशांत आढळतात. टर्की, लेबनन, जॉर्डन व अमेरिका येथेही ते थोड्याफार प्रमाणात आहेत. ह्या पंथाची सामूहिक उपासना (लिटर्जी) सिरियाक भाषेत आहेत. अँटिऑकचा प्रेट्रिआर्क हा त्यांचा सर्वोच्च धर्मप्रमुख.

ईजिप्तचे ‘कॉप्टिक चर्च’ स्वत:ला जॅकोबाइट चर्चचाच (पंथाचाच) भाग समजतात. संत मार्क यांनी कॉप्टिक चर्चची स्थापना केली, असे एका परंपरेनुसार मानले जाते. या पंथाचा एका महत्त्वाच्या तत्त्वाबाबत ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चशी मतभेद आहे. येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण व्यक्तित्वात त्याच्या दैवी व मानवी स्वभावाचा मिलाफ झालेला आहे, असा सिद्धांत इ. स. ४५१ च्या खाल्सेडॉन कौन्सिलमध्ये स्वीकारण्यात आला होता. ‘मोनोफिझाइट्स’ व ‘नेस्टोरियन’ ह्या मतप्रणालीच्या लोकांनी ह्या सिद्धांताला विरोध केला. त्यांच्या मतानुसार येशूचे व्यक्तित्व एकाच दैवी स्वभावाचे असून त्यात दैवी स्वभाव व मानवी स्वभाव असा भेद करता येत नाही.

ईजिप्तचे ‘कॉप्टिक चर्च’ स्वत:ला जॅकोबाइट चर्चचाच (पंथाचाच) भाग समजतात. संत मार्क यांनी कॉप्टिक चर्चची स्थापना केली, असे एका परंपरेनुसार मानले जाते. या पंथाचा एका महत्त्वाच्या तत्त्वाबाबत ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चशी मतभेद आहे. येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण व्यक्तित्वात त्याच्या दैवी व मानवी स्वभावाचा मिलाफ झालेला आहे, असा सिद्धांत इ. स. ४५१च्या खाल्सेडॉन कौन्सिलमध्ये स्वीकारण्यात आला होता. ‘मोनोफिझाइट्स’ व ‘नेस्टोरियन’ ह्या मतप्रणालीच्या लोकांनी ह्या सिद्धांताला विरोध केला. त्यांच्या मतानुसार येशूचे व्यक्तित्व एकाच दैवी स्वभावाचे असून त्यात दैवी स्वभाव व मानवी स्वभाव असा भेद करता येत नाही.