लुकाक्स, जॉन आर. (Lukacs, John R.) : ( १ मार्च १९४७ ). प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. लुकाक्स यांचा जन्म अमेरिकेमध्ये झाला. त्यांनी सिराक्यूस युनिव्हर्सिटी येथून १९६९ मध्ये मानवशास्त्र विषयातून ए. बी. आणि १९७० मध्ये त्याच विषयातून एम. ए. या पदव्या संपादन केल्या. लुकाज हे १९७६ – २०१४ या काळात यूनिवर्सिटी ऑफ ऑरिगॉनमध्ये सन्मानीय प्राध्यापक होते. त्यांनी १९७७ मध्ये केनिथ र. केनेडी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉर्नेल युनिव्हर्सिटी येथून आपली विद्यावाचस्तपती (पीएच. डी.) ही पदवी मिळवली. त्यांच्या संशोधानाचा विषय ‘अँथ्रोपॉलॉजिकल अॅस्पेक्टस ऑफ डेंटल व्हेरिएशन इन नॉर्थ इंडिया : ए मॉरफोमेट्रिक अॅनॅलिसिस’ असा होता. त्यासाठी त्यांनी उत्तर भारतामधील दंत भिन्नतेच्या मानवशास्त्रीय पद्धतीचा अभ्यास केला. त्यांनी दक्षिण आशियातील मानवी सांगाड्यांच्या अवशेषांवर व्यापकपणे काम केले व करत आहेत.
लुकाक्स यांनी दमदमा, महादाहा, इनामगाव, मेहरगड, हडप्पा इत्यादींसारख्या प्राचीन ठिकाणी काम केले आहे. ते दक्षिण आशियातील मानवी सांगाड्यावरील रोगांच्या पुराचिकित्साशास्त्राचा (पॅलेओपॅथॉलॉजी) व दातांच्या जडणघडण पद्धतींचा अभ्यास करतात. दक्षिण आशियातील प्रागैतिहासिक आणि जीवंत लोकांचा दंत्य मानवशास्त्राच्या अनुषंगाने अभ्यास करणे; प्रागैतिहासिक पुराचिकित्साशास्त्रामधील आरोग्य आणि पौष्टिकतेच्या बदलत्या नमुन्यांचा अभ्यास करणे; विकासात्मक आणि वयोमानानुसार होणाऱ्या दंतरोगांमधील लैंगिक फरकांचा अभ्यास करणे; प्रागैतिहासिक कालखंडातील दातांच्या आजारांचा होणाऱ्या फरकांचा अभ्यास करणे; सजीव आणि प्रागैतिहासिक मानव, वानर व होमिनिड जीवाश्मांमधील दातांवरील इनॅमल या शुभ्र आवरणाच्या जडणघडणीतील दोषांचा अभ्यास करणे हे त्यांच्या आवडीच्या संशोधनाचे विषय आहेत.
लुकाक्स यांनी केवळ जुन्या मानवी अस्थिंचाच अभ्यास न करता आजच्या काळातील लोकांचाही अभ्यास करून त्या दोघांमधील साम्यता किंवा वेगळेपणा काय आहे, याचा शोध घेतला आहे. त्यांचे संशोधन हे दंत आरोग्यासाठी साथीच्या रोगाचा दृष्टीकोन आणि त्यामधील तोंडाच्या आजारातील लैंगिक फरक यांवर केंद्रित आहे. त्यांनी दक्षिण आशियातील प्रागैतिहासिक मानवी सांगाड्यांमधील आजार, दातांचे रोग आणि त्यांच्या जीवन पद्धतींचा आढावा यांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणावर जोर दिला. त्यांना या संशोधनासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटी, विनर ग्रांट फौंडेशन फॉर अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च, नॅशनल सायन्स फाउंडेशन प्लॅनिंग ग्रांट, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडिज अशा मोठमोठ्या नामांकित संस्थांकडून आर्थिक साह्य मिळाले आहेत. तसेच लुकाक्स यांनी उत्तर भारतातील सुरुवातीचा होलोसीन काळ, लोकसंख्याशास्त्र, आरोग्य आणि पोषणावर लक्ष केंद्रित केलेला एक प्रबंध लिहिला आहे. त्यांच्या या संशोधनास अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडिज, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी, इंडो-अमेरिकन फेलोशिप प्रोग्राम (काउंसिल फॉर इंटरनॅशनल एक्सचेंज ऑफ स्कॉलर्स), एलएसबी लीकी फाउंडेशन, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी, नॅशनल सायन्स फाउंडेशन, स्मिथसोनियन संस्था यांचे अनुदान व फेलोशिप मिळाले आहे.
लुकाक्स यांनी दातांच्या जडणघडणीवर व दक्षिण आशियातील बिहेव्हिअरल आर्किओलॉजीवर लेखन केले आहेत. त्यांनी स्वत: व सहलेखक म्हणून जिऑलॉजिकल अँड वर्टिब्रेटपॉसिल लोकॅलिटिज, टर्टिअरी कॉन्टिनेन्टल रॉक्स, काला चित्ता हिल्स, अटक डिस्ट्रिक्ट, पाकिस्तान (१९७९); कल्चर, इकॉलॉजी अँड डेंटल अँथ्रोपॉलॉजी (१९९२); होलोसीन, फॉरेजर्स ऑफ नॉर्थ इंडिया (२०१६); न्यायवैद्यक मानवशास्त्र; दंत मानवशास्त्र; जैवविज्ञान; पुरातत्त्वीय जीवशास्त्र : संलग्नतांपासून वाढ आणि पोषण इत्यादी. ही सर्व पुस्तके भारतातील मानवी सांगाड्यांवर आधारित असून त्यांत त्यांनी जैविक गुणधर्मांच्या अनुषंगाने अभ्यास केलेला आहे.
लुकाक्स यांनी २००५ ते २००७ या काळात विद्यापीठीय सेवा समिती, विभागीय समिती, व्यावसायिक संघटन सदस्य, व्यावसायिक सेवा इत्यादी समित्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्य केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल ‘स्टॅन्ली ग्रीनफिल्ड लायब्ररी अवॉर्ड’ (१९९४); ‘रिप्पी अवॉर्ड’ (१९९८) इत्यादी सन्मान मिळाले आहेत.
समीक्षक : शौनक कुलकर्णी