इजीअन समुद्रातील बेटांमध्ये तसेच आसपासच्या प्रदेशात अश्मयुग (इ. स. पू. ७००० ते ३०००) व प्रागैतिहासिक कांस्य (ब्राँझ) युगात (इ. स. पू. सु. ३००० ते ११००) विकसित झालेल्या यूरोपमधील पहिल्या प्रगत कला-संस्कृतीस ‘इजीअन कला-संस्कृती’ असे म्हटले जाते. इजीअन समुद्र पूर्व भूमध्यसागराचा उत्तरी भाग असून ह्याचा किनारा खाड्यांमुळे अनियमित झालेला आहे. त्याच्या मध्यभागी अनेक छोटी-मोठी बेटे तयार झालेली असून भौगोलिक दृष्ट्या ह्या प्रदेशात क्रीट (Crete), सिक्लाडीझ (Cyclades), ग्रीस (Greece) चा दक्षिण व आग्नेय भाग म्हणजे पेलोपनिससचे द्वीपकल्प तसेच आशिया मायनरचा पश्चिम किनारा (West coast of Asia minor) अर्थात तुर्कस्तानचा पश्चिम व मुख्यत्वे वायव्य भाग या भूभागांचा समावेश होतो. भूमध्यसागरात वसलेल्या या संस्कृतीचा शोध जर्मन संशोधक हाइन्रिख श्लीमान यांनी इ. स. १८७० ते १८९२ च्या दरम्यान लावला. होमरच्या महाकाव्यात आणि ग्रीक पुराणकथांत वर्णिलेल्या व्यक्ती व स्थलनामे त्यापूर्वी केव्हातरी निश्चितच अस्तित्वात असली पाहिजेत, या दृढ विश्वासाने श्लीमान यांनी येथे उत्खनन केले. त्यांना येथे अनेक प्राचीन अवशेष उपलब्ध झाले. अर्थात त्यांचे उत्खनन शास्त्रशुद्ध नव्हते; त्यामुळे त्यांनी ठरविलेली कालनिश्चिती व उपलब्ध अवशेषांवरून काढलेली अनुमाने फारशी विश्वसनीय नव्हती. त्यानंतर वरील प्रदेशांत व्हिल्हेल्म डर्पफेल्ट, एव्हान्झ, अॅलन जे. बी. वेस इत्यादी पुरातत्त्ववेत्त्यांनी विस्तृत प्रमाणावर उत्खनने केली.
इजीअन कला-संस्कृतीत प्राचीन कलांमधील ग्रीक कला-संस्कृतीच्या आधीच्या अभिजात कलांमधील सामान्यत: अनुक्रमे सिक्लाडिक, मिनोअन व मायसीनीअन या तीन कला-संस्कृतींचा समावेश होतो. सिक्लाडीझ बेटांवरील कांस्ययुगाला सिक्लाडिक (Cycladic) तर मुख्य भूप्रदेशाला येथील हेलास (Hellas – ग्रीसचे ग्रीक भाषेतील नाव) जातीच्या लोकांवरून हेलाडिक (Helladic) असे ओळखतात.
ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ आर्थर जे. एव्हान्झ (इ. स. १८५१-१९४१) यांनी १८९९ ते १९३५ पर्यंत क्रीट येथे केलेल्या उत्खननातून मिनोअन संस्कृतीचे अवशेष ज्ञात झाले. क्रीट येथील कांस्ययुग संस्कृतीला येथील राजा मिनो वरून मिनोअन असे ओळखले जाते, कारण नॉसस राजा मिनो याच्यानंतर हे द्वीपसमूहाचे मुख्य केंद्र होते. मोठे प्रासाद, उत्तम कलाकुसर व लेखन आत्मसात करणारी क्रीटच्या बेटावर विकसित झालेली यूरोपियन मातीवरील ही पहिली प्रगल्भ संस्कृती. नंतरच्या काळात मुख्य भूप्रदेशाच्या लोकांनी क्रीट संस्कृतीशी जुळवून घेत हळूहळू त्यांची संस्कृती प्रस्थापित केलेली दिसते. क्रीट हे विशाल बेट यूरोप, आफ्रिका आणि आशिया या तिन्ही खंडांना जवळ असल्यामुळे येथील लोकांना या सर्वांशी व्यापार करणे सोयीचे गेले आणि या व्यापारामुळे त्यांना संपत्ती प्राप्त होऊन मिनोअन कला-संस्कृतीचीही भरभराट झाल्याचे आढळते.
इ. स. पू. १६ व्या शतकापासून क्रीटच्या प्रभावाखाली आलेले मायसीनी हे मुख्य भूमीवरील ग्रीसमधील हेलाडिक संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. यावरूनच हा भूप्रदेश मायसीनीअन संस्कृतीच्या नावाने ओळखला जातो. पुरातत्त्वीय अवशेषांवरून सर्वसाधारणपणे इ. स. पू. १४५० ते ११०० असा तिचा काळ मानण्यात येतो. होमरच्या इलियड या काव्यात या नगरीचा उल्लेख आहे. पॉसेनिअस या दुसऱ्या शतकातील ग्रीक भूगोलज्ञाने डिस्क्रिप्शन ऑफ ग्रीस या ग्रंथात या नगरीचे वर्णन केले आहे. त्याचा आधार घेऊन पुरातत्त्वज्ञ हाइन्रिख श्लीमान यांनी इ. स. १८७६-७८ दरम्यान येथे उत्खनन करून पाच थडग्यांचे अवशेष शोधले. पुढे विसाव्या शतकात ब्रिटिश संशोधक ॲलन जे. बी. वेस यांनी या संशोधनास परिपूर्णता आणून मायसीनीचा इतिहास प्रसिद्ध केला. ग्रीसमधील पेलोपनीस क्षेत्रातील मायसीनी, टायरिन्झ, पिलॉस, अथेन्स, थीब्ज, थेसालीतीरावरील आयोकोस (Iolkos) ही मायसीनीअन संस्कृतीची प्रमुख केंद्रे होती.
इजीअनमधील मायसीनी, टायरिन्झ व ट्रॉय या शहरांच्या तत्कालीन रचनेवरून व त्यांतील राजवाड्यांवरून येथे राजेशाही अस्तित्वात असावी; परंतु नंतर मायसीनीअन किंवा उत्तर हेलाडिक काळात लहान शहरांतून स्वतंत्र राजकीय गट असावेत आणि त्या सर्वांत नॉसस हे बलवत्तर असावे. काही खेड्यांच्या सभोवतालच्या तटबंदीवरून असे अनुमान करता येते, की त्यांचे आपापसांत हेवेदावेही असावेत. मिनोअन व मायसीनीअन जीवनपद्धतींत स्थलकालसापेक्ष काही भेद निश्चितपणे असले तरी कालांतराने मायसीनीत स्थायिक झालेल्या अॅकियन जमातींनी मिनोअन संस्कृतीच अधिक आत्मसात केलेली आढळते.
इजीअन संस्कृतीतील कला या अतिशय भिन्न असून भिन्न संस्कृती प्रतिबिंबित करतात. प्रामुख्याने इ. स. पू. २८०० ते ११०० या काळातील इजीअन कला-संस्कृतीमध्ये नवाश्मयुग ते कांस्ययुगात होणारे संक्रमण तसेच कांस्ययुगातील प्रारंभिक, मध्य व उत्तर काळाचे विभाजन संशोधकांनी प्रत्येक स्वतंत्र संस्कृतीशी निगडित असलेले अवशेष, मृत्पात्रे व त्यांची बदलणारी शैली तसेच इतर उत्पादने व भौतिक बदलांवरून केलेले दिसते. इजीअन कलाकारांनी त्यांची स्वतंत्र शैली विकसित केल्याचे दिसते. इ. स. पू. ३००० ते २००० च्या दरम्यान धातूचा वापर करणाऱ्या संस्कृतींची भरभराट क्रीट, सिक्लाडीझ बेटांवर आणि मुख्य भूभागाच्या दक्षिणेकडील भागांत झालेली दिसते.
सिक्लाडिक कला : (इ. स. पू. ३००० ते ११००). ही कलासंस्कृती येथील भूबेटांवर मुबलक प्रमाणात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या संगमरवरातील भांडी व विविध आकारातील परंतु शैलीबद्ध कोरलेल्या मानवाकृती शिल्पांमुळे ओळखली जाते, उदा. स्त्री-शिल्पांमध्ये प्रजनन देवतेची शिल्पे, संगीतकार, शिकारी-योद्ध्यांची शिल्पे. सुरुवातीच्या टप्प्यातील मृत्पात्रांवर नागमोडी, धावत्या आकृत्या व सागरी उपक्रम दर्शविणारी जहाजाची रूपचिन्हे चितारलेली दिसतात.
मिनोअन कला : (इ. स. पू. २६०० ते १६००). ही कलासंस्कृती भित्तिचित्रेयुक्त प्रचंड मोठे प्रासाद, मृत्पात्री आणि दागिन्यांसाठी ओळखली जाते. या कलेच्या अवशेषांवरून कलाकारांचे नैसर्गिक आकारांतील स्वारस्य जाणवते. इ. स. पू. २००० ते १७०० या काळात मोठ्या प्रमाणात मृत्पात्रांची निर्मिती झाल्याचे आढळते. कांस्य, मृत्स्ना व दगडांतील लघुशिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. मिनोअन प्रासादांमधील काढलेल्या भित्तिचित्रांमध्ये सामाजिक, नैसर्गिक विषयांचे चित्रण केलेले आढळते त्यासाठी त्यांनी सार्द्र व शुष्क या दोन भित्तिलेपचित्रण तंत्रांचा वापर केलेला दिसतो.
मायसीनीअन कला : (इ. स. पू. १६०० ते ११००). या कलासंस्कृतीवर मिनोअन कला-संस्कृतीचा प्रभाव जास्त प्रमाणात आढळून येत असला, तरीही ही कला कलात्मक राजेशाही धातुकाम, प्रचंड आकारातील प्रसाद, त्यांच्या तटबंद्या आणि थडग्यांसाठी ओळखली जाते. या काळातील भव्य सिंहद्वार साध्या व मोठ्या आकारातील दगडी विटांनी बांधलेले आहे. भित्तिचित्रांमध्ये धार्मिक, युद्ध-प्रसंग इत्यादी आढळतात. दगडातील भांडी, धातूची आयुधे व दागिन्यांच्या आकारांत नाविन्यता दिसते. मृत्पात्रांवरील नक्षीकाम प्रगतीशीलपणे अधिक शैलीकृत व सोपे झालेले दिसते.
संदर्भ :
- Betancourt, Philip P., Introduction to Aegean Art, INSTAP Academic Press Philadelphia, 2007.
- Cline, E.H., The Oxford Handbook of the Bronze Age Aegean, Oxford University Press, USA, 2012.
- German, Hafner, Art of Crete, Mycenae, and Greece, Harry N. Abrams, Inc, New York, 1968