हिमालयाच्या उंच आणि ओबडधोबड पर्वतरांगा, खोल घळया, उंच शिखरे, खडकाळ कडे, बर्फाच्छादित प्रदेश, घनदाट अरण्ये इत्यादी घटक वाहतूकमार्गांच्या विकासातील प्रमुख अडथळे आहेत. जगातील सर्वाधिक उंचीवरील खिंडी प्रामुख्याने हिमाद्रीमध्ये सुमारे ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीवर आहेत. त्या खिंडी वर्षातून केवळ काही कालावधीसाठी वाहतुकीस खुल्या राहतात. त्यामुळे ३,००० ते ४,००० मी. उंचीपर्यंत रस्ते बांधावे लागतात. इ. स. १९४५ पूर्वी हिमालय पर्वत पार करण्यासाठी मोटार किंवा जीपगाडी जाऊ शकेल, असा एकही रस्ता नव्हता. त्यानंतर सिक्कीममधील नथू ला खिंडीपर्यंत जाणारा एक रस्ता बांधण्यात आला. तेव्हा चीननेही चुंबी खोऱ्यातून नथू ला खिंडीपर्यंत रस्ता बांधला. हिमालय पार करू शकणारा हाच पहिला मोटार रस्ता होय. पुढे चीनने लडाख प्रदेशातून हिमालयापर्यंत जाणारा, तर भारताने लेहच्या पुढे आपल्या सरहद्दीपर्यंत रस्ते बांधले. त्यानंतर भारताने आपल्या मैदानी प्रदेशापासून काठमांडूपर्यंत त्रिभुवन राजपथ हा रस्ता तयार केला, तर चीनने काठमांडूपासून कोदारीमार्गे ल्हासापर्यंत रस्ता काढला. पुढे भारताने आपल्या सरहद्दीवरील शिपकी, माना, नीती इत्यादी खिंडींपर्यंत रस्ते बांधले. चीननेही मोठ्या प्रमाणावर भारताच्या हिमालयीन सरहद्दीपर्यंत रस्त्यांचा विकास केला आहे. या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती अत्यंत जिकिरीची असते. तसेच हिवाळ्यात त्यांवरून वाहतूक करता येत नाही. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे कधीकधी रस्ते वाहतूक बंद होते.

जलपैगुरी ते दार्जिलिंग, कालका ते शिमला शहर असे काही मोजकेच लोहमार्ग असून ते प्रामुख्याने पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पठाणकोटपासून जोगिंदरनगर असा एक लोहमार्ग आहे. लष्करी डावपेचांच्या व संरक्षणाच्या दृष्टीने भारताच्या उत्तर सरहद्दीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दिवसेंदिवस हा प्रदेश अधिक संवेदनशील बनत आहे. त्यातच चीनने भारताच्या उत्तर सरहद्दीलगत रस्ते आणि लोहमार्गांचे जाळे निर्माण केले आहे. विस्तारवादी मानसिकतेमुळे चीनकडून वारंवार सरहद्द प्रदेशात अतिक्रमणाचे प्रयत्न होत असतात. त्यामुळे भारतीय लष्कराला आपल्या संरक्षणासाठी येथील सरहद्दीजवळ सातत्याने सतर्क राहावे लागते. त्या दृष्टीने हिमालयातील, विशेषतः चीनशी असलेल्या सरहद्दीलगत, वाहतूकमार्गांचा विकास करणे भारताला अनिवार्य झाले आहे. त्यामुळेच भारत या भागात रस्ते व लोहमार्गांचा विकास करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरुणाचल प्रदेश राज्यातील चीनशी असलेल्या ‘मॅकमहोन रेषा’ या आंतरराष्ट्रीय सरहद्दीजवळ सुमारे ६,००० किमी. लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याची भारताची योजना कार्यान्वित झाली आहे.

रस्त्यांच्या विकासावरून आणि सरहद्दीवरून भारत-चीन यांदरम्यान वारंवार संघर्षाचे प्रसंग येत आहेत. भारत, चीन (तिबेट) व भूतान यांच्या सरहद्दी जेथे एकत्र येतात, तेथे भूतानचे डोकलाम पठार आहे. विस्तारवादी चीनने २०१७ मध्ये या पठारी भागात बेकायदेशीर रीत्या रस्त्याचे बांधकाम सुरू केले. भारतीय लष्कराने ते काम रोखले, तेव्हा तेथे दोन्ही सैन्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात भारत करीत असलेल्या रस्त्यांच्या निर्मितीस चीनने अप्रत्यक्ष विरोध करीत भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच १५-१६ जून २०२० रोजी भारत-चीन सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. चीनने विश्वासघाताने भारतीय सैन्यावर हल्ला केला. त्यात भारताचे २० बहाद्दूर सैनिक शहीद झाले. भारतीय सैन्याने त्या झटापटीत चीनच्या सुमारे ४३ सैनिकांना ठार मारले. अशाप्रकारे चीनच्या विस्तारवादी आणि विश्वासघातकी प्रवृतीमुळे भारताच्या संपूर्ण उत्तर सीमेवर सतत तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. सहाजिकच स्वसंरक्षणाच्या दृष्टीने भारताला आपल्या हिमालयीन सरहद्दीपर्यंत वेगवेगळ्या वाहतूकमार्गांचा प्राधान्याने विकास करणे गरजेचे बनले आहे. त्या दृष्टीने भारताने अनेक मार्गांचे काम हाती घेतले आहे.

अटल बोगदा

लडाखच्या सरहद्दीपर्यंत जाण्यासाठी सध्या भारताला फक्त दोनच रस्ते उपलब्ध आहेत. त्यांपैकी पहिला रस्ता म्हणजे झोजी ला खिंडीतून जाणारा श्रीनगर-द्रास-कारगिल-लेह हा मार्ग आहे. दुसरा रस्ता हिमाचल प्रदेश राज्यामधून रोहतांग खिंडीतून मनालीमार्गे लेहपर्यंत जातो; परंतु हिवाळ्यात झोजी ला व रोहतांग या दोन्ही खिंडींच्या परिसरात जोरदार हिमवृष्टी होते. बर्फाच्छादनामुळे हे दोन्ही रस्ते वर्षातून कमीतकमी पाच ते सहा महिने बंद असतात. त्या दृष्टीने भारताने येथील नैसर्गिक अडचणींवर मात करीत रोहतांग खिंडीच्या मार्गावर ‘अटल बोगद्या’ची निर्मिती केली आहे. ३ ऑक्टोबर २०२० रोजी या बोगद्याचे उद्घाटन होऊन तो वाहतुकीस खुला करण्यात आला. या बोगद्याचे पूर्वीचे नाव रोहतांग बोगदा असे होते; परंतु तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या बोगद्याचे नाव ‘अटल बोगदा’ असे करण्यात आले. पीर पंजाल पर्वतश्रेणीच्या पूर्व भागात, हिमाचल प्रदेश राज्यातील रोहतांग खिंडीत हा बोगदा आहे. या बोगद्यात अत्याधुनिक सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. उदा., दूरध्वनी सुविधा, अग्निशमन सुविधा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, प्रकाशव्यवस्था, हवेचे प्रदूषण मोजण्याची आणि ते नियंत्रित करण्याची सोय इत्यादी. या बोगद्यामुळे आता हा रस्ता जवळजवळ बाराही महिने वाहतुकीस खुला आहे. लडाखच्या पूर्वेकडे भारत-चीन यांच्या दरम्यान तणावाची परिस्थिती असताना हा बोगदा सुरू झाला, हे अत्यंत मोलाचे आहे. झोजी ला खिंडीजवळही १४ किमी. लांबीच्या बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हिमालयात ठिकठिकाणी रज्जुमार्ग उभारले आहेत. सरहद्द प्रदेशात भारताने विमाने व हेलिकॉप्टर उतरविण्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी धावपट्ट्या निर्माण केल्या आहेत. श्रीनगर (भारत) व काठमांडू (नेपाळ)  इत्यादी ठिकाणी विमानतळ आहेत. काही ठिकाणी याक या प्राण्याचाही वाहतूकीसाठी वापर केला जातो.

समीक्षक : नामदेव गाडे