हिमाचल प्रदेशातील साकेती (सिरमूर जिल्हा) येथील सिवालिक जीवाश्म उद्यानामध्ये शिवालिक भागातील भूशास्त्रीय कालखंडातील २.५ द.ल. वर्षांपूर्वीच्या प्राचीन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या (Vertebrate animals) जीवाश्मांचे समृद्ध असे संग्रहालय आहे.
सिरमूर जिल्ह्यातील मार्कंडा नदीखोऱ्यातील साकेती गावात हे संग्रहालय अंदाजे १.५ चौ. किमी. जागेत वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या या महत्त्वपूर्ण भागामधील अवसादी खडकांमध्ये प्राचीन काळातील सजीव प्राण्यांची (आज अस्तित्वात नाहीत अशांची) जीवाश्म हाडे विपुल प्रमाणात सापडतात. यांचा उपयोग प्राचीन पुरापरिस्थिती (Ancient Palaeo Environment) आणि जीवसृष्टीचे योग्य आकलन होण्यासाठी शास्त्रज्ञांना होतो. परंतु विविध कारणाने हे अमूल्य पुरावे नष्ट होतात आणि त्यामुळेच त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून हे संग्रहालय बांधण्यात आले आहे.
यांच्यातील काही जीवाश्म ही ब्रिटिश संग्रहालय, लंडन; अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, न्यूयॉर्क; भारतीय संग्रहालय, कोलकाता आणि इतर यांच्या अखत्यारीत आहेत. या उद्यानामध्ये या भागातील साधारण १ ते १.५ द.ल. वर्षांपूर्वीच्या प्राचीन भूशास्त्रीय काळात वावरलेल्या (आता अस्तित्वात नसलेल्या) अशा जमिनीवरील महाकाय कासव (Giant Land Tortoise), सुसर (Gharial), ४ शिंगाचे जिराफ (Four horned Giraffe), सबरे दातांचे (वरच्या जबड्यात २ मोठे सुळे असलेले) वाघ (Sabre – toothed Tiger), मोठ्या सुळ्यांचे हत्ती (Large tusked Elephant) आणि पाणघोडा (Hipopolamid) या ६ प्राण्यांचे त्यांच्या मूळच्या शारीरिक आकारमानाप्रमाणे तंतुरूप काच (फायबरग्लास) मध्ये हुबेहूब पुतळे बनविलेले आहेत.
शिवालिक डोंगरांमध्ये आणि साकेतीच्या भोवताली असलेल्या भूभाग क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या आणि दुर्मिळ अशा जीवाश्म हाडांचे/सांगाड्यांचे क्षेत्रीय संग्रहालय (Field display – Museum) या ठिकाणी पाहावयास मिळते. या उद्यानात सर्व बाजूनी मोठ्या प्रमाणात झाडे लावून भूवैज्ञानिकीय कालखंडातील नवजीव महाकल्पातील (Cenozoic Era) प्लायोसिन – प्लाइस्टोसिन उपकल्पातील (Pliocene – Pliestocene) सु. २.५ द.ल. वर्षांपूर्वीची अस्तित्वात असलेली दाट जंगलासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे. हे राष्ट्रीय जीवाश्म उद्यान काला आंब (Kala Amb) – बिक्रमाबाद (Bikramabad) रस्त्यावरील काला आंबच्या ईशान्येला ५ किमी. अंतरावर, तसेच सिरमूर जिल्ह्यातील नहान (Nahan) शहराच्या नैऋत्येला २२ किमी. अंतरावर आहे.
संदर्भ :
- संकेतस्थळ – Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी