गोसान (राजपुरा – दारिबा, राजस्थान)

गोसान म्हणजेच लोहाची टोपी (Iron Hat). भूपृष्ठापाशी उघड्या पडलेल्या, गंधकयुक्त रासायनिक घटक असलेल्या खडकांतील खनिज घटकांचे, पाण्याच्या (भूजलाच्या) सानिध्यात अनुकूल रासायनिक हवामान आणि व्यापक ऑक्सिडेशन प्रक्रियांमुळे न विरघळणाऱ्या (अद्राव्य सल्फाइडसचे विरघळणाऱ्या) विद्राव्य अशा सल्फेटमध्ये रूपांतर होऊन ते पृष्ठभागाजवळ जमा होतात. कालांतराने बाष्पीभवनामुळे त्यांच्यातील घटकद्रव्यांचे, लोहासमवेत कठीण असे टोपीप्रमाणे असणारे मिश्र धातुककवच भूपृष्ठावर तयार होते त्यांनाच गोसान म्हणतात. अशा प्रकारच्या गोसान रचना जेथे आढळतात त्याखाली तांबेवर्गीय गंधकिय धातूकी खनिजे (Chalcophile – Sulphides of Fe, Cu, Pb, Zn, As, Ag, Ni, Co इ.) असण्याची शक्यता असते म्हणून  गंधकिय धातू खनिज शोधामध्ये गोसान हे महत्त्वाचे निर्देशक आहेत.

अशा प्रकारचे गोसान मिळाल्यामुळे राजस्थानातील राजपुरा – दारिबा (राजसमंद जिल्हा) या खनिज क्षेत्राचा पुन्हा नव्याने शोध घेण्यास मदत झाली. प्रदीर्घ भूशास्त्रीय कालखंडांत आणि पुरातन अनुकूल हवामान स्थितीत विस्तृत प्रमाणात ते तयार झाले आहेत. विविध धातूंच्या संयुगांमुळे लालसर तपकिरी, तपकिरी, गडद तपकिरी, निळे हिरवे, पांढरे आणि राखाडी रंगात आणि विविध प्रकारचे जाळीदार नक्षीत – बॉक्सवर्क यासह हे गोसान आढळतात. यामध्ये जस्त, शिसे आणि तांबे या क्रमाने मुख्य धातूची खनिजे – स्फॅलेराइट (ZnS), गॅलेना (PbS) आणि चाल्कोपायराइट (CuFeS₂) ही आहेत.

पश्चिम रेल्वेच्या चितोड – उदयपूर विभागातील फतेहनगर रेल्वे स्थानकापासून १५ किमी. उत्तर- उत्तरपूर्व दिशेला असलेले गोसानचे हे क्षेत्र  राजपुरा आणि दारिबा गावांमध्ये साधारण ४.५ किमी. लांबीचे आणि २ ते ४० मी. रुंदीचे आहे.

संदर्भ :

  • संकेतस्थळ : Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी