रायगड जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. तो पनवेल तालुक्यात समुद्रसपाटीपासून सु. ७०७ मी. उंचीवर आहे. प्रबळगड हा मुख्य किल्ला असून त्याला लागून असलेल्या एका छोट्या खिंडीने कलावंतीण नावाचा सुळका किल्ल्याला जोडला गेला आहे.

प्रबळगड (जि. रायगड).

गडावर जाण्यासाठी पनवेल शहरातून खाजगी वाहनाने शेडुंगमार्गे अर्ध्या तासात गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकुरवाडीत (खालच्या) पोहचता येते. ठाकुरवाडीतून एक प्रशस्त मळलेली वाट प्रबळगडाच्या माचीवर असलेल्या ठाकुरवाडी ह्या छोट्या वस्तीवर जाते. ही वस्ती माची प्रबळगड या नावाने ओळखली जाते. माचीवर प्रवेश करताना वाटेवर भग्न दरवाजाचे अवशेष, दगडात कोरलेली गणेश मूर्ती आणि हनुमान मूर्ती दिसून येतात.

ठाकुरवाडीतून गडावर आणि कलावंतीण सुळक्यावर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा जातात. ठाकुरवाडीतून गड डाव्या बाजूला ठेवून सपाटीवरून थोडे चालत गेल्यावर एक वाट डाव्या बाजूला किल्ल्याकडे वळते. पुढे एका तीव्र चढाईनंतर गडावर प्रवेश होतो. या वाटेने सु. पाऊण तासात गडावर पोहचता येते. गडाचा माथा हा विस्तीर्ण असून गर्द झाडीने वेढलेला आहे. त्यामुळे गडावर फिरताना वाट चुकण्याची शक्यता अधिक आहे. खबरदारी म्हणून माचीवरील वस्तीतून एखादा वाटाड्या घेऊन जाणे योग्य. गडावर सांप्रत फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. गडावर एक गणपती मंदिर असून या मंदिराचा चौथरा आणि गणपतीची मूर्ती एवढेच अवशेष आढळून येतात. गडावर पाण्याचा एक तलाव असून पावसाळा वगळता या तलावात पाणी नसते. गडाच्या पूर्व भागात पाण्याचे खोदीव टाके दिसून येते. गडाच्या दक्षिणेकडील बाजूस काळा बुरूज असून येथे खडकात कोरलेली पाण्याची दोन टाकी आहेत. बुरुजावर जाण्यासाठी वाटाड्याची मदत घ्यावी. गडावर पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नाही, त्यामुळे किल्ल्यावर जाताना स्वतःजवळ भरपूर पिण्याचे पाणी बाळगणे आवश्यक. १८८१ साली गडाला ११ बुरूज आणि २ दरवाजे होते, अशी नोंद सापडते.

गडावरुन उत्तर दिशेला गाढेश्वर तलाव, दक्षिणेकडील बाजूला माणिकगड इर्शाळगड, पूर्वेला पेबचा किल्ला, तर पश्चिमेला पनवेल शहर इत्यादी जागा दिसून येतात.

गडाचे दुसरे नाव मुरंजन असे आढळून येते. सय्यद अली तबातबा याच्या बुर्हान इ मासिर  या ग्रंथात १४८५ च्या सुमारास बहमनी सरदार मलिक अहमद याने आपल्या कोकण मोहिमेत मुरंजन हा किल्ला जिंकून घेतल्याची नोंद आढळून येते. हा किल्ला नंतर प्रदीर्घ काळ अहमदनगरच्या निझामशाहीच्या ताब्यात राहिला असावा. किल्ल्याचा नंतर उल्लेख हा १६३६ साली मोगलांनी शहाजी राजे यांच्यावर केलेल्या स्वारीच्या वेळी येतो. पुढे छ. शिवाजी महाराज यांनी आपल्या कल्याण-भिवंडी स्वारीच्या वेळी प्रबळगडाची डागडुजी केली. १६६४ साली किल्ले पुरंदर येथे झालेल्या मोगल मराठा तहामध्ये जे २३ किल्ले मोगलांना देण्यात आले, त्यांमध्ये प्रबळगडाचा समावेश होता. १६७० नंतर मराठ्यांनी प्रबळगडावर हल्ला करून हा किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला. यावेळी झालेल्या लढाईत मोगल किल्लेदार केशरसिंग हा मारला गेला. १८२३ साली पुरंदर येथील रामोशी लोकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारले. यावेळी या बंडात सामील असलेल्या ३०० लोकांनी प्रबळगड किल्ल्याचा आश्रय घेऊन ब्रिटिश सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात सामान्य नागरिकांनी ब्रिटिश सरकारला एक पैशाचाही वसूल देऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते.

संदर्भ :

  • घाणेकर, प्र. के. भटकंती रायगड जिल्ह्याची, स्नेहल प्रकाशन, पुणे, २००७.
  • जोशी, सचिन विद्याधर, रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव, बुकमार्क पब्लिकेशन, पुणे, २०११.

समीक्षक : सचिन जोशी