मराठीमध्ये ‘समाधि’ हा शब्द स्त्रीलिंगामध्ये प्रचलित असला तरी संस्कृतमध्ये तो पुल्लिंगी आहे. लोकव्यवहारात ‘समाधि’ शब्दाचा अर्थ ‘ज्या ठिकाणी सत्पुरुषांनी देहत्याग केला ते पवित्र ठिकाण’ असा आहे. तर ‘समाधि घेणे’ या प्रयोगात समाधि शब्दाचा अर्थ ‘स्वेच्छेने केलेला देहत्याग’ असा आहे. योगशास्त्रामध्ये मात्र ‘समाधि’ शब्दाचा पारिभाषिक अर्थ याहून निराळा आहे.
‘समाधि’ हा संस्कृत भाषेतील शब्द सम् + आ + धा यापासून तयार झाला आहे. ‘सम्’ आणि ‘आ’ या उपसर्गांचा अर्थ अनुक्रमे ‘योग्य रीतीने’ आणि ‘पर्यंत’ असा असून ‘धा’ या धातूचा अर्थ ‘ठेवणे’ असा आहे; त्यामुळे समाधि शब्दाची व्युत्पत्ती ‘सम्यक् आधीयते मन: यस्मिन् |’ [‘ज्या अवस्थेत मन विषयात योग्य प्रकारे (स्थिर) ठेवले जाते’] अशी केली जाते. ‘योग’ शब्दाची व्युत्पत्ती समाधि या अर्थी असलेल्या ‘युज्’ धातूपासून (‘युज् समाधौ’) झाली असल्यामुळे ‘योग’ हा शब्द देखील समाधि या अर्थी वापरला जातो. त्यामुळे योग म्हणजे समाधि असे व्यासभाष्यात म्हटले आहे (योग: समाधि: | स च सार्वभौमश्चित्तस्य धर्म: | १.१). योगशास्त्रात समाधि शब्द चित्ताची एकाग्रता आणि चित्तवृत्तींचा निरोध या दोन्ही अर्थाने वापरला असला तरी लौकिक व्यवहारात मात्र सर्वसाधारणपणे ‘समाधि’ हा शब्द निरोधापेक्षा चित्ताच्या एकाग्रतेसाठी जास्त वापरला जातो. समाधि योगाच्या अष्टांगांपैकी आठवे आणि शेवटचे अंग आहे. योगातील यमनियमादि बहिरंग साधने तसेच धारणा व ध्यान ही अंतरंग साधने समाधीसाठी पोषक ठरतात.
वस्तुत: धारणा, ध्यान आणि समाधि ही एकाग्रतेच्या प्रक्रियेचीच तीन अंगे आहेत. धारणा म्हणजे चित्ताला एका विषयावर केंद्रित करणे आणि ध्यान म्हणजे काही काळ त्याच विषयाला लक्ष्य करून त्याचे चिंतन करणे होय. उदा., योगी जर ज्योतीचे ध्यान करत असेल तर ध्यानाच्या अवस्थेत ‘मी ज्योतीचे ध्यान करत आहे’ अशा प्रकारे ज्ञान होते, ज्यामध्ये ध्याता (मी), ध्येय (ज्योती) आणि ध्यान करीत आहे (ध्यान) अशा तीनही घटकांची जाणीव असते. परंतु, जेव्हा ध्यान उच्चतर अवस्थेला पोहोचते, तेव्हा ध्याता आणि ध्यान यांचे अस्तित्व असले तरी त्यांची जाणीव उरत नाही. फक्त ध्येय विषयाचीच साक्षिभावात अनुभूती येत राहते, ती समाधि होय. हे समाधीचे सामान्य लक्षण आहे. योगसूत्रात समाधीचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे – ध्येय वस्तूव्यतिरिक्त अन्य कोणताही विषय (अर्थ) चित्तात न स्फुरणे म्हणजे अर्थमात्र निर्भासता होय. (ध्यानाच्या विकसित अवस्थेत) ज्यावर चित्त एकाग्र केले आहे केवळ त्या विषयाचीच अनुभूती होणे, मात्र त्या विषयाचे ज्ञान होत आहे ही जाणीव नष्ट होणे (ज्ञानस्वरूप शून्यवत् भासणे) हीच समाधि होय (तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधि: | ३.३).
पातंजल योगसूत्रावरील भोजवृत्तीत समाधीची व्याख्या ‘सर्व विक्षेपांचा परिहार होणे; धारणा सम्पूर्णत: स्थिर होणे व चित्ताची एकाग्रता साधणे म्हणजे समाधि होय’ अशी केली आहे (सम्यगाधीयत एकाग्रीक्रियते विक्षेपान्परिहृत्य मनो यत्र स समाधि: | ३.३).
व्यासभाष्यामध्ये समाधीचे संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात हे दोन भेद वर्णिलेले आहेत. महर्षि पतंजलींनी असंप्रज्ञात समाधीचा शब्दश: उल्लेख केला नसला तरी त्याविषयी सूत्रांमध्ये वर्णन आले आहे. समाधि मोक्षाचे साधन आहे, हे आवर्जून सांगण्यासाठी विज्ञानभिक्षु ‘मुक्तिर्योगात् … |’ – ‘योगामुळे (समाधिमुळे) मुक्ती प्राप्त होते’ (मार्कण्डेय पुराण ३९.२) आणि ‘तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिक:’ – ‘योगी (समाधीत असलेला साधक) हा तपाचे अनुष्ठान करणाऱ्या साधकाहून तसेच ज्ञानी पुरुषांहून श्रेष्ठ असतो’, या गीतेच्या वचनाचा (६.४६) दाखला दिला आहे (पातंजल योगसूत्र १.१ वरील वार्त्तिक).
घेरण्डसंहितेमधील सातवा उपदेश हा समाधियोगाविषयी असून त्यात समाधीचे सहा भेदही वर्णिलेले आहेत (७.५-६). घेरण्डसंहितेनुसार देहापासून मन वेगळे करून परमात्म्याशी ऐक्य साधणे म्हणजे समाधि होय (७.३). समाधिद्वारे साधकाला निर्लिप्त अवस्था अर्थात् मुक्ती प्राप्त होते. हठप्रदीपिकेनुसार ‘ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळून जाते, त्याप्रमाणे आत्मा आणि मनाचे ऐक्य होणे म्हणजे समाधि होय. या अवस्थेत मनाच्या सर्व वासना नष्ट होतात. ज्यावेळी प्राण क्षीण होतो आणि मनाचे विविध क्रियाकलाप थांबतात, त्यावेळी साधणारी समरसत्वाची अवस्था अर्थात् जीवात्मा व परमात्म्याचे ऐक्य म्हणजे समाधि होय’ (हठप्रदीपिका ४.५-७) वरील वर्णनावरून हे लक्षात येते की घेरण्डसंहिता आणि हठप्रदीपिका यांमध्ये सांगितलेले समाधीचे लक्षण पातंजल योगापेक्षाही वेदान्त दर्शनाशी अधिक मिळतेजुळते आहे.
वेदान्त दर्शनानुसार समाधिद्वारे जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान होते तर पातंजल योगदर्शनानुसार समाधिद्वारे पुरुष आणि त्रिगुणात्मिका प्रकृति यांमधील भेदाचे ज्ञान साधकाला प्राप्त होते.
पहा : असम्प्रज्ञात समाधि, धर्ममेघ समाधि, सम्प्रज्ञात समाधि.
संदर्भ :
- कर्णाटक विमला, पातञ्जलयोगदर्शन, काशी हिन्दू विश्वविद्यालय, वाराणसी, १९९२.
- देवकुळे, व.ग., घेरण्डसंहिता, शारदा साहित्य प्रकाशन, पुणे, १९८५.
- देवकुळे, व.ग., हठप्रदीपिका, शारदा साहित्य प्रकाशन, पुणे.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर