एक आसनप्रकार. शेतात नांगरणीसाठी जो नांगर (हल) वापरतात त्याप्रमाणे या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकृतीबंध भासतो, म्हणून या आसनास हलासन हे नाव दिलेले आहे. हलासन हे प्रचलित आसन असले तरी त्याचा उल्लेख हठयोगाच्या कुठल्याच ग्रंथात नाही. १५० वर्षांपूर्वी जयतराम लिखित ग्रंथात ‘हालीपाव आसन’ म्हणून वर्णन मिळते जे थोडेफार सध्याच्या हलासनाशी जुळते. त्यामुळे हलासन हे १५० वर्षांपूर्वी शोधले गेले व वापरात आले असावे. हे आसन बरेच कठीण आहे. पाठीच्या कण्याची लवचिकता चांगली असल्याखेरीज ते जमत नाही.

हलासन

कृती : पाठीवर उताणे झोपावे. हातांचे पंजे शरीराजवळ पालथे ठेवावे. दोन्ही पाय गुडघ्यात ताठ ठेऊन वर उचलावे. ९० अंशावर पोहचल्यावर हातांनी जमिनीवर दाब देऊन कंबरही वर उचलावी व दोन्ही पाय डोक्याच्या पलिकडे नेऊन पायांची बोटे जमिनीवर टेकवावीत. दोन्ही हातांचे पंजे गुंफवून ते डोक्याच्या मागे ठेवावेत. शरीर शिथिल करावे. मन शांत असावे. आसन आरामदायी असावे. आसन १५ ते ३० सेंकद ठेवावे. पुढे हा वेळ १-३ मिनिटे वाढविता येईल. श्वसन नैसर्गिकरित्या सुरू ठेवावे. आसन सोडताना आधी हात पूर्ववत जागेवर ठेवावे. आता पाय हलकेच उचलून कंबर खाली आणावी व शेवटी पाय गुडघ्यातून न वाकविता एका लयीत, ओटीपोटाच्या स्नायूंच्या मदतीने, सावकाश खाली आणावे. नंतर थोडी विश्रांती घ्यावी.

लाभ : मेरुदंड लवचिक बनतो व त्यातून निघणारे मज्जातंतू सुदृढ बनतात. पाठीच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. तेथील रक्ताभिसरण वाढते. मेरुदंड योग्यरीत्या ताणला जातो. पौगंडावस्थेत उंची वाढीसाठी जी आसने दिली जातात त्यात हलासनाचा समावेश असतो. थायराईड व पॅराथायराईड या कंठस्थ ग्रंथींवर सुयोग्य दाब पडल्यामुळे त्यांचे कार्य सुधारते. पोटावर दाब पडल्याने श्वसन उथळ होते. परंतु, पोटावरची चरबी हटविण्यास मदत होते तसेच पोटाचे आरोग्य सुधारते. मधुमेह प्रतिबंधक म्हणून हे आसन उपयुक्त आहे. यामुळे अग्निमांद्य दूर होऊन पचनशक्ती वाढते. या आसनानंतर भुजंगासन किंवा धनुरासन केल्यास फायदे अधिक मिळतात.

हलासनाचा चांगला सराव होण्यासाठी आधी बरेच दिवस नुसता एकेक पाय वर उचलणे, मग दोन्ही पाय ९० अंशापर्यंत उचल्याण्याचा सराव करावा. यास अर्धहलासन म्हणतात. यानंतर विपरीतकरणी व यानंतर सर्वांगासन अशी प्रगती करत करत हलासनाचा प्रयत्न करावा. ज्याला हलासन जमते त्याचे वजन कधी वाढणार नाही, पोट सुटणार नाही. याला सर्वप्रथम अर्धहलासन असे स्वामी कुवलयानंदांनी संबोधिले. काही ठिकाणी याला उत्तानपादासन असेही म्हणतात. अर्धहलासनाचा सराव हा विपरीत करणी, सर्वांगासन व हलासन याची पूर्वतयारी म्हणून करतात.

विधिनिषेध : मेरुदंड कडक झाला असेल, मानेचा त्रास असेल, कंबरदुखी असेल तर हे आसन करू नये. लठ्ठपणा, उच्चरक्तदाब असणाऱ्यांनी देखील हे आसन करू नये. आसन करताना झटका देणे, वेगाने करणे, खूप जबरदस्तीने करणे टाळावे अन्यथा पाठीच्या कण्याला दुखापत होण्याचा संभव असतो. सुरुवातीस पाय डोक्याच्या मागे जमिनीवर टेकत नसतील तर जेथपर्यंत पोहचत असतील तेथेच थांबावे. पाय त्यांच्या वजनाने खाली येतात. पाठीच्या कण्याची लवचिकता रोजच्या सरावाने वाढते व पाय जमिनीस लागतात. पाय जमिनीला लागत असतील तर ते आणखी पुढे सरकवावेत म्हणजे जालंधर बंधासारखी स्थिती होते व एक वेगळीच आंतरिक अवस्था अनुभवास येते.

समीक्षक : नितीन तावडे