अधोजल पुरातत्त्वाची उपशाखा. जहाजबुडीचे पुरातत्त्व म्हणजे पाण्यात बुडलेल्या जलवाहतुकीशी संबंधित सर्व साधनांच्या (Watercrafts) भौतिक अवशेषांचा पुरातत्त्वीय अभ्यास. त्यांत होड्या, प्रवासी व मच्छीमारी नौका, माल, प्रवासी व गुलामांना नेणारी जहाजे आणि युद्धनौका यांचा समावेश होतो. नैसर्गिक (वादळे, सुनामी, हिमनग, बंदरात भरलेला गाळ) व मानवनिर्मित (सदोष बांधणी, कमी प्रतीचे नौकानयन तंत्रज्ञान, जुन्या जहाजांचा अतिवापर, लढाया व आगी लागणे) अशा दोन्ही प्रकारच्या कारणांनी जलवाहतुकीची साधने अपघातग्रस्त होऊन नष्ट होतात. जहाजबुडीचे पुरातत्त्व ही एक स्वतंत्र उपशाखा म्हणून १९५० नंतर प्रस्थापित झाली असली, तरी ज्या काळात (एकोणिसावे शतक) बुडलेल्या नौकांचा शोध घेण्याचा उद्देश खजिना अथवा मौल्यवान प्राचीन वस्तू मिळवणे असा होता, तेव्हापासून पाण्यात बुड्या मारून बुडलेल्या जहाजांवरील सोनेनाणे व इतर माल हस्तगत करण्याचे प्रयत्न केले जात होते.

जहाजबुडीच्या पुरातत्त्वाची अनेक उदाहरणे आहेत आणि नियमितपणे बुडलेल्या नौकांचा शोध घेतला जातो. युनेस्कोच्या नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वज्ञांनी केलेल्या अंदाजानुसार जगभरात लहानमोठ्या आकाराची विविध काळात बुडलेली हजारो जहाजे असून तो जगाच्या इतिहासाकडे बघण्याचा मोठा आणि अद्याप फारसा न वापरलेला स्रोत आहे. बुडलेल्या जहाजांच्या पुरातत्त्वीय अभ्यासाने प्राचीन जगातील आर्थिक उलाढाली, नौका बांधणीचे तंत्रज्ञान, नौकानयनशास्त्र आणि राजकीय व लष्करी व्यवहार यांच्या इतिहासाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. एकट्या भूमध्य समुद्रात उथळ पाण्यात बुडलेली हजारपेक्षा जास्त जहाजे आढळली आहेत. पंधराव्या शतकापासून यूरोपीय देशांनी जगभर जलप्रवास करायला आणि पुढील काळात वसाहती स्थापन करायला प्रारंभ केल्यापासून मालवाहू जहाजांची व युद्धनौकांची वर्दळ सर्व महासागरांमध्ये वाढली. त्याचबरोबर नैसर्गिक कारणांनी बुडलेल्या व नाविक युद्धात बुडवलेल्या जहाजांची संख्या लक्षणीयपणे वाढली. उदा., १४९७ ते १६१२ या सुमारे शंभर वर्षांमध्ये लिस्बनहून निघालेल्या एकूण ८०६ पैकी ६६ पोर्तुगीज जहाजे गोव्याजवळ समुद्रात बुडली होती.

मेरी रोज युद्धनौकेचे संग्रहालयात जतन केलेले अवशेष.

बुडलेली जहाजे क्वचितच संपूर्ण व चांगल्या अवस्थेत असतात. १९ जुलै १५४५ रोजी फ्रेंच नौदलाने एका युद्धात सोलेंट सामुद्रधुनीत (Solent Strait) बुडवलेली मेरी रोज (Mary Rose) ही इंग्लिश युद्धनौका याचे अपवादात्मक उदाहरण आहे. सहसा फुटलेल्या जहाजाचे तुकडे व त्यावरच्या वस्तू तळापाशी पाण्यात विखुरलेल्या अवस्थेत असतात. जहाजबुडीच्या पुरातत्त्वात खोल पाण्याच्या तळाशी बुडलेल्या नौकांचा शोध घेणे, हे सर्वांत जिकीरीचे काम असते. त्यासाठी विविध साधनांचा वापर केला जातो. प्रारंभी सर्वेक्षण करून काही वस्तू गोळा केल्या जातात. त्या नंतर पाण्यात बुड्या मारून उत्खनन केले जाते. उत्खननात मिळालेले जहाजांचे तुकडे, नांगर, सुकाणू व त्यावरील माल (Cargo) यांच्या अभ्यासाने ते जहाज कोणत्या देशाचे असावे, याचा अंदाज घेतला जातो. तसेच बुडलेले जहाज ऐतिहासिक व मध्ययुगीन काळातील असल्यास उपलब्ध अभिलेखीय संदर्भ बघितले जातात. कोणते जहाज कोठे हरवले आहे अथवा बुडले आहे याच्या नोंदी त्यातून मिळू शकतात. काही वेळा बुडलेल्या जहाजावरील वस्तूंवर त्या जहाजाचे नाव असते. तथापि एकाच नावाची अनेक जहाजे असत. त्यामुळे जहाजावर मिळालेल्या वस्तूंचे कालमापन, नांगरांचे प्रकार, जहाजावरील मातीची भांडी, काचेच्या वस्तू, वगैरेंच्या अभ्यासाने जहाजाची ओळख पटवता येते. बुडलेल्या जहाजांवर काय माल होता, हे शोधण्याच्या तंत्रात सतत प्रगती होत आहे. उदा., सन २००४ मध्ये ग्रीसच्या किओस (Chios) या बेटाजवळ उत्खनन केलेल्या जहाजावर मिळालेल्या अम्फोरांच्या आत ऑलिव्ह तेल असल्याचे डीएनए अभ्यासातून लक्षात आले आहे.

तुर्कस्थानातील केप गेलिडोन्या (Cape Gelidonya) येथे समुद्राच्या तळापाशी सन १९५९ मध्ये मिळालेली नौका हे जहाजबुडीच्या पद्धतशीर पुरातत्त्वीय अभ्यासाचे पहिले उदाहरण आहे. ही नौका २७ मीटर खोलीवर बुडलेल्या अवस्थेत मिळाली. या नौकेचे १९६० मध्ये उत्खनन करण्यात आले व ती ताम्रपाषाणयुगीन असून तिचा काळ  इ. स. पू. १२०० असल्याचे निश्चित झाले. एजियन समुद्रात डोकोस बेटाजवळ (Dokos Island) बुडलेल्या जहाजावरील सर्वांत प्राचीन अवशेष सन १९७५ मध्ये आढळले. त्याचे उत्खनन ग्रीसमधील ‘हेलेनिक इन्स्टिट्यूट ऑफ मरीन आर्किऑलॉजीʼ या संस्थेने १९८९ ते १९९२ या काळात केले. त्याचा कालखंड इ. स. पू. २२०० ते २००० असा आहे. या जहाजाचे सर्व भाग नष्ट झालेले असून त्यावरील मातीची फक्त ५०० भांडी तळापाशी मिळाली. त्यात रोमन मद्यकुंभ (अम्फोरा) व माल साठवण्याच्या विविध प्रकारच्या भांड्यांचा समावेश आहे.

उलुबुरून जहाजावरील सोन्याच्या वस्तू.

तुर्कस्थानातील उलुबुरून (Uluburun) भागात स्पंजांसाठी पाण्यात बुड्या मारणाऱ्या स्थानिक लोकांना धातूचे गोळे अथवा इन्गोट (Ingots) सन १९८२ मध्ये मिळाले. त्यांनी त्यांचे ‘धातूची बिस्किटेʼ असे वर्णन केले होते. सन १९८४ ते १९९४ दरम्यान या अवशेषांचे उत्खनन करण्यात आले. पाण्यात ५२ मीटर खोलीवर बुडलेले हे जहाज १५-१६ मीटर लांबीचे असून त्यावर १९ टन वजनाचे तांब्याचे इन्गोट, एक टन वजनाचे कथिलाचे इन्गोट, हत्ती व हिप्पोपोटॅमसचे दात, निळ्या काचेचे १७५ गोळे, आफ्रिकेतून आणलेले काळ्या लाकडाचे ओंडके असा विविध प्रकारचा माल होता. या अवशेषांमध्ये इजिप्शियन धाटणीचे चांदी व सोन्याचे अनेक दागिने मिळाले. त्यात इ. स. पू. चौदाव्या शतकातील इजिप्शियन राणी नेफेरतिती (Nefertiti) हिचे नाव कोरलेला सोन्याचा स्कराब (Scarab-प्राचीन इजिप्तमधील कीटकाच्या आकाराचा दागिना) होता. जहाजावरील लाकडाचे वृक्षवलयमापन पद्धतीने कालमापन इ. स. पू. १३०५ असे झाले. एकत्रित पुरातत्त्वीय पुराव्यांवरून हे जहाज इ. स. पू. चौदाव्या शतकाच्या अखेरीस बुडले असावे, असे अनुमान काढण्यात आले.

सन १९०० मध्ये क्रीटजवळ (ग्रीस) असलेल्या अँटीकायथेरा (Antikythera) या बेटापाशी स्पंजांसाठी पाण्यात बुड्या मारणाऱ्या लोकांना अपघाताने बुडलेल्या जहाजाचा शोध लागला. त्यानंतर १९००-१९०२ मध्ये ग्रीक नौदलाने ४० ते ५० मीटर खोलीवरून काही वस्तू गोळा करून आणल्या. त्यांत तीन पूर्णकृती आकाराचे घोड्यांचे संगमरवरी पुतळे, दागदागिने, नाणी आणि हेराक्लेस या ग्रीक देवाचा सात फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा होता. याच बरोबर ब्राँझचा एक मोठा गोळा मिळाला होता. नंतर तो गोळा म्हणजे एक यंत्र असल्याचे लक्षात आले. खगोलशास्त्रीय गणिते करण्यासाठी वापरले जाणारे हे यंत्र अँटीकायथेरा यंत्र (Antikythera Mechamism) या नावाने प्रसिद्ध आहे. हा प्रगत प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. या यंत्राचा काळ अतीप्राचीन असल्याचे मानून छद्मपुरातत्त्वाच्या समर्थकांनी त्याचा संबंध परग्रहवासीयांशी जोडण्याचा प्रयत्न केल्याने या यंत्राला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. सन २०१२ पासून २०१६ पर्यंत या ठिकाणी नव्याने सर्वेक्षण व उत्खनन करण्यात आले. त्यात आणखी एक जहाज बुडल्याचे दिसून आले. या नवीन उत्खननांमध्ये इतर वस्तूंबरोबरच एक मानवी सांगाडा मिळाला. सन २०१९ मध्ये तेथे आणखी काही सांगाडे मिळाले. पहिल्या उत्खननात मिळालेल्या लाकडी तुकड्यांचे रेडिओकार्बन कालमापन २२० (अधिकउणे ४३) असे करण्यात आले आहे (१९६४).

काळ्या समुद्रात साउदम्पटन विद्यापीठातील संशोधकांना पृष्ठभागापासून सुमारे २ किमी. खोलीवर समुद्रतळाशी सन २०१८ मध्ये एका ग्रीक जहाजाचे अवशेष मिळाले. त्या खोलीवर प्राणवायू नसल्याने हे २३ मी. लांबीचे मालवाहू जहाज बऱ्याचअंशी सुस्थितीत आढळले. त्याचे संशोधन दूरसंचालित मानवरहित वाहक (ROV-Remotely Operated Vehicle) वापरून केले गेले. या जहाजाची रचना प्राचीन ग्रीक भांड्यावरील जहाजाच्या चित्रात दाखवलेल्या प्रकारची आहे. रेडिओकार्बन पद्धतीने या जहाजाचा काळ इ. स. पू. ४०० असा निश्चित झाला असून ते चांगल्या अवस्थेत आढळलेले जगातले सर्वांत प्राचीन जहाज आहे.

जहाजबुडीच्या पुरातत्त्वात गुलामांची वाहतूक करणाऱ्या जहाजांचे विशेष संशोधन करण्यात आले आहे. मॉरिशसमधील गुलामवाहक ले कुरियर (Le Coureur), साव जोसे-पाकेट डी आफ्रिका (São José-Paquete de Africa), फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सन १७०० मध्ये बुडलेले हेनेरिटा मारी (Henrietea Marie), बाल्टिक समुद्रात १७६८ मध्ये बुडलेले फ्रेडेन्सबोर्ग (Fredensborg), पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर १८४१ मध्ये बुडलेले जेम्स मॅथ्यूज (James Mathews) आणि अमेरिकेत आलेले शेवटचे व पुरावा नष्ट करण्यासाठी मुद्दाम १८६० मध्ये जाळून टाकून अलाबामात बुडवलेले गुलामवाहक जहाज क्लोटिल्डा (Clotilda) ही अशा जहाजांची काही पुरातत्त्वीय उदाहरणे आहेत. सर्वच यूरोपीय सत्तांनी नव्या जगात वसाहती स्थापन केल्यानंतर सर्वसाधारणपणे पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आपल्या देशांमधील गुन्हेगारांना मुद्दाम वसाहतींमध्ये पाठवण्याचे धोरण अवलंबले होते. अनेकदा असे गुन्हेगार पाठवले जात ती ’गुन्हेगार जहाजे’ (Convict Ship) बुडत असत. ऑस्ट्रेलियात १८३५ मध्ये बुडलेल्या अशाच एका जहाजाचा (हाइव्ह) पुरातत्त्वीय अभ्यास झालेला आहे.

भारतात जहाजबुडीच्या पुरातत्त्वाची सुरुवात विसाव्या शतकाच्या अखेरीस झाली. भारतात यूरोपीय जहाजे बुडण्याच्या अगोदरच्या नोंदी जवळपास नाहीत. भारतीय संशोधकांनी पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर मिळून पासष्ट ठिकाणी बुडलेली जहाजे असल्याचे सर्वेक्षणातून दाखवून दिले आहे. गोव्यातील सुंची रीफ (Sunchi Reef), सेंट जॉर्जेस रीफ (St. George’s Reef), एमी शोल्स (Amee Shoals), सेल रॉक (Sail Rock), ग्रांड आयलंड (Grande Island)  व गलगीबगा (Galgibaga) येथील बुडलेली जहाजे, कावेरी नदीच्या मुखापाशी पुम्पुहार येथे बुडालेले जहाज, कोणार्क किनाऱ्यापाशी बुडलेली ब्रिटिश शाही नौदलाची एचएमएस कॅरन ही युद्धनौका आणि लक्षद्वीप बेटसमूहातील बंगारम (प्रिन्सेस रॉयलचे उत्खनन), काव्हारट्टी, बायरमगोर रीफ, मिनिकॉय व सुहेली पार रीफ येथील जहाजबुडीच्या पुरातत्त्वाची भारतातील काही उदाहरणे आहेत. भारतात इतरही काही ठिकाणी बुडलेली (उदा. केरळमध्ये अच्युथेंगू येथे मिळालेले विमेनम नावाचे डच जहाज) जहाजे आढळली आहेत; तथापि त्यांचे सखोल पुरातत्त्वीय संशोधन झालेले नाही.

संदर्भ :

  • Gibbins, David & Jonathan, Adams, ‘Shipwrecks and Maritime Archaeologyʼ, World Archaeology, 32(3): 279-291, 2001.
  • Hansson, Maria & Foley, Brendon P. ‘Classical Greek amphoras reveal cargo of 2400-year-old shipwreckʼ, Journal of Archaeological Science, 35(5): 1169-1176, 2008.
  • Soreide, Fredrik, Ships from the depths: deepwater archaeology, College Station : Texas A and M University Press, 2011.
  • Webster, Jane, ‘Slave Ships and Maritime Archaeology: An Overviewʼ, International Journal of Historical Archaeology, 12: 6-19, 2008.

 

                                                                                                                                           समीक्षक : भास्कर देवतारे