दीपवंस : बौद्धांच्या त्रिपिटकातील सुत्तपिटकात अंतर्भूत असलेल्या बुद्धवंस  नामक ग्रंथाच्या धर्तीवर पाली भाषेत जे अनेक वंस-ग्रंथ तयार झाले, त्यांपैकी दीपवंस  हा सर्वप्राचीन होय. पाली वंस-ग्रंथांचे स्वरूप काहीसे बखरींसारखे आहे. गौतम बुद्धाच्या अगोदर, बारा कल्पांच्या कालावधीत एकूण २४ बुद्ध होऊन गेले, असे बौद्ध मानतात. ह्या २४ बुद्धांचा वृत्तान्त बुद्धवंसात आलेला आहे, तर दीपवंसाचा हेतू श्रीलंकेचा – विशेषतः तेथे झालेल्या बौद्ध धर्मप्रसाराचा – इतिहास सांगणे, हा आहे. दीपवंसाचा कर्ता अज्ञात आहे. हा ग्रंथ मुख्यतः पद्यमय असला, तरी त्यात अधूनमधून गद्याचे अवशेष दिसतात. असे गद्यावशेष ह्या ग्रंथात का राहिले असावेत, हा मुद्दा आजही वादग्रस्त आहे. श्रीलंकेतील बौद्धांमध्ये प्रचलित असलेली बरीचशी पारंपरिक माहिती ह्या ग्रंथात एकत्र केलेली आहे. दीपवंसकाराला उपलब्ध झालेली ही मूळ सामग्री पूर्णतः गद्यात होती, पद्यात होती, की गद्यपद्यमिश्रित होती, हे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. इसवी सनाच्या चौथ्या शतकात ह्या ग्रंथाची रचना झालेली असावी. बुद्धघोषाच्या श्रीलंकेतील वास्तव्याच्या काळात (इ. स. पाचव्या शतकाचा पूर्वार्ध) दीपवंस  श्रीलंकेत ख्याती पावलेला होता. श्रीलंकेचा राजा धातुसेन (इ. स. पाचवे शतक) ह्याने दीपवंसाचे सार्वजनिक पठणही घडवून आणले होते.

गौतम बुद्धाची पूर्वपीठिका, त्याने श्रीलंकेस दिलेल्या काल्पनिक भेटी, बौद्धांच्या धर्मसंगीती, दुसऱ्या धर्मसंगीतीनंतर निर्माण झालेले बौद्धांचे विविध संप्रदाय, सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना, त्याचा पुत्र महिंद (महेंद्र) ह्याने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेस दिलेली भेट, तेथील राजा देवानंपियतिस्स ह्याच्या साहाय्याने त्याने केलेले धर्मकार्य, देवानंपियतिस्साच्या निधनानंतर द. भारतातून आलेल्या दमिळ किंवा तमिळ लोकांनी श्रीलंकेवर केलेल्या स्वाऱ्या, पुढे दुट्‌ठगामणी ह्या राजपुत्राच्या नेतृत्वाखाली लोकांनी दमिळांना केलेला कडवा प्रतिकार, दमिळांची हकालपट्टी इ. विषयांचा परामर्श दीपवंसात घेण्यात आला असून श्रीलंकेचा राजा महासेन ह्याच्या कारकीर्दीपर्यंत (इ. स. सु. ३२५-३५२) ह्या ग्रंथातील निवेदन आणण्यात आले आहे.

दीपवंसकाराची भूमिका इतिहासकाराची दिसत असली, तरी ह्या ग्रंथात मुख्यतः दंतकथा-मिथ्यकथा, दैवी चमत्कार इत्यादींचाच भरणा विशेष आहे. अर्थात, त्यांच्या तळाशी इतिहासाचे काही धागे जाणवतात व दंतकथा-मिथ्यकथांच्या गर्दीतून डोळसपणे इतिहास शोधणाऱ्या अभ्यासकांना दीपवंसासारख्या वंस-ग्रंथांचा काही प्रमाणात उपयोग होऊ शकेल.

संदर्भ :

  • https://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/248257