प्रभू येशू ख्रिस्त बारा वर्षांचा असताना ‘बार मित्सवा’ म्हणजे ‘आज्ञांचा पुत्र’ या नावाच्या धार्मिक विधीसाठी वल्हांडण सणाच्या दिवशी जेरूसलेमच्या मंदिरात गेला होता. सण संपल्यानंतर त्याचे आईवडील परतीच्या प्रवासाला लागले. कुमारवयीन येशू वाटेतल्या सोबत्यांबरोबर असेल अशी त्यांची समजूत. दिवसभराची वाट चालून गेल्यावर संध्याकाळी त्यांनी त्याचा शोध सुरू केला. त्यांना तो काही सापडेना, तेव्हा ते जेरूसलेमला परत गेले. तो तर मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना त्यांना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. ह्या प्रसंगात येशूच्या बालपणीच तो एक प्रभावी शिक्षक असल्याची चुणूक आपल्याला दिसते.
अ) अधिकारयुक्त शिकवण : सभास्थानात जाणे हा तर येशूचा परिपाठच बनलेला होता. त्याच्या पहिल्याच प्रवचनाने लोक अचंबित झाले. त्याच्या मुखातून कृपावचने बाहेर पडत होती. ‘हे सर्व ज्ञान ह्याला कोठून प्राप्त झाले?’ असा प्रश्न नाझरेथ ह्या त्याच्या गावातील लोकांना पडला. कारण तो त्यांना शास्त्री-परुशांसारखा नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवीत होता. त्याच्या अधिकारयुक्त शिकवणीला दैवी सामर्थ्याची जोड होती, हे लोकांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे एकीकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याचे ऐकावयास दूरवरून येत होत्या, तर निकोदेम व शिमोनसारखे काही परुशी त्याच्याशी विद्वत्तापूर्ण चर्चा करण्यासाठी येत. मात्र दुसरीकडे मत्सर व हेवा ह्यांनी बरबटलेले शास्त्री-परुशी मंडळींची मने त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न करीत होती.
आ) क्रांतिकारी शिकवण : येशूची शिकवण किती क्रांतिकारी होती हे पाहायचे असेल, तर मत्तयच्या शुभवर्तमानातील त्याची पाच प्रदीर्घ प्रवचने व संत मार्कच्या शुभवर्तमानातील दहा संघर्षांचे प्रसंग अभ्यासणे गरजेचे ठरते.
येशू हा नवा मोशे म्हणून त्याचे चित्र मत्तयने आपल्या वाचकांसमोर सादर केलेले आहे. ‘जुन्या करारा’त मोशेने इझ्राएली लोकांच्या बारा वंशाना जी शिकवण दिली, ती ‘जुन्या करारा’च्या पहिल्या पाच पुस्तकांत (नियमशास्त्रात) देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच येशूने नवे इझ्राएल असलेल्या ख्रिस्तसभेच्या बारा प्रेषितांना जी शिकवण दिली, ती पाच प्रदीर्घ प्रवचनांच्या रूपाने मत्तयने सादर केलेली आहे.
येशूने डोंगरावरील प्रवचनामध्ये आठ धन्योद्गारांबरोबरच दहा आज्ञांचा क्रांतिकारी अर्थ समजावून सांगितलेला आहे. ह्या आज्ञांचे पालन केवळ देखावा म्हणून नव्हे, तर अंत:करणापासून व्हायला हवे असे येशू शिकवितो. आपल्या प्रेषितांना कामगिरीवर पाठविताना तो त्यांना सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी होण्यास सांगतो. परमेश्वराचे राज्य कसे असेल त्याची झलक तो विविध दाखल्यांच्या रूपाने देतो. त्यांतील सात दाखले हे खास देवराज्याचे दाखले म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसमुदायातील आपले जीवन कसे असावे हे शिकविताना तो प्रार्थना व समेट ह्यांचे कानमंत्र देतो. युगाच्या समाप्तीविषयीचा इशारा देताना तो ‘सावध असा’, ‘दक्ष राहा’, ‘जागृत राहा’ असे शब्द पुन:पुन्हा वापरतो. अशाप्रकारे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी नव्हे, तर ते पूर्ण करण्यासाठी आपण आलेलो आहोत, हे तो सिद्ध करतो.
येशूने यार्देन नदीत योहान बाप्तिस्ताच्या हातून बाप्तिस्मा घेतला. चाळीस दिवसांच्या खडतर तपश्चर्येनंतर त्याने गालीलापासून प्रारंभ करून जेरूसलेमपर्यंत सारा इझ्राएल व आसपासचा परिसर पायांखाली घातला. यहुदी लोकांच्या सभास्थानातून, शेता-मळ्यांतून, गल्लीबोळांतून तो देवराज्याची शिकवण देत फिरला. त्याच्या शिक्षणाला मिळणारा जनतेचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद पाहून प्रस्थापितांचे पित्त खवळले. शास्त्री, परुशी, सदुकी, हेरोदीय, मुख्य याजक, वडीलजन ह्यांनी त्याला त्याच्या शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच येशूला पुष्कळदा संघर्षाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांतील दहा प्रसंग संत मार्कने आपल्या शुभवर्तमानातून सादर केलेले आहेत. त्यामधून येशूची आत्मप्रतिमा व त्याची क्रांतिकारी शिकवण डोकावते.
संघर्षाच्या दहा प्रसंगांपैकी पाच प्रसंग गालिलातील; तर पाच प्रसंग जेरूसलेममधील आहेत.
पक्षाघाती माणसाला बरे करताना येशू म्हणतो, ‘‘मुला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे’’. त्यामुळे जेरूसलेमहून आलेले शास्त्री मनातल्या मनात हे दुर्भाषण असल्याचा विचार करतात. परंतु येशू हा साक्षात देव असून त्याला लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार असल्याचे येशू स्पष्ट करतो.
लेवी (मत्तय) नावाच्या एका जकातदाराला आपल्या शिष्यगणांत सामावून घेणाऱ्या येशूवर परुशांतील शास्त्री टीकेची झोड उठवतात. तेव्हा येशूने पापी व जकातदार ह्यांच्या पंक्तीस बसण्याची आपली भूमिका स्पष्ट करताना एक क्रांतिकारी शिकवण दिली. ‘‘निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर ती रोग्यांना असते’’. त्याद्वारे आपण नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना बोलावण्यास आलेलो आहोत, हे त्याने स्पष्ट केले.
योहान बाप्तिस्ताचे शिष्य व परुश्यांचे शिष्य उपवास करीत; परंतु येशूचे शिष्य उपवास करीत नसल्याचे पाहून लोकांनी येशूला त्याविषयी विचारणा करताच केवळ कर्मकांड म्हणून केला जाणारा उपवास (बुरसटलेली विचारसरणी) आणि जीवनात बदल घडवून आणणारा उपवास (नवीन विचारसरणी) ह्यांच्यामधील फरक स्पष्ट करताना उपवास वा उल्हास, ठिगळ व फाटलेले वस्त्र, नवा द्राक्षारस व जुना बुधला ह्यांचे दाखले दिले. त्याद्वारे त्याने नवीन विचारसरणी स्वीकारण्यासाठी अंत:करणाचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे, अशी शिकवण दिली.
येशूच्या कार्यातील संघर्षाचे प्रसंग पुष्कळदा शब्बाथ दिवसाच्या पालनाशी संबंधित असत. त्यांतील दोन प्रसंग मार्क २:२३-३:६ मध्ये सादर करण्यात आलेले आहेत. त्याद्वारे मनुष्य शब्बाथासाठी नव्हे, तर शब्बाथ मनुष्यासाठी आहे व शब्बाथदिवशी एखाद्या माणसाचा जीव वाचविणे हे जीव घेण्यापेक्षा शास्त्राला अधिक प्रमाणात धरून असल्याचे येशूने स्पष्ट केले.
जेरूसलेम हे यहुदी लोकांचे धार्मिक केंद्र मानले जात असे. तिथे असलेल्या मंदिरातून अधिकृत शिकवण दिली जाई. अशा जेरूसलेम मंदिरात जाऊन येशू सर्व प्रथम मंदिराचे शुद्धीकरण करतो आणि तिथे बसून लोकांना शिकवण देतो. त्यामुळे त्याच्या अधिकाराविषयी प्रश्न उपस्थित केला जातो. अशा वेळी येशू योहान बाप्तिस्ताचा बाप्तिस्मा माणसांपासून होता की स्वर्गापासून, असा प्रतिप्रश्न विचारून आपल्या विरोधकांना कोंडीत पकडतो व आपल्याला थेट स्वर्गापासून हा अधिकार मिळाल्याचे सूचित करतो.
याशिवाय कैसराला कर देण्याविषयी, पुनरुत्थानाविषयी, सर्वांत मोठ्या आज्ञेविषयी, ख्रिस्त हा दावीदचा पुत्र असण्याविषयी, येशूला अनुक्रमे परुशी व हेरोदीय, सदूकी, शास्त्री ह्यांनी प्रश्न विचारले. त्या संघर्षमय प्रसंगांत ‘कैसराचे ते कैसराला देताना देवाचे ते देवाला देणे’ आपण विसरू नये, पुनरुत्थित माणसाच्या गरजा शारीरिक (लग्न) नसून आध्यात्मिक (देवदूत) असतात आणि देवप्रीती व शेजारप्रीती ह्या दोन आज्ञांमध्ये सर्व आज्ञांचा समावेश आहे, अशी क्रांतिकारी शिकवण येशूने दिली.
इ) बोधपर शिकवण : दाखले–येशूच्या श्रोत्यांमध्ये बहुतांश लोकही सर्वसामान्य जनता होती. आपली शिकवण त्यांना समजावी, त्यांच्या दैनंदिन जीवनाला ती त्यांना लागू करता यावी, या हेतूने येशूने दाखल्यांच्या रूपाने ती लोकांसमोर सादर केली. त्यासाठी येशूने तत्कालीन लोकजीवनाचे बारकाईने अवलोकन करून त्यावर सखोल मनन-चिंतन केल्याचे दिसून येते.
येशू हा स्वत: सुताराचा पुत्र होता; परंतु शेतकरी, कोळी (मासेमारी करणारे), माळी, कामकरी, बी-बियाणे, दिवा-दिवठणी, जाळे-मासे, मोहरीचा दाणा व तुतीचे झाड, मेंढपाळ आणि मेंढरे, द्राक्षवेल आणि फाटे, वाळू आणि खडक, मीठ आणि प्रकाश, पीठ आणि खमीर, गहू आणि निंदण, नवा द्राक्षारस आणि जुना बुधला, अंजिराच्या झाडाची डहाळी आणि उन्हाळा, लग्नाची मेजवानी आणि नवरदेवाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या कुमारिका, शेतात लपविलेली ठेव आणि मौल्यवान मोती, सुज्ञ कारभारी आणि दुष्ट माळी, न्यायाधीश आणि विधवा, परुशी आणि जकातदार, श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री भिकारी, वादी आणि प्रतिवादी ह्यांचे चांगले निरीक्षण करून येशूने त्यांना आपल्या दाखल्यांमध्ये गुंफलेले आहे.
दाखल्यांची वर्गवारी – आपल्या दैनंदिन व्यवहारातील या घटकांचा वापर करून येशूने धार्मिक, आध्यात्मिक वा पारमार्थिक सत्य बोधपर गोष्टींच्या रूपाने आपल्या श्रोत्यांसमोर सादर केले. अशा बोधपर गोष्टींसाठी ग्रीक भाषेत ‘पाराबोले’ (parabole) असा शब्द आहे. त्यावरून इंग्रजीत ‘पॅराबल’ (Parable) असा शब्द रूढ झालेला आहे. मराठीत त्यासाठी ‘दाखला’ किंवा ‘दृष्टान्त’ असे शब्द वापरले जातात. असे येशूने दिलेले ५० हून अधिक दाखले चारही शुभवर्तमानांत देण्यात आलेले आहेत. योहानाच्या शुभवर्तमानात उत्तम मेंढपाळ व खरा द्राक्षवेल अशी दोन बिरुदे येशू स्वत:साठी वापरतो. त्यांना खऱ्या अर्थाने उपमा किंवा रूपके म्हणता येईल. मत्तय, मार्क व लूक ह्यांच्या शुभवर्तमानांत मात्र पुष्कळसे दाखले संग्रहित करण्यात आलेले आहेत. त्यांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे : १) ८ दाखले तिन्ही शुभवर्तमानात आढळतात, २) १३ दाखले मत्तय व लूक ह्यांच्या शुभवर्तमानातच आढळतात, ३) ११ दाखले फक्त मत्तयच्या शुभवर्तमानात आढळतात, ४) १४ दाखले फक्त लूकच्या शुभवर्तमानात आढळतात, ५) २ दाखले फक्त मार्कच्या शुभवर्तमानात आढळतात (४:२६-२९; १३:३३-३७), ६) २ दाखले (रूपक/उपमा) फक्त योहानच्या शुभवर्तमानात आढळतात (अध्याय १० व १५), ७) १ दाखला फक्त मत्तय (१५:१०-२०) आणि मार्क (७:१४-२३) ह्यांच्या शुभवर्तमानात आढळतो.
दाखल्यांचे विषय : आपल्या बोधपर शिकवणुकीतून येशूने देवराज्य/स्वर्गराज्य, देव-मानव परस्परसंबंध, धनी-द्राक्ष परस्परसंबंध, श्रद्धावंत, प्रार्थना, धनदौलत आणि अखेरचा न्याय असे विविध विषय हाताळलेले आहेत. त्यांतून क्षमा, पश्चात्ताप, शेजारप्रीती, नम्रता, आनंद, नियोजन, शुद्धता, दयाळूपणा, विश्वासूपणा, दक्षता, एकनिष्ठा, दूरदृष्टी, आज्ञाधारकपणा, संवेदनशीलता, उद्यमशीलता आणि सुज्ञता अशा सद्गुणांची जोरदार शिफारस त्याने केलेली आहे.
- देवराज्य/स्वर्गराज्य : परमेश्वर माणसाच्या हृदयाच्या जमिनीत देवराज्याचे वचन पेरतो. सैतान ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र जमिनीत पेरलेले बी जसे माणसाच्या नकळत वाढत जाते, त्याप्रमाणे मोहरीच्या दाण्याएवढे लहान भासणारे देवराज्य बघता बघता व्यापक बनते. खमिरामुळे फुगण्याऱ्या पिठाप्रमाणे ते वाढत जाते. मात्र त्यासाठी माणसाने काळाची लक्षणे ओळखायला हवीत, परमेश्वराचे आमंत्रण स्वीकारायला हवे, त्यासाठी पूर्वतयारी करायला हवी, त्याचे मूल्य ओळखायला हवे आणि त्यासाठी योग्य ती किंमत मोजण्याची तयारी ठेवायला हवी, असे येशू शिकवितो.
- देव-मानव परस्परसंबंध : परमेश्वर मानवावर किती अपार प्रेम करतो आणि त्या प्रेमाला माणसाने कसा प्रतिसाद द्यायला हवा ते येशू पाच वेगवेगळ्या दाखल्यांद्वारे दर्शवितो. हा प्रेमळ परमेश्वर उत्तम मेंढपाळासारखा असून तो हरवलेल्या मेंढराच्या शोधात असतो. पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल त्याला आनंद होतो. तो त्याला क्षमा करून त्याचा स्वीकार करतो. मात्र माणसानेदेखील हा नातेसंबंध टिकवून ठेवावा म्हणून येशू द्राक्षवेल व काटे ह्यांचे रूपक स्पष्ट करतो.
- मानवाचा बरा-वाईट प्रतिसाद : माणसाने सुखी व्हावे, सार्वकालिक आनंद उपभोगावा, पापांपासून मुक्त असावे म्हणून परमेश्वर त्याला आपली तारणयोजना प्रकट करतो. मात्र, माणूस एखाद्या जागृत द्वारपालासारखा, विश्वासू द्राक्षासारखा, कर्तव्यदक्ष चाकरासारखा किंवा कर्ज माफ झालेल्या कृतज्ञ दासासारखा वागत नाही, तर दुष्ट माळ्यांसारखा देवाची योजना धुडकावून लावतो, दुष्ट दासासारखा आपल्या सहकार्यांना त्रास देतो, निष्ठूर दासासारखा भोवतीच्या दासांशी (इतरांशी) निर्दयपणे वागतो अथवा द्राक्ष मळ्यातील कामकर्यांप्रमाणे इतरांच्या कामाविषयी कुरकुर करतो.
- अस्सल श्रद्धावंत : देवराज्यातील आपला अनुयायी कसा असावा त्याविषयी येशूने एकूण बारा दाखले दिलेले आहेत. त्यात त्याने आपल्या मनाचे नूतनीकरण करावे (नवा द्राक्षारस – नवा बुधला), सर्वांना प्रकाश द्यावा, पृथ्वीचे मीठ बनावे, डोळस वाटाड्या बनण्यासाठी प्रथम स्वत:मध्ये सुधारणा करण्यास झटावे, चांगल्या झाडाप्रमाणे चांगली फळे द्यावीत, श्रद्धेच्या भक्कम पायावर आपल्या जीवनाची इमारत उभारावी, जीवनात उचित भूमिका घ्यावी, आज्ञाधारकपणे जगावे, चांगल्या शोमरोन्याप्रमाणे चांगला शेजारी बनावे, नम्रता, नियोजन आणि नव्या-जुन्याची सांगड हे सद्गुण जोपासावेत असे येशू शिकवितो.
- प्रार्थनामय जीवन : प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी शुद्ध अंत:करणाची गरज असते, हे पटवून देण्यासाठी जे आतून बाहेर पडते, ते माणसाला भ्रष्ट करते आणि अपुऱ्या सुधारणेमुळे दुष्ट आत्मा माणसाची अवस्था पूर्वीपेक्षा अधिक दयनीय करतो हे येशू स्पष्ट करतो. शिवाय प्रार्थना करताना जिद्द, चिकाटी सोडू नये आणि कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता आपण सर्वदा प्रार्थना करावी तसेच प्रार्थनेमध्ये केवळ आपल्या स्वत:चेच कर्तृत्व देवापुढे मांडू नये, तर नम्रपणे आपल्याला त्याच्या दयेची व कृपेची गरज आहे, हे सतत मान्य करावे, असे येशू शिकवितो.
- धनदौलतीचा वापर : कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, आपली संपत्ती वाढली म्हणून माणसाने ऊतू नये; मातू नये, आपल्या श्रीमंतीत गोरगरिबांची आठवण करावी, आपल्याकडील द्रव्याचा सदुपयोग शहाणपणाने करावा, अशी शिकवण येशूने विविध दाखल्यांद्वारे दिलेली आहे.
- अखेरचा न्याय : पृथ्वीवरील भौतिक जीवन जगत असताना एक दिवस आपल्याला परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे हे स्पष्ट करतानाच येशू आपल्याला संघर्षाऐवजी समेटाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतो.
थोडक्यात, येशूच्या दाखल्यांमधून दैनंदिन जीवनातील ज्ञात गोष्टींच्या आधारे अज्ञात (रहस्यमय) सत्याची उकल करण्यात आलेली आहे.
संदर्भ :
- Harrington, Daniel J. Jesus : A Historical Portrait, Mumbai, 2009.
- Hultgren, Arland J. The Parables of Jesus, Michigan, 2000.
- Mckenzie, John L. Dictionary of the Bible, Banglore, 2002.
- Pereira, Francis, Jesus : The Human and Humane Face of God, Mumbai, 2000.
- Wood, D.R.W. New Bible Dictionary, England, 1996.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया