आलोक : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार आसाराम लोमटे यांचा कथासंग्रह. शब्द पब्लिकेशन मुंबई कडून २०१० मध्ये हा कथासंग्रह प्रकाशित झाला असून २०१६ साली या कथासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चिरेबंद, ओझं, खुदळण, कुभांड, जीत, वळण ही या कथासंग्रहातील कथांची शीर्षके आहेत. उपेक्षित, दुर्लक्षित, नागवलेल्या, चेहरा नसलेल्या तळपातळीवरच्या वंचित माणसाच्या व्यथा, वेदना, आकांत लोमटे यांनी या कथांतून मांडला आहे. याच जाणिवेतून या कथासंग्रहातील प्रत्येक कथा मुखरित झाली आहे. वर्तमानातल्या जगण्याचा धारदार कालपट ह्या कथा मांडतात. भवतालातल्या वास्तवाचा केवळ वेधच ह्या कथा घेत नाही तर त्यातील सत्याचा शोध घेतात. या कथासंग्रहातील कथांनी माणसाचे मन विदीर्ण होते, अस्वस्थ होते. पिचलेल्या, भरडलेल्या, चेहरा नसलेल्या माणसाच्या अस्तित्वाची लढाई किती जीवघेणी आहे याचे विदारक दर्शन ह्या कथा घडवतात. या कथासंग्रहातील कथांमधून आलेलं गाव रम्य नाही, गाव आहे मात्र ते भग्न, भुंड्याटेकाडासारखं, भेगाळलेलं आहे. यातील कथांमध्ये शोषक आणि शोषित असे दोन वर्ग येतात.

या कथा पिचलेल्या, नाकारलेल्या माणसांचे दुःख मांडतात. त्याच वेळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमीभावाचे प्रश्न, ऊसतोडणीची समस्या, शेतकरी संघटनेचे आंदोलन प्रश्नाला वाचा फोडून त्यातील सत्याचा शोधही या कथांमधून घेतला आहे. गावपातळीवरील गटबाजी, निवडणुका, सत्तासंघर्ष, जातीय समीकरणाचे राजकीय आशयद्रव्ये ह्या कथा साकारतात. या कथांमध्ये कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, कामगार अशा अभावग्रस्त माणसांची स्वप्न, त्यांची जगण्यासाठी चाललेली धडपड, त्यातून अंगावर येणारे दाहक वर्तमान ह्या बाबी अचूक टिपल्या आहेत. या कथासंग्रहातील ‘चिरेबंदी’ या कथेतील आत्मचिंतन, ‘ओझं’ मधील आत्महत्या केलेल्या शेतकरी भावासोबत प्राध्यापक असणाऱ्या भावाने केलेला संवाद, ‘खुदळणं’ मधील दत्तरावचे निवेदन,  ‘कुभांड’ मधील दलित गवळण बाईचा उद्ध्वस्त झालेला संसार, ‘जीत’ मधील सत्तेपायी रंग बदलणाऱ्या राजकारणाची कथा आणि ‘वळण’मधील शिक्षणासाठीची परवड आणि तगमग हे या कथासंग्रहातील ऐरणीचे विषय आहेत. करमणूक, भव्यदिव्यता, कल्पनारम्यता यापलीकडे वास्तववादी जीवनदृष्टीने या कथा अभिव्यक्त झाल्या आहेत. बोलीभाषेसह या कथा जिवंत चित्रण, कथासूत्र, पात्रचित्रण, संवाद, घटकांची गुंफण या सर्व निवेदन तंत्राने युक्त आहेत. या कथासंग्रहातील भाषेला अस्सल मराठवाडी मातीच्या रस, रूप, गंधाची झालर लाभली आहे. दररोजच्या बोलण्यात येणारे वाक्प्रचार, म्हणी, प्रतिमा, प्रतिके तर कधी लोमटेंनी स्वतः घडवलेले वाक्प्रचार, म्हणी यातून ही बोलीभाषा अधिक समृद्ध झाली आहे.

या कथासंग्रहातील कथा कृषीजन संस्कृतीचे दर्शन घडवत वाचकाला अस्वस्थ करतात आणि खेड्याला आतून पोखरणाऱ्या प्रवृत्तींचे दर्शन घडवितात. स्वतःचा चेहरा आणि आवाज नसलेला माणूस या कथांच्या केंद्रस्थानी आहे. या कथा जीवनाशय, नवे आत्मभान आणि आविष्कार या तीनही पातळ्यांवर आधुनिक ठरतात. या कथासंग्रहाला पारंपरिक ग्रामीण कथेची सीमारेषा लावून मर्यादित करता येणार नाही. व्यापक अर्थाने या कथा आजच्या ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आशयघन व स्वयंभू कथा आहेत. या कथासंग्रहातील चिरेबंद आणि वळण या कथांचा कन्नड भाषेत अनुवाद झाला असून प्रकाश भातम्ब्रेकरांनी हिंदी भाषेत या कथासंग्रहाचा अनुवाद केला आहे (२०२०).

संदर्भ :

  • लोमटे, आसाराम, आलोक, शब्द पब्लिकेशन, मुंबई २०१०.