दिलीपकुमार : (११ डिसेंबर १९२२ – ७ जुलै २०२१). भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या पंक्तीतील अग्रणी नाव. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होय. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर (सध्या पाकिस्तान) येथे झाला. त्यांची आई आयेशा बेगम आणि वडील लाला गुलाम सरवार खान हे फळांचे व्यापारी होते. दिलीपकुमार यांच्यासह बारा भावंडांचा विस्तृत कुटुंबविस्तार असलेल्या या परिवारात त्यांचे पालनपोषण झाले. त्यांचे कुटुंब १९३० मध्ये मुंबई (बॉम्बे) येथे स्थलांतरित झाले. त्यांनी आपले शालेय शिक्षण नाशिकजवळील इगतपुरीच्या बर्नीस बोर्डिंग स्कूलमधून घेतले. पुढे १९४० मध्ये वडिलांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी घर सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात करार पद्धतीवर काही काळ मिलिटरी कँन्टीनमध्ये काम करून ते पुन्हा घरी परतले. वडिलांना आर्थिक मदत करता यावी, यासाठी ते काम शोधत असताना त्यांची भेट तत्कालीन प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मसानी यांच्याशी झाली (१९४३). त्यांनी दिलीपकुमार यांना प्रसिद्ध चित्रपट निर्मितीसंस्था बॉम्बे टॉकीजमध्ये काम करण्यास सुचविले आणि बॉम्बे टॉकीजच्या मालक अभिनेत्री देविका राणी यांनी त्यांना महिना साडेबाराशे रुपये पगारावर अभिनेता म्हणून कामावर रुजूही करून घेतले. याच दरम्यान देविका राणी यांच्या आग्रहावरून त्यांनी स्वतःचे नाव बदलून दिलीपकुमार हे नाव अंगिकारले. बॉम्बे टॉकीजमधील प्रवेश त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. इथूनच त्यांचा अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा झाला.

भारतीय चित्रपट क्षेत्रात ‘मेथड ॲक्टिंग’ हा प्रकार रुजवणारे ते पहिलेच अभिनेते होते. संवाद पाठांतरापेक्षा भूमिका उठावदार करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून दिग्दर्शक सत्यजित राय यांनी त्यांना ‘मेथड किंग’ अशी पदवी दिली. व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरून भूमिका जगण्याची त्यांची हातोटी वादातीत होती. त्यांच्या सुरुवातीच्या दाग, देवदास, फुटपाथ, संगदिल, शिकस्त यांसारख्या संवेदनशील शोकांतिका त्यांनी इतक्या तन्मयतेने रंगवल्या, की काही काळ ते नैराश्याच्या गर्तेत गेले होते व त्यासाठी त्यांना मानसोपचारतज्ञांची मदत घ्यावी लागली होती. 

शोकांत, प्रगल्भ, अवखळ, संयत, तरल अशा अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी नटलेल्या आणि ६५ पेक्षा जास्त चित्रपट नावावर असलेल्या दिलीपकुमार यांच्या देदीप्यमान कारकिर्दीची सुरुवात १९४४ च्या बॉम्बे टॉकीजनिर्मित ज्वार भाटा या चित्रपटापासून झाली. तत्पूर्वी ते हिंदी व उर्दू भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे कथालेखन आणि पटकथा लेखनास मदत करत असत. ज्वार भाटा मोठ्या पडद्यावर फारसा यशस्वी ठरला नाही; परंतु १९४७ मध्ये आलेल्या मिलन चित्रपटातील अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर आलेल्या जुगनू या चित्रपटाने मोठे यश मिळवले. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितले नाही. १९४८ यावर्षी त्यांचे शहीदमेला हे दोन चित्रपट लागोपाठ यशस्वी ठरले. १९४९ मध्ये मेहबूब खान दिग्दर्शित अंदाजमध्ये ते राज कपूर आणि नर्गीस या प्रसिद्ध कलाकारांसोबत झळकले. त्याचवर्षी बी. मित्र दिग्दर्शित शबनम चित्रपटात त्यांनी अभिनेत्री कामिनी कौशलसोबत भूमिका साकारली. हे दोनही चित्रपट त्या काळात प्रचंड गाजले. विशेष म्हणजे शबनम चित्रपटानंतर अनेकांनी दिलीप कुमार यांच्या शैलीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली होती. 

१९५० चे दशक हे दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरले. या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक यशस्वी व प्रसिद्ध चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या. त्यांमध्ये मुख्यत्वे जोगन, दाग, दीदार, शिकस्त, उडन खटोलादेवदास, नया दौर, मधुमती  इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. १९५२ मध्ये आलेल्या दाग चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९५५ च्या शरतचंद्र चटोपाध्याय यांच्या प्रसिद्ध कांदबरीवर आधारित बिमल रॉय दिग्दर्शित देवदास हा खूप गाजलेला चित्रपट आजही भारतीय चित्रपटकालखंडातील मैलाचा दगड म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची नंतरच्या काळात अनेक आवर्तने निघाली; परंतु दिलीपकुमार यांनी केलेली देवदासची भूमिका सर्वोच्च पातळीवरील अभिनयासाठी आजही प्राधान्याने स्मरली जाते. देवदास  या अतिशय गाजलेल्या शोकांतिकेत वैफल्यग्रस्त व्यसनाधीन तरुणाची अप्रतिम भूमिका साकारल्यानंतर चाहत्यांकडून त्यांना ‘ट्रॅजेडी किंग’ असे नामाभिधान देण्यात आले. मेहबूब खान दिग्दर्शित आन  (१९५२) या चित्रपटामध्ये त्यांनी हलके-फुलके स्वरूप असलेली तसेच आजाद (१९५५) व कोहिनूर (१९६०) या चित्रपटांत अनुक्रमे विनोदी आणि प्रणयप्रधान अशा विविधरंगी भूमिका त्यांनी साकारल्या. 

१९६० साली दिलीपकुमार यांनी के. आसिफ दिग्दर्शित मुगल-ए-आझम (मुगले आझम) या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महत्त्वाकांक्षी व अतिभव्य आणि खर्चिक चित्रपटात मोगल साम्राज्याचा राजकुमार आणि अकबर बादशाहाचा मुलगा सलीम याची भूमिका साकारली. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक चित्रपट ठरला. त्यांचे या चित्रपटातील शहजादा सलीम याची प्रेयसी असलेल्या ‘अनारकली’ या नर्तिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुबालासोबतचे वास्तव जीवनातील अयशस्वी प्रेमप्रकरण देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. 

नितीन बोस दिग्दर्शित गंगा जमना (१९६१) या चित्रपटाचे लेखन व निर्मिती स्वत: दिलीप कुमार यांनीच केली होती. या चित्रपटात त्यांनी भोजपुरी भाषेचा लहेजा उत्तमरीत्या वठवला. सलीम-जावेद लिखित आणि बहुचर्चित दिवार या चित्रपटाच्या लेखनावर गंगा जमनाच्या मूळ लेखनाचा खूप प्रभाव होता. साठच्या दशकात आलेला राम और शाम हा चित्रपट वगळता लीडर, दिल दिया दर्द लिया, आदमी यांसारख्या अयशस्वी चित्रपटांमुळे त्यांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी बैरागमध्ये तिहेरी भूमिका लीलया निभावली (१९७६). नायक म्हणून हे त्यांचे शेवटचे दर्शन होते. १९७६ ते १९८१ पर्यंत त्यांनी चित्रपटांतून पाच वर्षांचा दीर्घ विराम घेतला. नंतर मनोज कुमार दिग्दर्शित क्रांती चित्रपटातील चरित्र भूमिकेमार्फत त्यांनी पुनरागमन केले (१९८१). यापुढे त्यांनी शक्ती, दुनिया, विधाता, मशाल, सौदागर यांद्वारे आपल्या सशक्त अभिनयाचा पुन:परिचय दिला. त्यावेळी कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या व सुपरस्टार ही उपाधी लाभलेल्या अमिताभ बच्चन यांसारख्या कसलेल्या तरुण अभिनेत्यासोबतची जुगलबंदी रमेश सिप्पींच्या शक्तीद्वारे गाजली. तर सुभाष घई यांच्या सौदागरद्वारे आपल्या विशिष्ट संवादफेकीसाठी लोकप्रिय असलेल्या राजकुमार यांच्यासोबतचा दिलीपकुमार यांचा सामना प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. अश्रूंची झाली फुले या प्रसिद्ध मराठी नाटकावर आधारित असलेल्या यश चोप्रांच्या मशालमधील त्यांची उतारवयात परिस्थितीवश गुन्हेगारी जगताकडे ओढल्या गेलेल्या आदर्श शिक्षकाची भूमिका अभिनयातला एक आदर्श म्हणून ओळखली जाते. किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता (१९९८).

दिलीपकुमार २००० ते २००६ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. तसेच मुस्लिम समाजाच्या प्रगतीकरिता सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. दिलीपकुमार १९६६ मध्ये अभिनेत्री सायरा बानू यांच्याशी विवाहबद्ध झाले. दोघांच्या वयातील २२ वर्षांचे अंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळा बनले नाही. अपत्यप्राप्तीच्या ओढीमुळे त्यांनी आसमा रहमान यांच्याशी १९८१ मध्ये दुसरा विवाह केला; पण १९८३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि ते सायरा बानू यांच्यासोबत राहिले. त्यांना विविध भाषा शिकण्याची आवड होती. त्यांचे हिंदी आणि उर्दू या भाषांव्यतिरिक्त मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, गुजराती या भारतीय; तर पश्तुन व पर्शियन या आंतरराष्ट्रीय भाषांवरही प्रभुत्व होते. 

दिलीपकुमार यांना अनेक पुरस्कार मिळाले. यात अनुक्रमे दाग, आझाद, देवदास, नया दौर, कोहिनूर, लीडर, राम और श्याम आणि शक्ति या चित्रपटांसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून मिळालेल्या आठ फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. याचबरोबर १९९३ मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल १९९१ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. १९९४ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील असामान्य कामगिरीबद्दल ‘दादासाहेब फाळके’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ या भारताच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. १९९७ मध्ये पाकिस्तान सरकारनेही त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान-ए-इम्तियाज’ देऊन त्यांचा सत्कार केला. 

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील उत्तुंग प्रतिभेच्या या अभिनेत्याचे वयाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्षी वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले.

           समीक्षक : संतोष पाठारे