महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सातमाळा डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून ३६५३ फूट उंचीवर आहे. नाशिक-सापुतारा मार्गावरील हातगड या पायथ्याच्या गावापासून गडावर पोहोचता येते.

हातगड, नाशिक.

पायथ्याच्या हातगडपासून चढून वर गेले असता किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाचे अवशेष दिसतात. या दरवाजाजवळ एक पाण्याचे टाके असून जवळच हनुमंताचे शिल्प कोरलेले आहे. या द्वारावर दोन देवनागरी शिलालेख, तसेच एक शरभशिल्प आहे. या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसतो. या दरवाजाजवळच नव्याने उजेडात आलेला आणखी एक देवनागरी लिपीतील १६ ओळींचा शिलालेख आहे. दूसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याचा खडकात कोरून काढलेला तिसरा भुयारी दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा असून तिचा वापर पहारेकऱ्यांना बसण्यासाठी केला जात असे. या गुहेच्या कातळावर गणेशशिल्प, तर गुहेच्या समोरील बाजूस हनुमानाचे शिल्प आहे. येथून काही पायऱ्या चढून वर गेले असता किल्ल्याचा खडकात कोरलेला चौथा दरवाजा लागतो. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यास किल्ल्यावर प्रवेश होतो. जवळच एक शिवपिंड आहे. दरवाजासमोर असलेला उंचवटा म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला मानला जातो. किल्ल्याच्या पश्चिमेकडील टोकावर एक कोरडे टाके व पीर असून तटबंदीत ठिकठिकाणी तोफांच्या माऱ्यासाठी जागा आहेत. जवळच एक चोर दरवाजा आहे. मुख्य दरवाजा जवळून पूर्वेकडे जाताना वाटेत अनेक घरांचे अवशेष दिसतात. येथून पुढे तटबंदीत एक कमानयुक्त वास्तू असून त्या समोरच एक जुनी वास्तू आहे. जवळच बुरुजासारखे बांधकाम असून हे धान्य कोठार असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. या बुरुजाशेजारी एक लांब रुंद तलाव असून याच्या मध्यभागी दगडी खांब उभा आहे. या टाक्याच्या बाजूला सुस्थितीत असणारी धान्यकोठाराची इमारत आहे.

किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. या किल्ल्याचे हस्तगिरी, हतगादुर्ग, हतगड असे विविध नामोल्लेख सापडतात. यातील ‘हस्तगिरी’ हा उल्लेख बागूल राजांच्या दरबारातील रुद्र कवी विरचित राष्ट्रौढवंशम महाकाव्यम  या ग्रंथात सापडतो. हा किल्ला १५४७ मध्ये निजामशाहीतून बागूल राज्यकर्त्यांच्या ताब्यात असल्याचे शिलालेखावरून दिसते. मोगलांच्या १६३८ मधील बागलाण मोहिमेत औरंगजेबाच सरदार सईद अब्दुल वाहाब खानदेशी याने भिकुजी मोहिते याच्याकडून हा किल्ला जिंकून मोगल साम्राज्यात आणला. हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या १६७० नंतरच्या बागलाण मोहिमेत स्वराज्यात दाखल झाला असावा; परंतु याबाबत पुरावे सापडत नाहीत. १७५४-५५ मध्ये येथील किल्लेदार खोजा महमदौला याने हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला, तेव्हा त्यास काही इनाम दिल्याची नोंद सापडते. १७५८-५९ च्या एका पत्रानुसार हतगड किल्ल्यावर १७५ हशमांची नेमणूक असल्याचे दिसते. १७६८ मधील एका पत्रानुसार पेशव्यांची फौज रघुनाथरावांच्या पाठलागवर असताना रघुनाथरावांच्या काही लोकांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. १७७३ च्या एका पत्रात येथील किल्लेदार खोजे दायम यास बागलाणमधील कळवण हा गाव इनाम दिलेला होता. १८०३-०४ मध्ये झालेल्या बंडात येथील अधिकारी खांडेराव त्रिंबक यास किल्ल्याच्या परिसरातील घटमार्ग दगड-धोंडे व झाडे टाकून बंद करण्याची आज्ञा दिलेली होती.

संदर्भ :

  • Gazetteer of Bombay Presidency (District Nasik), Government Central Press, Bombay, Nasik, 1883.
  • खरे, ग. ह. संपा., ऐतिहासिक फार्सी साहित्य, खंड २, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३७.
  • बोरोले, अमित, दुर्गभ्रमंती नाशिकची, स्नेहल प्रकाशन, पुणे, १९१२.

                                                                                                                                                                                          समीक्षक : सचिन जोशी