गोवा राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला. तो तेरेखोल नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून मार्ग उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून वेंगुर्ले, रेडी मार्गे येथे पोहोचता येते, तर गोव्यातून पणजी, अरंबोळ, केरी मार्गे तेरेखोलची खाडी बोटीतून ओलांडून यावे लागते. गोव्यातील पेडणे गावाच्या वायव्येला सु. २० किमी. अंतरावर हा किल्ला आहे, शिवाय सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथून गाडी रस्त्याने किल्ल्यापर्यंत पोहोचता येते.

तेरेखोल किल्ला संपूर्ण जांभा दगडात बांधलेला व सुस्थितीत असून किल्ल्याचे दोन भाग आहेत. समुद्र सपाटीपर्यंत उतरत जाणारा किल्ल्याचा परिसर आणि बालेकिल्ला. या किल्ल्याच्या बांधकामावर पोर्तुगीज शैलीची छाप दिसून येते. किल्ल्याचे नव्याने बसवलेले लाकडी प्रवेशद्वार पूर्वेकडील तटबंदीमध्ये असून या प्रवेशद्वारासमोर गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक आहे. गडाचे दरवाजे जुनेच असून वैशिष्ट्यपूर्ण अशा दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर एक मोठा पेटारा, बाजूच्या भिंतीवर दोन भाले आणि किल्ल्याचा नकाशा लावलेले दिसतात. प्रवेशमार्ग नागमोडी वळणाचा असून उजवीकडे असणाऱ्या कमानयुक्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश होतो. समोर मोठे प्रांगण असून यात डावीकडे पोर्तुगीज धाटणीचे सेंट अँथोनी चर्च दिसते. जवळच एक मोठा क्रॉस (ख्रिस्ती धर्म प्रतीक) असून त्याच्या पायाशी संगमरवरी दगडावर कोरलेला शिलालेख आहे.
किल्ल्यातील लोकांना राहण्यासाठी तटबंदीत अनेक खोल्या (अलंगा) बांधलेल्या दिसून येतात. किल्ल्याला चार बाजूंना भक्कम बुरूज असून ईशान्येकडील व वायव्येकडील बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्यांची रचना दिसून येते. प्रत्येक बुरुजावर पोर्तुगीज बांधणीचे वैशिष्ट्य असलेल्या बीजकोषाच्या (कॅप्सूल) आकाराच्या खोल्या दिसून येतात. किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस दुमजली बांधकाम असून त्या मागे दोन छोटे बुरूज आहेत. दक्षिणेकडील पायऱ्या उतरून खाली गेले असता खाडीच्या काठावर जांभ्यात बांधलेले दोन बुरूज आहेत.
तेरेखोल किल्ला सावंतवाडीकर खेम सावंत भोसल्यांनी १७ व्या शतकात बांधला असून देशी बोटी आणि सैनिकांसह खेम सावंतांचे मोठे सैन्य तेरेखोल नदीच्या काठावर तैनात असे. प्रारंभी या किल्ल्यात १२ बंदुकधारी, छावणी आणि छोटे प्रार्थनास्थळ होते. १७४६ मध्ये गोव्याच्या ४४व्या विरजईच्या (व्हॉइसरॉय) नेतृत्वाखाली पेद्रो मिगेल दे अल्मेडा, पोर्तुगाल इ व्हेस्कॉन्सिलस, तसेच कोंडे दे असुमर, मार्किस दे अलोर्ना यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करण्यासाठी खेम सावंतांविरुद्ध मोहीम उभारली. २३ नोव्हेंबर १७४६ रोजी दे अल्मेडा याने नदीच्या पात्रात आपल्या बोटी आणून सावंतांच्या आरमाराविरुद्ध युद्ध छेडले. या युद्धात पोर्तुगीजांनी खेम सावंतांचा पराभव केला. या विजयानंतर किल्ला पोर्तुगीजांसाठी समुद्री संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनला. १७६४ मध्ये बांधलेला मूळ किल्ला पोर्तुगीजांनी पाडला व त्यांच्या यूरोपियन रचनेप्रमाणे पुन्हा बांधला. किल्ल्याची पूर्णतः डागडुजी केल्यानंतर १७८८ मध्ये तेरेखोलचा गोव्यात अधिकृत रीत्या समावेश केला गेला. १७९६ मध्ये हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला; परंतु काही काळातच तो परत पोर्तुगीजांकडे गेला. १९५४ साली पोर्तुगीजांनी हा किल्ला व आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी येथे एक चौकी वसवली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी भारतातील त्यांच्या ताब्यातील भागासाठी स्थानिक माणसाला विजरई नेमायचे ठरविले. त्याप्रमाणे डॉ. बर्नार्डी पेरेस डि सिल्वा ह्याला सन १८२० च्या दशकात विजरई नेमले गेले. पण लवकरच सन १८२५ मधे अंतर्गत कलहामुळे त्याने पोर्तुगालपासून वेगळे होत स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचे ठरवले; तथापि त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. किल्ल्यावर पोर्तुगीजांचाच ताबा राहिला. पराभवामुळे व्हॉईसरॉय डि सिल्वा नंतर गोव्यात कधीच परतला नाही. त्यानंतर पोर्तुगीजांनी कधीही स्थानिक माणसाकडे विजरईचे पद दिले नाही. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला एक दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला. त्या वेळी पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले. शेवटच्या काही वर्षांत गोवा मुक्ती संग्रामामुळे पोर्तुगीजांनी हा किल्ला जवळपास बेवारसपणे सोडला होता. पोर्तुगीज-मराठा झटापटींतील काही वर्षे सोडली, तर सन १९६१ च्या गोवा मुक्ती आंदोलनापर्यंत म्हणजे सु. २१५ वर्षे हा किल्ला पोर्तुगीजांकडेच राहिला. १९६१ मध्ये भारतीय उपखंडातून पोर्तुगीज गेल्यावर हा किल्ला भारताच्या ताब्यात आला.
सांप्रत या किल्ल्याचे रूपांतर प्राचीन वारसा स्थळ (हेरिटेज रिसॉर्ट) मध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या अंतर्गत भागाचे संवर्धन झाले आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते.
संदर्भ :
- Shirodkar, P. P. Fortresses and Forts of Goa, Directorate of Art and Culture Govt. of Goa, 2011.
- तेंडूलकर, महेश, गोव्यातील पर्यटन, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१०.
समीक्षक : सचिन जोशी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.