(ब्रिंजल). एक फळभाजी. वांगे ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम मेलोंजेना आहे. सो. मेलोंजेना ही जाती रानवांगी म्हणजे सो. इंसानम या वन्य जातीपासून उत्पन्न झाली आहे. बटाटा, टोमॅटो व मिरची या वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहेत. वांग्याचे मूलस्थान भारत असून नंतर या वनस्पतीचा प्रसार चीन, यूरोप आणि अमेरिका येथे झालेला दिसून येतो. ही वनस्पती केवळ उष्ण हवामानात वाढते. वांगे या वनस्पतीची लागवड मुख्यत: तिच्या फळांसाठी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये रानवांगी म्हणजे सो. इंसानम ही जाती आढळते. तिची फळे लहान व कडू असतात.
वांग्याचे झुडूप ४०–१५० सेंमी. उंच वाढते. खोड नाजूक आणि काटेरी असून वनस्पतीचे सर्व भाग केसाळ असतात. पाने साधी, १०–२० सेंमी. मोठी, एकाआड एक, दोन्ही पृष्ठभाग केसाळ व खंडित किनारीची असतात. फुले निळसर जांभळी असून ती एकेकटी किंवा २ ते ५ च्या गुच्छांत येतात. पुंकेसर पिवळे असतात. मृदुफळे ३–३० सेंमी. लांब, मृदू, अनष्ठिल, अंडाकृती किंवा लांबट असून त्यांचा रंग पांढरा, हिरवट पिवळा, गडद जांभळा असतो. फळाबरोबर वाढणारा पुष्पमुकुट म्हणजेच निदलपुंज जाड असतो आणि फळाबरोबर टिकून राहतो. बिया अनेक, मऊ व खाद्य असतात. बियांमध्ये तंबाखूसम निकोटिनॉइड असते. त्यामुळे बिया चवीला कडू असतात.
वांग्याचा उपयोग मुख्यत: फळभाजी म्हणून होतो. भारतात वांग्याचा उपयोग सांबार, चटणी, करी, लोणचे यांसाठी केला जातो. तसेच वांग्याचे भरीत आणि भरली वांगी अशा पदार्थांचा समावेश भारतीय आहारात अनेक ठिकाणी होतो. १०० ग्रॅ. वांग्यामध्ये ९२% पाणी, ६% कर्बोदके आणि १% प्रथिने असतात; मेदाचे प्रमाण अत्यल्प असते. वांग्यामध्ये खनिजेही, विशेषकरून मँगॅनीज, असतात. फळांचा आकार, आकारमान व रंग यांनुसार वांग्याचे विविध प्रकार आहेत. भारतात वांग्याचे सर्वाधिक प्रकार लागवडीखाली आहेत. बाजारात मुख्यत: सो. मे. एस्कूलेंटम, सो. मे. सर्पेंटिनम आणि सो. मे. डिप्रेसम हे तीन प्रकार आढळतात. गंगा, यमुना या नद्यांच्या प्रदेशात वजनाने सु. १ किग्रॅ. असलेली वांगी पिकवली जातात, तर अन्यत्र वजनाने कमी असलेली वांगी पिकवली जातात. जांभळ्या रंगाच्या वांग्याच्या बाहेरील आवरणात अँथ्रोसायनीन-नासुनीन हे प्रति-ऑक्सिडीकारक आढळते.
जैवतंत्रज्ञान तंत्राचा वापर करून वांग्याची ‘बीटी वांगी’ ही जाती विकसित करण्यात आली असून या जातीमध्ये बॅसिलस थुरिंजेन्सीस या जीवाणूची जनुके समाविष्ट करण्यात आली आहेत. लेपिडॉप्टेरा गणातील ल्यूसीनोड्स ऑर्बोनॅलिस या खोड पोखरणाऱ्या पतंगांना रोध करण्यासाठी आणि हेलिकोव्हर्पा आर्मिगेरा या फळे पोखरणाऱ्या पतंगांपासून वनस्पतीचे रक्षण करण्यासाठी बीटी वांगी ही जाती निर्माण केलेली आहे.