ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे कुशभद्रा नदीच्या मुखाजवळ असून कोणार्कच्या सूर्यमंदिरापासून पूर्वेला ११ किमी. अंतरावर आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावरील अनेक प्राचीन बंदरांपैकी एक प्रमुख बंदर होते. टॉलेमीच्या जिओग्राफीया या इ. स. दुसऱ्या शतकातील ग्रंथात ओडिशाच्या किनाऱ्यावरील पुरी, कटक व कोणार्कसह अनेक बंदरांचा उल्लेख आहे; तथापि त्यात खलकत्तापटणा उल्लेख नाही. त्याप्रमाणे चिनी प्रवाशांच्या वर्णनात व अरबांच्या काळातील साहित्यात खलकत्तापटणा या बंदराबद्दल माहिती आढळत नाही.
खलकत्तापटणा १९८४ पर्यंत अज्ञात होते. कोणार्क-पुरी हमरस्त्याच्या कामाच्या वेळी ते उजेडात आल्यावर तेथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने १९८४-८५ व १९९४-९५ असे दोन वेळा उत्खनन केले. रस्त्याच्या कामासाठी माती उकरून नेल्याने पुरातत्त्वीय स्थळाच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले होते. खलकत्तापटणा उत्खननात जमिनीवर विटांचा थर असलेला माल चढवण्याचा व उतरवण्याचा धक्का सापडला. पुरावस्तूंमध्ये चिनी मातीची खापरे, पांढऱ्या व चॉकलेटी रंगाची चमकदार झिलई असलेली मातीची भांडी, भाजलेल्या मातीच्या वस्तू, काचेच्या बांगड्यांचे तुकडे, भाजलेल्या मातीचे मणी आणि तांब्याची चिनी नाणी यांचा समावेश होता. उत्खननात मिळालेल्या या सर्व पुराव्यांवरून खलकत्तापटणाचा कालखंड इ. स. बारावे ते पंधरावे शतक असा निश्चित करण्यात आला आहे. कुशभद्रा नदीचे मुख खलकत्तापटणापासून सुमारे तीन किमी. असल्याने खाडीच्या भागात जहाजांना सुरक्षित जागा उपलब्ध होती. त्यामुळे हे बंदर भरभराटीस आले असावे व तेथून चीनसह पूर्वेकडील देशांशी आणि पर्शियाच्या आखातातील देशांशी व्यापार चालत असे. सोळाव्या शतकातील नकाशांमध्ये खलकत्तापटणाच्या पूर्वेस असलेल्या माणिकपटणा या बंदराचा उल्लेख आहे; परंतु खलकत्तापटणाचा नाही. यावरून असे दिसते की, सोळाव्या शतकापर्यंत खलकत्तापटणाचे महत्त्व संपुष्टात आले असावे; तथापि खलकत्तापटणासंबंधी एकूणच पुरावे अतिशय अल्प (फक्त पुरातत्त्वीय) असल्याने असे होण्याचे कारण समजू शकले नाही.
सन २०१४ मध्ये गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमधील पुरातत्त्वज्ञांनी खलकत्तापटणा येथील नदीकिनारा व बंदरांचा उपग्रह प्रतिमा वापरून अभ्यास केला आणि पुन्हा एकदा कुशभद्रा नदीच्या मुखाजवळ सर्वेक्षण केले. अगोदरच्या उत्खननांमध्ये मिळालेल्या पुरावस्तू खलकत्तापटणा व आजूबाजूच्या परिसरात आढळून आल्या. खलकत्तापटणा येथे गाळ साचण्याचे प्रमाण खूप आहे, तसेच नदी काठांची धूप होते. त्यामुळे खलकत्तापटणाचे सागरी पुरातत्त्वीय वारसास्थळ नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संदर्भ :
- IAR : Indian Archaeology – A Review 1984-85 and 1995-95, Archaeological Survey of India, New Delhi.
- Tripati, Sila; R. Mani Murali; Seelam, Jaya Kumar; Pradhan, Atula Kumar; Behera, Rudra Prasad & Choudhury, Richa, ‘Khalkattapatna port : the lost archaeological heritage of Odisha, east coast of Indiaʼ, Current Science, 109(2): 372-377, 2015.
समीक्षक : शंतनू वैद्य