(सी-गल). एक समुद्र पक्षी. सागरी कुरव या पक्ष्यांचा समावेश पक्षिवर्गाच्या कॅरॅड्रिफॉर्मिस गणाच्या लॅरिडी कुलात केला जातो. त्यांच्या १० प्रजाती आणि सु. ५७ जाती आहेत. त्यांनाही ‘कुरव’ म्हणतात. त्यांच्या अनेक जाती स्थलांतर करणाऱ्या असून हिवाळ्यात हे पक्षी उष्ण प्रदेशाकडे स्थलांतर करत असल्याने जगात ते सर्वत्र आढळतात. भारतात त्यांच्या क्रोइकोसेफॅलस ब्रुनिसेफॅलस, क्रो. रिडिबंडस, क्रो. जेनाय, इक्इटस इक्इटस अशा काही जाती आढळून येतात. शिवाय उत्तरेतील सायबीरिया व इतर प्रदेशांतून काही कुरव भारतात स्थलांतर करतात.
सागरी कुरव आकारमानाने मध्यम ते मोठे असतात. त्यांच्यातील लहान कुरव (हायड्रोकोलियस मिनिटस) पक्ष्याचे वजन सु. १२० ग्रॅ. आणि लांबी सु. २९ सेंमी. असते. काळ्या पाठीचा मोठा कुरव (लॅरस मॅरिनस) पक्ष्याचे वजन सु. २ किग्रॅ. आणि सु. ७६ सेंमी. लांब असते. बहुतेक सर्वच कुरवांचा रंग राखाडी किंवा पांढरा असून डोके किंवा पंखावर काळे ठिपके असतात. पाय लांब असून बोटांमध्ये पडदे असतात. जवळपास सर्व कुरवांचा आकार सारखा असतो. त्यांचे पंख व मान लांब असते. त्यांच्या तीन जाती सोडल्या, तर सर्व कुरवांची शेपटी टोकाला गोलाकार असते; इतर जातींमध्ये शेपटी दुभंगलेली किंवा पाचरीसारखी असते. त्यांची चोच जाड, मजबूत व लांब असते. चोचीचा रंग पिवळा असून मोठ्या कुरवांमध्ये चोचीवर लाल ठिपके असतात; लहान जातींमध्ये लाल, तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. जबडा मोठा असल्याने मोठ्या आकाराचे भक्ष्य ते खाऊ शकतात. पूर्ण वाढलेल्या सागरी कुरवांचे शरीर सफेद रंगाचे असून त्यावर फिकट ते गडद काळा पिसारा असतो. डोके संपूर्ण पांढरे किंवा काळे असते. प्रजननकाळात त्यांच्या डोक्यावरील पिसांच्या रंगात बदल होतो.
काळ्या पाठीचा मोठा कुरव (लॅरस मॅरिनस)
सागरी कुरव समुद्रकिनारी तसेच जमिनीवर खूप दूर असलेल्या पाणथळ जागी जमिनीवर घरटे करून राहतात आणि ते क्वचितच समुद्राकडे जातात. मोठ्या कुरव पक्ष्यांच्या पंखांचा विस्तार सु. चार वर्षांत, तर लहान कुरव पक्ष्यांचे पंख दोन वर्षांत वाढतात. पांढऱ्या डोक्याचे कुरव जास्त वर्षे जगतात; हेरिंग जातीचे कुरव ४९ वर्षे जगल्याची नोंद आहे. ते साधे तसेच समुद्राचे पाणी पितात. त्याची चोच व डोक्याच्या वरच्या भागात असलेल्या क्षारग्रंथीमुळे शरीरातील अतिरिक्त क्षार वरच्या जबड्यात उघडणाऱ्या नलिकेमधून शरीराबाहेर टाकले जातात. ते गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातील मासे, मृदुकाय, कंटकचर्मी तसेच लहान प्राणी, इतर पक्ष्यांची अंडी, कीटक, कुजणारे मांस-मासे, वनस्पतींच्या बिया व फळे खातात. मृत मासे खाऊन ते परिसर स्वच्छ ठेवतात. पाण्यात बुडी मारून, ध्यानस्थ बसून किंवा आमिष दाखवून ते मासे पकडतात. पायांच्या पडद्याने पाणी खेचून त्यात आलेले प्राणी चोचीने ते पकडून खातात. शिंपल्यातील कालवे खाण्यासाठी ते शिंपले चोचीत धरून एखाद्या खडकावर उंचीवर उडत राहतात आणि शिंपला चोचीतून सोडतात. शिंपले खडकावर पडले की, फुटतात आणि त्यातील कालव ते खातात. त्यांच्या काही जाती दुसऱ्या प्राण्यांनी केलेली शिकार पळवितात आणि खातात.
सागरी कुरवांच्या बहुतेक सर्व जाती स्थलांतर करतात. प्रत्येक जातीत स्थलांतराचा कालावधी वेगवेगळा आहे. फ्रँक्लिन कुरव ही जाती कॅनडापासून खाली दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापर्यंत स्थलांतर करते. काही जाती अगदी थोड्याच अंतरावर स्थलांतर करतात, तर काही त्यांच्या अंडी घालण्याच्या परिसराभोवतीच घिरट्या घालून परत येतात. जगातील सर्व खंडांत, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका प्रदेशातही त्यांचे प्रजनन होते. उष्ण प्रदेशात ते कमी आढळतात; मात्र त्यांच्या काही जाती गालॅपागस बेटावर आढळल्या आहेत. कुरवांच्या काही जाती समुद्रकिनारी, तर काही जमिनीवर नद्या, सरोवरे, तलाव अशा जलाशयांलगत प्रजनन करताना दिसतात. कुरव सहसा वर्षात एकदाच प्रजनन करतात.
कुरव वसाहतीने राहत असल्याने त्यांची घरटी दाटीवाटीने असतात; त्यामुळे वसाहतीत नेहमीच कोलाहल असतो. विणीचा हंगाम ३–५ महिन्यांचा असतो. जमिनीवर वनस्पतींनी शाकारलेल्या घरट्यात मादी अंडी घालते. विणीच्या हंगामाअगोदर चार-पाच वेळा ते वसाहतीचा फेरफटका मारतात. नर-मादी आयुष्यभर सोबत राहतात. मादी एका वेळेस २–३ अंडी घालते; काही जातींमध्ये मादी एकच अंडे घालते. अंडी नर-मादी मिळून उबवितात. २२–२६ दिवसांनंतर अंड्यातून पिले बाहेर येतात. पिलांना अन्न भरविण्याचे कार्य नर करतो, तर मादी घरट्याचे व पिलांचे संरक्षण करते. अंड्यातून पिले बाहेर पडल्यानंतर ती तत्काळ हिंडूफिरू लागतात. घरट्यावर किंवा पिलांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर अनेक कुरव मिळून प्रतिकार करतात आणि पळवून लावतात. सागरी कुरवांचे आयुर्मान साधारणत: २० वर्षांचे असते.