कवचधारी गोगलगाय

मृदुकाय (मॉलस्का) संघाच्या उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात गोगलगायींचा समावेश होतो. गोगलगायींचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरावर असणारी कवचे. मात्र कवच नसलेल्या किंवा अगदी छोटे कवच असलेले प्राणीही एक विशिष्ट प्रकारच्या गोगलगायी आहेत. इंग्रजी भाषेत कवचधारी गोगलगायींना ‘स्नेल’ म्हणतात, तर बिनकवचाच्या गोगलगायींना ‘स्लग’ म्हणतात. यांच्या सु. ३५,००० जाती असून प्राणिसृष्टीतील कीटक वर्गाच्या खालोखाल यांचा क्रमांक लागतो. अधिवास, आकार, वर्तन, बाह्यरचना आणि आंतररचना यांमध्ये विविधता आढळते. स्नेल व स्लग यांच्यातील मुख्य फरक म्हणजे स्नेल आपले संपूर्ण शरीर कवचात आकसून घेऊ शकते. स्लगला मात्र कवच जवळजवळ नसल्याने तसे करता येत नाही. स्लग आणि स्नेल हे दोघेही उभयलिंगी असतात; परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसर्‍यांशी संग करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणार्‍या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून प्रौढ प्राणी डिंभ अवस्थेतून न जाता परस्पर निर्माण होतात.

गोगलगायी जवळजवळ सर्वत्र म्हणजे नदी, तळी, समुद्रात आणि जमिनीवर सापडतात. समुद्री गोगलगायी जमिनीवरील गोगलगायींच्या तुलनेत संख्येने जास्त आहेत. गोगलगायींच्या डोक्यावर स्पृशा आणि डोळे असतात. ती आपल्या स्नायुपादातून श्लेष्म स्रवत घसरत पुढे सरकते. यामुळे घर्षणाचा अडथळा कमी होतोच, याशिवाय टोकदार वस्तूंपासून तिचे संरक्षण होते. ती पुढे सरकते तेव्हा श्लेष्म्याचा पट्टा दिसतो. तिचे डोळे सरळ असतात. काही जातींमध्ये हे डोळे तिच्या स्पर्शकांवर असतात. तिला वासासाठी व स्पर्शज्ञानासाठी अधिक स्पर्शके असतात. डोक्याच्या खालच्या बाजूस तोंड असते. रिबनसारख्या जिभेवर दंतपट्टिका असतात. यात शेकडो दात असून त्याचा उपयोग अन्नचर्वण करताना कानशीसारखा केला जातो.

गोगलगायीला कोरड्या वातावरणापेक्षा दमट वातावरण अधिक मानवते. हिवाळ्यात जमिनीवरील गोगलगाय वातावरण कोरडे झाल्यास स्वत:ला कवचात आकसून घेते व पाऊस पडेपर्यंत निष्क्रिय राहते. ही तिची शीतकालीन समाधी असते.

स्लग व स्नेल दोघेही प्राणी, तसेच वनस्पती यांवर गुजराण करतात. जमिनीवर राहणार्‍या गोगलगायी कुजणार्‍या वनस्पतींवर जगतात. पाण्यातील गोगलगायी जलवनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. कोवळी पाने तसेच अंकूर खाऊन जगणार्‍या गोगलगायी बागेत दिसतात. राक्षसी गोगलगायींनी द्राक्षबागांमध्ये पाने कुरतुडून खाऊन त्यांचा विध्वंस केल्याची उदाहरणे आढळून आली आहेत. प्राण्यांना खाणार्‍या गोगलगायींना मजबूत दात असतात. काही गोगलगायी तर चक्क मासे खातात. दंतपट्टिकेवरील एका मोठ्या विषदंताने विष टोचून त्या माशांना विकलांग करतात आणि मग खातात. काही प्रजातींतील गोगलगायी मल किंवा शवभक्षकही असतात. वृक्षांवर राहून सालीवर व पानांवर वाढलेली दगडफुले खाऊन जगणार्‍या गोगलगायी भडक रंगाच्या व अत्यंत सुंदर असतात.

अनेक देशांत गोगलगायींचा आहारात समावेश केला जातो. यूरोपात अनेक सागरी गोगलगायींच्या जातींपासून चविष्ट पदार्थ तयार करतात. मात्र गोगलगायींच्या काही जाती विषारी आहेत. अनेक गोगलगायी कृमिवाहक असल्यामुळे माणसाला अपायकारक ठरतात.