(सी-स्नेक). सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील समुद्रात राहणाऱ्या सापांना सागरी सर्प म्हणतात. इलॅपिडी कुलाच्या हायड्रोफिनी उपकुलात त्यांचा समावेश केला जातो. जगात त्यांच्या १७ प्रजाती व ६९ जाती आहेत. सर्व सागरी सर्प विषारी असतात. त्यांचे विषदंत लहान आकाराचे व जबड्याच्या मागील बाजूस असतात. पॅसिफिक महासागरात तसेच हिंदी महासागरात सागरी सर्प आढळून येतात. मात्र अटलांटिक महासागरात, तसेच तांबड्या समुद्रात ते आढळत नाहीत. ते जलचर असून पाण्यात राहण्यासाठी त्यांच्यात अनुकूलन घडून आलेले असते. भारताच्या किनाऱ्यालगत मुख्यत: ॲस्ट्रोशिया, एन्हायड्रिना, हायड्रोफिस, कोल्पोफिस आणि पेलॅमिस प्रजातीचे सागरी सर्प आढळतात. त्यांची पेलॅमिस प्लॅटुरस ही जाती सर्वत्र आढळून येते. त्यांना सागरी साप असेही म्हणतात.
सागरी सर्पाचा आकार मध्यम असून लांबी १.२–१.५ मी. असते. त्यांच्या हायड्रोफिस स्पायरॅलिस जातीचे साप ३.० मी.पेक्षा अधिक लांबीचे आढळून आले आहेत. सामान्यपणे सागरी सापांचे शरीर चपटे असून शेपटी वल्ह्यासारखी चपटी असते आणि पोहण्यासाठी अनुकूलित झालेली असते. शरीरावर खरबरीत खवले असतात. मात्र पोटाच्या बाजूला खवले नसतात. त्यामुळे त्यांना जमिनीवर हालचाल करता येत नाही. त्यांच्यापैकी केवळ लॅटिकौडा प्रजातीच्या सापांच्या पोटांवर खवले असतात आणि ते जमिनीवर वावरू शकतात. सागरी सापांना कल्ले नसतात. त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर अधूनमधून यावे लागते. नाकपुड्यांमध्ये पाणी बाहेर टाकण्यासाठी ऊतींपासून बनलेल्या स्पंजासारख्या झडपा असतात. त्यांचे फुप्फुस लांब म्हणजे जवळजवळ शरीरभर असते. फुप्फुसाचा शेपटीकडील भाग श्वसनक्रियेऐवजी तरंगण्यासाठी तसेच पाण्यात खोलवर जाताना हवा साठविण्यासाठी उपयोगी पडतो. डोळे लहान असतात; डोळ्यांच्या बाहुल्या गोल असतात.
सागरी सर्प समुद्राच्या उथळ पाण्यात, लहान बेटांभोवती तसेच नदीमुखांत आढळतात. काही जाती खारफुटीच्या दलदली आणि मचूळ पाण्यात आढळून येतात. समुद्रात ते चपळपणे पोहतात; मात्र जमिनीवर किंवा वाळूत त्यांना वेगाने हालचाल करता येत नाही. मासे, लहान आकाराचे खेकडे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. भक्ष्य पकडण्यासाठी ते १०० मी. खोल पाण्यात जातात. सतत समुद्रात राहिल्यामुळे त्यांच्या आहारात व रक्तात अधिक क्षार असतात. अतिरिक्त क्षार बाहेर टाकण्यासाठी सागरी सापांच्या जिभेखाली क्षारग्रंथी असतात. सागरी सापांचे विष जमिनीवरील सापांपेक्षा अधिक जहाल असते. त्यांच्या विषाचा मासे व खेकडे यांच्यावर त्वरित परिणाम होतो.
सागरी सर्प दिवसा तसेच रात्री क्रियाशील असतात. अनेकदा सकाळी तसेच दुपारी उन्हं खाताना दिसतात आणि डिवचले तर नाहिसे होतात. बऱ्याचदा माशांच्या जाळ्यात अडकल्यामुळे ते जमिनीवर येतात. अशा वेळी त्यांच्या हालचाली अनियंत्रित होतात आणि एखाद्या हालणाऱ्या वस्तूला ते दंश करतात. सागरी साप चावल्याने वेदना होत नाहीत; पण विषाच्या परिणामामुळे स्नायू विघटन व पक्षाघात होतो. त्यांच्या दंशाने मानव मृत झाल्याची उदाहरणे कमी आहेत. भारतातील सागरी सापांच्या विषावर प्रतिविष उपलब्ध नाही. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगत आढळणाऱ्या सु. ३२ जातीच्या सागरी सापांच्या दंशावर प्रतिविष तयार केले गेले आहे.
विणीच्या हंगामात नर आणि मादी यांचा समागम खोल पाण्यात होतो. केवळ लॅटिकौडा ही अंडज जाती वगळता सर्व सागरी सर्प अंडजरायुज आहेत. सागरी सर्पाची मादी एक ते पाच पिलांना जन्म देते. पिले पाण्यात जन्माला येतात आणि आयुष्यभर पाण्यात राहतात.