ली, हार्पर : (२८ एप्रिल १९२६ – १९ फेब्रुवारी २०१६ ). नेल हार्पर ली. पुलित्झर पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार. तिचा जन्म अलाबामा येथील मोनरोविले येथे झाला. नेल चार भावंडात सर्वात धाकटी. तिचे वडील अमासा कोलमन ली हे पूर्वीचे वृत्तपत्र संपादक, व्यापारी आणि वकील होते. १९२६ ते १९३८ या काळात ते अलाबामा राज्य विधानसभेचे सदस्य होते. सुप्रसिद्ध कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. ली तिच्या वडिलांचे पूर्वज होते. १९४४ मध्ये नेलने पदवी संपादन केली. एक वर्ष मॉंटगोमेरीच्या हंटिंगटन महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर तिने कायद्याचे शिक्षण घ्यावे अशी तिच्या वडिलांची इच्छा असल्यामुळे तिने तुस्कॅलूसा येथील अलाबामा विद्यापीठात प्रवेश घेतला, परंतु पदवी संपादन करण्यापूर्वीच तिने शिक्षण सोडले. १९४९ मध्ये ती न्यूयॉर्क शहरात राहायला गेली. काही काळ तिने पुस्तकांच्या दुकानात व नंतर विमान आरक्षण प्रतिनिधी अशा नोकऱ्या केल्या. १९५६ मध्ये तिच्या हितचिंतकांनी तिला आर्थिक मदत केली, ज्यामुळे तिला संपूर्ण वेळ लेखनाला देता आला. १९६० मध्ये टू किल अ मॉकिंगबर्ड ही तिची सुविख्यात कादंबरी प्रकाशित झाली. १९६२ नंतर नेल प्रकाशझोतापासुन लांबच राहिली. काही लेख वगळता १९६० नंतर तिने काहीच लेखन केले नाही. १९५९ मध्ये बालपणीचा मित्र ट्रुमन कॅपोट (अमेरिकन लेखक) याच्या इन कोल्ड ब्लड या पुस्तकाच्या संशोधनासाठी तिने बरीच मदत केली. १९६६ मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी नेलला नॅशनल कौन्सिल ऑन द आर्ट्स मध्ये नियुक्त केले. २००५ मध्ये लॉस एंजेलिस सार्वजनिक ग्रंथालय साहित्य पुरस्कार व कला क्षेत्रात वकिलांचे सकारात्मक चित्रण केल्याबद्दल तिला एटीटीवाय असे पुरस्कार मिळाले. २००६ मध्ये नॉट्रे दाम विद्यापीठाने तिला मानद पदवी दिली. २००७ मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी तिला प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच २०१० मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तिला कला क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकेतील सर्वोच्च मानले जाणारे नॅशनल मेडल ऑफ आर्टस् प्रदान केले.
१९५७ मध्ये नेलने तिची कादंबरी जे. बी. लिप्पिंकोट कंपनीला पाठवली. १९६० मध्ये ही कादंबरी टू किल अ मॉकिंगबर्ड नावाने प्रसिद्ध झाली. ही कादंबरी नेलच्या वडिलांनी केलेल्या २ कृष्णवर्णीय आरोपींच्या बचावासाठी केलेल्या अयशस्वी प्रयत्नाच्या सत्यकथेवर आधारित आहे. याच काळात अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी चळवळ जोर पकडत होती. त्यामुळे कादंबरी विभाजनवाद्यांमध्ये वादग्रस्त ठरली. १९६२ मध्ये या कादंबरीचे रूपांतर चित्रपटात केले गेले. ग्रेगरी पेक यांना ऍटीकसच्या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. २०१८ मध्ये ब्रॉडवेवर याचे नाटकही प्रदर्शित झाले. ही कादंबरी ४० पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. या कादंबरीची नायिका ही ६ वर्षाची जीन लुईस फिंच (उर्फ स्काऊट) असून तिचे वडील ऍटीकस फिंच हे वकील असतात. स्काऊट व तिचा भाऊ जेम यांना ऍटीकस कडून सामाजिक न्याय आणि करुणा या तत्त्वांचे बाळकडू मिळाले असल्यामुळे वांशिक भेदभाव त्या दोघांच्यातही उद्भवत नाहीत. हे त्यांच्या घरी कामाला असलेल्या कृष्णवर्णीय कॅल्पर्निया व बू रॅडली या शेजाऱ्याशी झालेल्या मैत्रीमध्ये दिसून येते.
ऍटीकसकडे टॉम रॉबिन्सन ह्या कृष्णवर्णीय आरोपीच्या बचावाची कामगिरी जज टेलर सोपवतात. टॉमवर मायेला एवेल ह्या गोऱ्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असतो. इतर गोऱ्या लोकांचा रोष पत्करून ऍटीकस टॉमच्या बचावासाठी सज्ज होतात. टॉम निर्दोष असून मायेलाच त्याच्याकडे आकर्षित झाली व त्याने तिच्या कामोत्सुकतेला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याच्यावर खोटा आरोप केला गेल्या असल्याचे ऍटीकस सिद्ध करतात. मात्र ज्युरी टॉमला अपराधी घोषित करतात. बदनामी झाल्यामुळे मायेलाचा पिता टॉम, ऍटीकस आणि जज टेलर यांच्यावर सूड उगवण्याचा कयास बांधतो. शाळेतून घरी परतणाऱ्या स्काऊट व जेमवर तो हल्ला करतो परंतु त्यांच्या बचावाला अनपेक्षितपणे बू रॅडली येतो व मुलं सुखरूप घरी येतात. बू रॅडलीला लोकांसमोर न आणता त्याचा एकांत जपण्याचा निर्णय शेरीफ टेट व ऍटीकस घेतात.
ह्या कादंबरीची कथा व थोड्या प्रमाणात त्यातील काही पात्रेही नेलच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित आहेत. उदाहरणार्थ, स्काऊट व जेम चा मित्र डिलयाची व्यक्तिरेखा ट्रुमन कॅपोट यावर बेतली आहे. बू रॅडली व त्याच्या कुटुंबाचे वर्णन नेलच्या घराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबावरून घेतलेले आहे. ही कादंबरी प्रथमदर्शनी जरी सामाजिक असमानतेविरुद्व पुकारा करत असली तरी काही जणांच्या मते त्यातील संदेश आता पुन्हा पडताळून पाहण्याची वेळ आली आहे. समाजाचे निर्बल घटक हे केवळ इतरांच्या दयेवर अस्तित्व टिकू शकतात हा संदेश, वर्णद्वेषाचे दुष्परिणाम दाखवण्यापेक्षा गोऱ्यांची बाजू सांभाळून घेण्याचा जास्त प्रयत्न, ऍटीकसचे भुलवणारे सादरीकरण व त्यामागे दडलेला त्याचा छुपा वर्णद्वेष या सर्वांचा फेरविचार होणे गरजेचे आहे असे समीक्षकांचे मत आहे.
२०१५ मध्ये गो सेट अ वॉचमन या नावाची कादंबरी नेलची वकील टॉन्या कार्टर आणि एजन्ट अँड्रू नुरनबर्ग यांनी प्रकाशित केली. टू किल अ मॉकिंगबर्डचा क्रमबद्ध भाग म्हणून सांगितल्या जाणाऱ्या या कादंबरीबद्दल पुढे वादंग निर्माण झाला. प्रकाशकांनी आता स्वीकारले आहे की ही कादंबरी टू किल अ मॉकिंगबर्डचा पहिला मसुदा आहे. नेलच्या जे. बी. लिप्पिंकोट कंपनी मधील टे होहॉफ या संपादिकेने त्यात नेलकडून बदल करवून घेतले व टू किल अ मॉकिंगबर्ड या स्वरूपात ती कादंबरी प्रकाशित झाली. कृष्णवर्णीयांच्या हक्कांचा समर्थक अॅटिकस या पुस्तकात वर्णद्द्वेषी म्हणून चित्रित केला गेला असल्यामुळे वाचकांकडून त्याचे सकारात्मक स्वागत झाले नाही. समीक्षकांच्या मते मात्र ह्या कादंबरीतील ऍटीकसची व्यक्तिरेखा ही टू किल अ मॉकिंगबर्ड मधील व्यक्तिरेखेपेखा वास्तवाशी जास्त सुसंगत वाटते.
२००७ मध्ये तिला पक्षाघात आल्यामुळे ती जीविकाश्रय सुविधा संस्थेमध्ये (Assisted living Facility) राहू लागली. वयाच्या ८९ व्या वर्षी तिचे निधन झाले.
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Go_Set_a_Watchman, on May 17, 2021
- https://en.wikipedia.org/wiki/Harper_Lee, on May 16, 2021
- https://en.wikipedia.org/wiki/To_Kill_a_Mockingbird_(film), on May 17, 2021
- https://ncte.org/blog/2017/11/lets-stop-pretending-kill-mockingbird-progressive-race/, on May 25, 2021
- https://www.britannica.com/biography/Harper-Lee, on May 16, 2021