अठराव्या शतकात सातारकर छत्रपतींच्या अंमलाखालील प्रदेशात त्यांच्या परवानगीने पेशव्यांची चलनव्यवस्था अस्तित्वात होती. इ. स. १७०० नंतर मराठ्यांनी मोगली चलनव्यवस्थेचा स्वीकार केला व त्याप्रमाणे आधीच्या तांब्याचा पैसा आणि सोन्याचा होन या नाण्यांसोबतच चांदीचा रुपया आणि सोन्याची मोहोर ही नाणीही पाडली जाऊ लागली. त्यांवरील मजकूर मोगल नाण्यांप्रमाणेच असला, तरी भिन्नत्वदर्शक काही चिन्हे मात्र असत. मोगल साम्राज्याच्या उतरत्या काळात अनेक ठिकाणी स्थानिक सत्ताधीश प्रबळ झाल्यावर त्यांनी सरकारी टाकसाळींसोबतच मक्त्याने टाकसाळी देणेही चालू केले. त्यांद्वारे सरकारला अधिक महसूल मिळत असल्याने ही प्रथा सरकारच्या फायद्याची होती. या बिगर सरकारी टाकसाळींमधून तयार होणाऱ्या नाण्यांवर सरकारी टाकसाळीतील नाण्यांप्रमाणेच चिन्हे असत. सरकारी टाकसाळींपेक्षा अशा मक्त्याने दिलेल्या टाकसाळींची संख्या जास्त असल्यामुळे सरकारचे काम नाणी पाडण्यापेक्षाही बाजारातील नाण्यांच्या दर्जाचे नियमन करणे हे जास्त असे. तत्कालीन नाण्यांचे मूल्य हे त्यातील धातूच्या वजनावर व शुद्धतेवर अवलंबून असल्याने, सरकारी खजिन्यात जमा होणारी नाणी पारखून घेण्याकरिता पोतनीस नामक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असे.

पेशव्यांच्या अंमलाखालील प्रदेशांत एका रुपयाच्या भागमूल्यांकांना अधेली (आठ आणे अर्थात अर्धा रुपया), चवली (चार आणे अर्थात पाव रुपया) अशी नावे, तर तांब्याच्या नाण्यांमध्ये ढबू (दोन पैसे) व धेला (अर्धा पैसा) असे मूल्यांक असत. रुका या मूल्यांकालाच पुढे पै असेही नाव दिले गेले. या नाण्यांचे प्राथमिक कोष्टक खालीलप्रमाणे आहे :

३ रुके = १ पैसा
४ पैसे = १ आणा
१६ आणे = १ रुपया
३.५ रुपये = १ होन
१२ ते १५ रुपये = १ मोहोर

यांपैकी रुपये आणि मोहोर यांमधील विनियमदर हा स्थानपरत्वे बदलत असे. सर्वसाधारणपणे मोगली मोहोरेस १२-१३ रुपये, तर इंग्रज किंवा फ्रेंचांनी पाडलेल्या मोहोरेस मात्र १५ रुपये असा दर मिळत असे.

नाण्यांना विविध प्रकारची नावे व्यवहारात प्रचलित होती. त्यांवरील मजकुरावरून उदा., दिल्लीच्या बादशहाचे आलमगीर असे नाव असलेली मोहोर आलमगिरी म्हणून, तर विजयनगरच्या होनांची त्या त्या राजांच्या नावावरून अच्युतरायी, देवरायी इ. नावे असत. नाणी पाडलेल्या शहरावरून चांदवडी रुपया, दिल्ली सिक्का, इत्यादी नावेही असत. मक्त्याने टाकसाळ चालवणाऱ्यांच्या नावावरूनही काहीवेळेस नाणी ओळखली जात. उदा., पेशव्यांचे सरदार आणि सावकार मल्हार भिकाजी रास्ते यांनी बागलकोट या त्यांच्या जहागिरीच्या ठिकाणी चालवलेल्या टाकसाळीतील रुपयांना मल्हारशाही, तर पुण्यात १७८०-८५ मध्ये दुल्लभशेट नामक मक्तेदाराने पाडलेल्या मोहोरांना शेटशाही मोहोर असे संबोधले जाई. नाण्यांवरील भिन्नत्वदर्शक चिन्हांवरूनही नावे पडत. उदा., चाकण येथील रुपयांवर श्री हे अक्षर असे, त्यावरून त्याला श्री सिक्का असे म्हणत, तर पुण्यात पाडलेल्या रुपयांवर गणपतीच्या हातातील अंकुशाचे चिन्ह असल्याकारणाने त्याला अंकुशी रुपया अशीही संज्ञा प्रचलित होती.

याखेरीज विशिष्ट प्रदेशातील प्रचलनावरूनही नाणी ओळखली जात. उदा., वसई-चाल चांदवड रुपये म्हणजे वसई प्रांतात प्रचलित असणाऱ्या शुद्धतेचे चांदवडी रुपये. कल्याणचाल, पुणेचाल इ. नावेही त्यातच मोडतात. हैदराबादच्या निजामी राज्यातील नाण्यांना मात्र -चलनी असा प्रत्यय लावून ओळखले जाई. सरकारी विनिमयासाठी प्रमाण मानले जाणारे नाणे पुण्याच्या टाकसाळीतील असून, त्याला हाली सिक्का असे नाव होते. पेशव्यांच्या खजिन्यात काही विशिष्ट प्रकारची नाणीच स्वीकारली जात. खजिन्यात ग्राह्य असलेल्या कोणत्याही नाण्याला पोतेचाल हे नाव असे.

पेशवेकाळात शुद्धता व वजनाच्या बाबतीत अनेक वैविध्यपूर्ण नाणी चलनात असल्यामुळे त्यांना पारखणे आवश्यक होऊन बसले होते. याकरिता नाण्यांच्या कडेवर कानस मारून थोडा धातू खरवडणे, हलकेसे भोक पाडून आत दुसरा धातू आहे की नाही याची खातरी करणे इ. प्रक्रिया नियुक्त झालेल्या सराफांकरवी केल्या जात. या प्रक्रिया झाल्यावर त्याचे पूर्णत्वदर्शक चिन्हही तो सराफ उमटवीत असे. या क्रियेला छापणी असे नाव असून यातून बाहेर पडलेले नाणे ‘छापी झालेʼ असे म्हणत. अशा चिन्हांत अक्षरे, शुभचिन्हे इ. अनेकांचा समावेश होतो. यांत प्रचंड वैविध्य आढळते व विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील नाण्यांवर साधारणपणे विशिष्ट प्रकारची चिन्हे आढळतात. दख्खनमधील नाण्यांवर आढळणारी ही सराफी चिन्हे अवध किंवा बंगालमधील नाण्यांवर मात्र आढळत नसत. सततच्या हस्तांतरणामुळे नाण्यांवर अशी अनेक चिन्हे चढत व धातूच्या शुद्धतेखेरीज त्याच्या दृश्यमान पृष्ठभागाच्या स्वरूपाप्रमाणेही त्याचा विनिमयदर कमीजास्त होत असे. पेशवेकालीन पुण्यात यावरून कोरा, निर्मळछापी, मध्यमछापी आणि नरमछापी अशा चार प्रतींची नाणी प्रचलित होती. टाकसाळीतून नुकताच बाहेर पडलेला रुपया, ज्यावर कोणतेही सराफी तपासणीचे चिन्ह नसे, त्याला कोरा म्हणत. ज्या नाण्यावर तपासणीचे एखाददुसरेच चिन्ह असे, त्याला निर्मळछापी, थोडी जास्त चिन्हे असलेल्याला मध्यमछापी व खूप जास्त चिन्हे असलेल्याला नरमछापी म्हणत. कोरा ते नरमछापी या क्रमाने नाण्यांचा विनिमयदर उतरत्या क्रमाने बदलत असे. नरमछापीच्याही खालच्या प्रतीचे सुलाखी, तसेच मध्यम व नरम यांमध्ये राहतसाल नामक प्रकारचेही नाणे कधीकधी वापरले जाई.

पुण्यातील अंकुशी रुपयासापेक्ष या चार प्रतींच्या विनिमयदराचे खालील कोष्टक उपलब्ध आहे :

हाली सिक्का १०० रुपये = १०० अंकुशी कोश रुपये.
हाली सिक्का १०० रुपये = १०१.३ अंकुशी निर्मळछापी रुपये.
हाली सिक्का १०० रुपये = १०६.७ अंकुशी मध्यमछापी रुपये.
हाली सिक्का १०० रुपये = १०९ अंकुशी नरमछापी रुपये.

याप्रमाणे पाहता, विनिमयदर १०९ किंवा ११० रुपयांच्या खाली गेल्यास, ती नाणी आटवून सरळ नवीन नाणी पाडली जात. या विविध नाण्यांखेरीज, काही नाणी मात्र सर्वत्र प्रमाणभूत मानली जात. व्यापारात हाली सिक्का व महसूलवसुलीकरिता निर्मळ अंकुशी ही नाणी त्यांपैकी होत. नाण्यांचा विनिमयदर शुद्धता व वजनावर अवलंबून असल्याकारणाने, व्यवहारात अनेक सत्ताधीशांची नाणी प्रचलित असत. सर्वत्र ग्राह्य असणारी नाणी बहुतांशी इंग्रज किंवा फ्रेंचांची असत. त्यांच्याकडे शुद्धतेचे तंत्र अधिक प्रगत असल्याकारणाने त्यांची नाणी अधिक शुद्ध असत. त्यांच्या स्थिर वजनामुळे पेशवेकालीन कागदपत्रांत टाकसाळीची सनद देताना त्यातील रुपया ‘सुरती/फुलचरी(पाँडिचेरी) तोलाचाʼ असावा, असे उल्लेख आढळतात. अर्काटच्या नबाबाच्या परवानगीने इंग्रज त्यासारखे दिसणारे रुपयेही पाडत. पेशव्यांच्या धारवाडमधील टाकसाळीतील रुपयांवरील आरेखन आणि अलंकरण ही ‘फुलचरी (पाँडिचेरी)ʼ येथील रुपयाची हुबेहूब नक्कल असे.

कित्येक वेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यास स्वत:कडील चलन वितळवून तेथील चलनाप्रमाणे बदलून घ्यावे लागे. हे काम सराफ करत व त्यासाठी काही पैसे आकारत, त्याला बट्टा असेही म्हणत. काळे पडलेले रुपये उजळून घेण्यासाठीही काही पैसे आकारले जात.

शुद्धता हाच मुख्य निकष असल्याने तत्कालीन बाजारात अनेक सत्ताधीशांची नाणी चालत. उपलब्ध कागदपत्रांत लाहोरी, पटणी, मछलीबंदर इत्यादी नावाची नाणी येतात. त्यावरून ही नाणी अनुक्रमे लाहोर, पटना, मछलीपटणम या ठिकाणी पाडलेली असावीत. त्याखेरीज लारी या चांदीच्या नाण्यांचा तसेच इस्तंबूल (कॉन्स्टँटिनोपल येथील तुर्की साम्राज्य) नामक नाण्याचाही उल्लेख येतो. ३.५ ग्रॅम वजनाचे पुतळी नामक सोन्याचे नाणे हे सर्वांत प्रसिद्ध परदेशी नाणे होते. हे इटलीतील व्हेनिस नगरराज्याचे नाणे असून, त्याचे मूळ नाव झेकिनो (Zecchino) असे होते. यावर व्हेनिसचा लोकनियुक्त राजा हा त्याचा संरक्षक संत मार्क याला अभिवादन करत असून, संत मार्क त्याच्या हातात राजदंड देत असल्याचे चित्र असे. इस्लामी प्रभावामुळे तत्कालीन भारतात चित्र असलेली नाणी कमीच प्रचलित होती. त्यामुळे असे नाणे अभिनव होते आणि त्याच्या शुद्धतेमुळे ते लोकप्रिय झाले.

तेव्हा टाकसाळी चालविण्याचे काम बहुतांश श्रीमंत सावकारांना दिले जाई. दीक्षित-पटवर्धन, तांबवेकर, भिडे, थत्ते, दातार, हरिभक्ती इ. तत्कालीन अनेक मोठी सावकार घराणी ज्ञात आहेत. नाणी पारखण्यासाठीच्या पोतदाराचे दुकान कधीकधी फिरतेही असे. युद्धमोहिमेतील सैन्यासोबत त्याचे दुकान चालविण्याकरिता खास परवाना घ्यावा लागे. काहीवेळेस मोहिमेवर असतानाच सैन्यासोबत फिरती टांकसाळही असे.

सरकारी टाकसाळीचा सर्व खर्च, उदा., कामगारांचे पगार आणि कच्चा माल, यांचा खर्च सरकारातून होत असे. त्याउलट मक्त्याने दिलेल्या खासगी टाकसाळीचा कोणताही खर्च सरकार करत नसे. लिलाव करून, सर्वांत जास्त रक्कम भरणाऱ्यास टाकसाळीची सनद दिली जाई. ही सनद काही काळासाठी असून, त्यानंतर पुनरेकवार लिलाव होत असे. त्यामुळे एकाच मक्तेदाराकडे टाकसाळ पुन्हापुन्हा राहील, याची खातरी नसे. मोठ्या शहरांसोबतच अनेक लहान गावांतही टाकसाळी असत. अनेक टाकसाळीत फक्त खुर्दा, अर्थात तांब्याची नाणी पाडली जात. टाकसाळीत लोहार, सोनार, घणकरी (घणाचे घाव घालणारा), भातेकरी (भाता फुंकणारा), नाण्यांवरील मजकुराचे शिक्के करणारा इ. कारागीर असत. नाण्यावर उमटवायच्या मजकुराचे शिक्के पोलादापासून बनवले जात. पैकी मागील बाजूचा शिक्का ऐरणीत, तर पुढील बाजूचा शिक्का मोकळा असे. नाण्यांसाठी आवश्यक तो धातू सावकारांकडून खरेदी करण्यात येऊन त्याची शुद्धता तपासली जात असे. त्यानंतर हा धातू भट्टीत वितळवण्यात येऊन भातेकरी त्याला भात्याने वारा घालत असे. वितळवलेल्या धातूपासून ठरावीक लांबी व व्यासाच्या लगडी बनवल्या जात. या लगडींपासून ठरावीक जाडीच्या चकत्या/टिकल्या पाडल्या जात. हे कामही एक कसबी कारागीर करत असे. या टिकल्या स्वच्छ करून, थोड्या तापवून त्यांवर आघात करून शिक्का उमटवला जाई. सोनेचांदीखेरीज टाकसाळीतील कच्चा माल म्हणून लोखंड, पोलाद, कोळसे, टाकणखार, नवसागर, चिंच इत्यादी वस्तू लागत. भट्टीतील इंधन म्हणून कोळसे, अवजारे व शिक्के बनविण्यासाठी लोखंड व पोलाद वापरत. नाण्यांचे शिक्के वापरून झिजत असल्याने नवे शिक्के बनवण्याचे कामही नेहमीच चाले. नवीन शिक्के तयार झाल्यावर त्यांची रवानगी बंदोबस्ताने शिक्काकोठी नामक खोलीत केली जाई. धातूच्या पाडलेल्या टिकल्या उकळण्यासाठी चिंचेचा रस वापरला जाई, तर द्रवरूप धातूतील मळी बाजूस काढण्याकरिता क्षारांचा वापर केला जाई.

पेशव्यांच्या अंमलाखालील प्रदेशात अनेक प्रकारची नाणी व शेकडो टाकसाळी कार्यरत होत्या. यांमध्ये सुसूत्रता आणण्याचे काही प्रयत्न पेशव्यांकडून झाले. उदा., १७८२-८३ मध्ये पेशव्यांनी सर्व कोकणात व वरघाटी (घाटमाथ्यावर) खुर्दा अर्थात तांब्याची नाणी पाडण्याचा मक्ता दीड वर्षाकरिता दुल्लभशेट गोविंदजी व गोविंद पांडुरंग या दोघांना संयुक्तपणे दिलेल्या सनदेत उपरोक्त प्रदेशात नवीन टाकसाळी होणार नाहीत, इतकेच नव्हे तर असलेल्या टाकसाळी बंद करून फक्त एकाच मक्तेदाराने जागोजागी टाकसाळी घालून त्यातून समान वजन आणि मूल्याचे पैसे जागोजागी लागू करावेत, असेही कलम होते. एकसमान चलन लागू करण्याच्या कल्पनेचाच हा तत्कालीन आविष्कार होय.

मक्त्याने टाकसाळी चालवायला दिल्यामुळे यात गैरप्रकारांनाही बराच वाव राहात असे. खोट्या नाण्यांखेरीज जाणूनबुजून हिणकस (कमी मूल्याची) नाणी बनवणे, अनधिकृत टाकसाळी चालवणे, खऱ्या नाण्यात अनधिकृतपणे फेरफार करणे इ. अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद तत्कालीन कागदपत्रांत सापडते. ओतीव खोटी नाणी बनवण्याचा धंदा एक विशिष्ट जमातच तेव्हा करत असल्याचे उल्लेख आहेत. याखेरीज, टाकसाळींचे मक्तेदारही कमी शुद्धतेची नाणी पाडत. सरकारी खजिन्यात महसूल जमा करतेवेळी हे उघडकीस येई. याबद्दल पेशव्यांनी पाठवलेली काही आज्ञापत्रेही ज्ञात आहेत. विशेषत: कृष्णा व तुंगभद्रा नद्यांमधील कर्नाटक प्रांतावर कब्जा केल्यावर तेथील महसुलात तूट येऊ लागली, कारण तेथील गावोगावच्या अनधिकृत टाकसाळींतून कमी शुद्धतेची नाणी पाडली जात. यावर उपाय म्हणून धारवाड येथे सरकारी टाकसाळ स्थापन करण्यात आली व  अन्य टाकसाळी बंद करण्याची फर्मानेही निघाली; परंतु पेशव्यांच्या मातबर सरदारांच्याच प्रोत्साहनाने यातील बहुतांश टाकसाळी चालत असल्याने यांना आळा घालण्यात पेशवेही असमर्थ ठरल्याचे दिसून येते.

तत्कालीन नाण्यांवर त्या त्या शहरांची नावे पाहिली असता, औरंगजेबाच्या कारकिर्दीतील नावबदल झालेल्या शहरांची नावे संयुक्तपणे आढळतात. उदा., मूहियाबाद उर्फ पूना. मात्र मूर्तझाबाद हे मिरजेचे नाव मोगलपूर्व आदिलशाही काळापासून असल्याने ते तसेच राहिले. एकूणच पेशवेकालीन चलनव्यवस्था हा अतिशय गुंतागुंतीचा आणि तितकाच महत्त्वाचा विषय आहे.

संदर्भ :

  • भांडारे, शैलेंद्र, ‘पेशवाईतील नाणेपद्धतीʼ, संशोधक, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांचे त्रैमासिक, वर्ष ६५, भाग १-२, पृष्ठ क्र. ३-२६, १९९६-९७.
  • चापेकर, ना. गो. पेशवाईच्या सावलीत, पुणे, १९३७.

                                                                                                                                                                           समीक्षक : जयकुमार पाठक