डच-मराठे संबंध : (१६६०-१६८०). छ. शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि परकीय व्यापारी डच यांच्यातील परस्परसंबंध. येथे तंजावरच्या मराठी राज्याचा विचार केलेला नाही. ऐतिहासिक डच साधनांमधील छ. शिवाजी महाराजांचा सर्वप्रथम ज्ञात उल्लेख हा ५ मे १६६० रोजीच्या एका पत्रातील असून अफजलखान प्रकरणाशी संबंधित आहे. १६६३ साली छ. शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकणच्या स्वारी दरम्यान वेंगुर्ल्याच्या डचांशी प्रथम संपर्क साधला. पुढे १६६४ मध्ये सुरतेच्या प्रथम लुटी दरम्यान त्यांनी निकोलास कोलास्त्रा नामक एक ग्रीक व्यापारी डचांकडे खंडणी मागावयास पाठवला, परंतु डचांनी त्याला नकार देऊन वेंगुर्ल्यातील चांगल्या वागणुकीचा हवालाही दिला. त्यांची लढण्याची तयारी पाहून मराठ्यांनी आपली मागणी पुढे रेटली नाही.

यानंतर १६६४ सालच्या उत्तरार्धात दक्षिण कोकणात आदिलशाही सरदार खवासखानाविरुद्ध छ. शिवाजी महाराजांनी स्वारी केली. वेंगुर्ल्याच्या डच वखारीतील अधिकाऱ्यांनी या युद्धात वखारीची व तेथील डचांची सुरक्षितता अबाधित राहावी, अशी विनंती करणारे एक पत्र महाराजांकडे पाठवले. लढाईच्या धामधुमीत लिखित उत्तर पाठवण्यास वेळ नसल्याने त्यांनी तोंडीच सुरक्षिततेची हमी दिली. खवासखानाचा पराभव करून मराठी फौजांनी कुडाळ घेतल्यावर वेंगुर्ल्याचा डच अधिकारी तेथून निघून गोव्याला गेला; परंतु काही दिवसांत परतला. यादरम्यान मराठेशाहीतील अधिकाऱ्यांनी डचांना कोणताही त्रास दिला नसल्याची नोंद तत्कालीन डच पत्रांत सापडते. यानंतर लगेचच छ. शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलूख लुटण्यास प्रारंभ केला. डचांनी आणलेले बरेच कापडसामान त्यात लुटले गेले. याच सुमारास डच ईस्ट इंडिया कंपनीचे गुमास्ते काशिबा आणि संतुबा शेणवी यांचे एक लहानसे जहाज पकडून मराठ्यांनी खारेपाटणला नेले. यानंतर दक्षिण कोकणावरील मराठेशाहीचा अधिकारी रावजी सोमनाथ याने वेंगुर्ला वखारीचा तत्कालीन प्रमुख लेनार्ट्झ याला एक संदेश पाठवला आणि एका महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी एक विश्वासू माणूस पाठवण्याची विनंती केली. त्यावर लेनार्ट्झने एक हिंदू कारकून पाठवला. रावजी सोमनाथाने त्याला सांगितले की, डच-पोर्तुगीज वैमनस्याची त्याला कल्पना असून, गोवा काबीज करण्यात डचांना मदत करण्याची तयारीही दर्शवली. मात्र हा बेत सिद्धीस गेला नाही.

सुरतेच्या द्वितीय लुटीदरम्यान (१६७०) छ. शिवाजी महाराजांनी तेथील डचांना सांगितले, की त्यांनी शांत राहून प्रतिकार न केल्यास त्यांना कोणतीही इजा पोहचवली जाणार नाही. त्याखेरीज सुरतेतील श्रीमंत व्यापाऱ्यांकडून पैसे मिळवण्याचा उत्तम मार्ग कोणता, अशीही विचारणा त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी डचांचे प्रतिनिधी त्यांना भेटावयास आले, तेव्हा छ. शिवाजी महाराज लूट संपवून अगोदरच परतीच्या वाटेस लागले होते. १६७२ च्या आसपास डच प्रतिनिधी अब्राहम लेफेबर याने रायगडावर जाऊन ४५० सोन्याचे पॅगोडे इतक्या किमतीचे नजराणे महाराजांना अर्पण केले. या भेटीचा उद्देश व्यापारासाठी अधिक सोयी-सवलती मिळवणे हा असावा. १६७३ मध्ये डचांशी हातमिळवणी करून छ. शिवाजी महाराज मुंबईवर हल्ला करणार, अशी कुणकुण इंग्रजांना लागली होती; परंतु हे प्रत्यक्षात घडले नाही.

वेंगुर्लेकर डचांनी अण्णाजी दत्तोंशी संपर्क साधून छ. शिवाजी महाराजांकडून एक कौल मिळवला (१६७६). या सुमारास वेंगुर्ल्याच्या आसपास बरीच धामधूम असल्याने व्यापार कमी झाला होता. अब्राहम लेफेबर या प्रतिनिधीने त्यासाठी अण्णाजी दत्तोंशी बरीच चर्चा केली. यात आपले व्यापारी हक्क अबाधित राहतील, अशी ग्वाही डचांना मिळाली होती. त्या खेरीज महाराजांनी मोठ्या प्रमाणात तांब्याची मागणीही डचांकडे केल्याचा उल्लेख याप्रसंगीच्या पत्रांत सापडतो.

दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान (१६७७) छ. शिवाजी महाराजांना कोरोमंडल भागातील अनेक डच अधिकारी भेटले व अनेक करारमदारही करण्यात आले. त्या वर्षीच्या मार्च महिन्यात गोवळकोंडा येथे यान फान नायेंडाल या डच प्रतिनिधीने महाराजांना १००० फ्लोरिन (डच चलन) इतक्या किमतीच्या भेटवस्तू दिल्या, त्यातच काही सुकामेव्याचाही समावेश होता. त्यानंतर काही महिन्यांनी तमिळनाडूतील वालिकंडपुरम इथे निकोलास क्लेमेंट आणि हर्बर्ट डी यागर हे डच प्रतिनिधीही त्यांना भेटले. महाराजांनी त्यांना दोन कौल दिले. त्यांमध्ये यापूर्वीच्या आदिलशाही अंमलातील सर्व सवलती मान्य केल्या होत्या; तथापि गुलामांच्या व्यापाराची परवानगी मात्र काढून घेतली होती.

यानंतर १६७८ मध्ये छ. शिवाजी महाराजांच्या कित्येक अधिकाऱ्यांशी डच कंपनीच्या प्रतिनिधींचा जवळून संपर्क आला. तमिळनाडू किनारपट्टीवरील पोर्टो नोव्हो उर्फ सध्याचे परंगिपेट्टै येथे डचांना एक वखार उघडायची होती. गोपाळदास पंडित नामक अधिकाऱ्याने याला परवानगी नाकारली, कारण वखारीला तटबंदी बांधून डच अख्ख्या बंदराचा ताबा घेतील, अशी रास्त भीती त्याला होती. प्रत्युत्तरादाखल डचांनी बंदराची नाकाबंदी केली आणि तेथील व्यापार ठप्प झाला. दक्षिणचे सुभेदार रघुनाथ पंडित यांच्यापर्यंत हा वाद पोहोचल्यावर त्यांनी तटबंदी न बांधण्याच्या अटीवर वखार बांधावयास परवानगी दिली. तेगेनेपटनम अर्थात सध्याचे कडलूर येथेही वखार उघडण्याबाबत अशाच प्रकारचा पत्रव्यवहार १६८० मध्ये झाला.

एकूणच छ. शिवाजी महाराजांच्या हयातीत डच-मराठे संबंध बहुतांशी तटस्थ व प्रसंगी सलोख्याचे राहिले. इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या तुलनेत डचांचे भारतातील धोरण राजकीय हस्तक्षेपाला विशेष अनुकूल नसल्यामुळे मराठ्यांना काही प्रसंगी त्यांची चांगली मदत झाली.

संदर्भ :

  • Bellarykar, Nikhil, ‘Dutch-Maratha relations under Shivaji during 1660-80: A survey of the research done till date, new discoveries and importance of Dutch records for studying the life of Shivajiʼ, Sanshodhak, Year 85, Vol. 2, pp. 54-74, Dhule, Maharashtra, India, June 2017.

                                                                                                                                                                                            समीक्षक : सचिन जोशी