रसाळ फळांसाठी जगभर प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. स्ट्रॉबेरी ही वनस्पती रोझेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव फ्रॅगॅरिया ॲनॅनासा आहे. या वनस्पतीची फळे सुवासिकपणा, लालभडक रंग, रसाळपणा आणि आंबट-गोड चवीसाठी जगभर ओळखली जातात. फ्रॅगॅरिया प्रजातीत स्ट्रॉबेरीच्या २० पेक्षा अधिक जाती आहेत. स्ट्रॉबेरीचे मूलस्थान उत्तर अमेरिका असून यूरोपमध्ये तिचा प्रसार झाला. फ्रॅगॅरिया ॲनॅनासा ही स्ट्रॉबेरीची एक संकरित जाती असून सध्या तिची लागवड अनेक देशांत केली जाते. भारतात तिची लागवड विशेषत: डोंगराळ प्रदेशांत जसे नैनिताल, डेहराडून (उत्तराखंड), महाबळेश्वर, पाचगणी, वाई (महाराष्ट्र), काश्मीरचे खोरे, बंगळुरू (कर्नाटक) आणि कॅलिपाँग (पश्चिम बंगाल) येथे केली जाते. महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सांगली या मैदानी प्रदेशांत स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात यश आले आहे.
स्ट्रॉबेरीच्या झुडपाची मुळे तंतुमय असतात आणि खोडाच्या तळाकडून पाने उगवतात. पाने संयुक्त, सामान्यपणे तीन पर्णिका असलेली, हिरवी, दंतुर व लोमश असतात. फुले सामान्यपणे पांढरी, क्वचितप्रसंगी लालसर असून लहान झुबक्यात व जमिनीवर सरपटत वाढणाऱ्या वेलीसारख्या वृंतावर येतात. मुळे जशी जून होत जातात, तशी काष्ठीय होतात. मुख्य खोडापासून जमिनीवर धावते धुमारे फुटून वनस्पतीचा प्रसार होतो. निदलपुंज ५, लहान, हिरव्या रंगाची व पानांसारखी दिसतात. दलपुंज पांढरा असतो. कळी असताना निदलपुंज आणि पुष्पासन फळात समाविष्ट होतात.
स्ट्रॉबेरीच्या नावात जरी ‘बेरी’ शब्द असला, तरी वनस्पतिविज्ञानानुसार स्ट्रॉबेरीचे फळ मृदुफळ नसते. वास्तविक पाहता ते एक फळ नसून मोठ्या प्रमाणात वाढलेले पुष्पासन असते. यात काही प्रमाणात खरी फळे तसेच कृत्स्न फळे (किंवा बिया) असतात.
स्ट्रॉबेरीच्या फळांमध्ये ९०% पाणी, ७% कर्बोदके आणि अत्यंत कमी प्रमाणात प्रथिने व मेद असतात. या फळांमध्ये क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असून पोटॅशियम, मँगॅनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम इ. खनिजे असतात. स्ट्रॉबेरीची फळे प्रतिऑक्सिडीकारक आणि प्रतिशोथकारक असून त्यांच्या नियमित सेवनाने हृदयविकारांची शक्यता कमी होऊ शकते, असे आढळून आले आहे. फळे प्रतिऑक्सिडीकारक असल्याने ती प्रतिकर्करोगी, तसेच आतड्यांच्या विकारांवर उपयुक्त आहेत. फळापासून जॅम, जेली, सॉस, चॉकलेट इ. तयार करतात. औषधांमध्ये (विशेषत: लहान मुलांच्या औषधांमध्ये) स्वादकारक म्हणून आणि सौंदर्यप्रसाधनातही त्याचा वापर करतात. स्ट्रॉबेरीची पाने, खोड आणि फुले यांपासून औषधी चहा बनवितात. अतिसार, संधिवात, मुतखडा, मुखदुर्गंधी, घशाचे संक्रामण इ. विकारांवर स्ट्रॉबेरीच्या विविध भागांचा उपयोग होतो.