(कॉमन टेलरबर्ड). वनस्पतीच्या पानांची शिवण करून घरटे तयार करणारा पक्षी. शिंपी हा लहान पक्षी पॅसेरीफॉर्मिस गणाच्या सिस्टिकोलिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑर्थोटोमस स्युटोरियस आहे. वनस्पतींचे तंतू किंवा कोळ्यांचे तंतू यांच्या साहाय्याने पाने शिवून तो आपले घरटे तयार करीत असल्याने त्याला ‘शिंपी पक्षी’ हे नाव पडले आहे. दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, लाओस, व्हिएटनाम, कंबोडिया, इंडोनेशिया देशांमध्ये तो आढळतो. खुली वने, बागा, पानझडी वने, शहरी उद्याने व बागा या ठिकाणी तो बहुधा दिसून येतो. भारतात दाट वने किंवा वाळवंटी प्रदेश वगळता तो सर्वत्र आढळतो.
शिंपी पक्षी हा चिमणीपेक्षा लहान असून त्याच्या शरीराची लांबी १०–१४ सेंमी. आणि वजन ६–१० ग्रॅ. असते. दिसायला तो आकर्षक असून शरीराचा वरचा भाग पिवळसर हिरवा, तर पोटाकडचा भाग पांढरा असतो. कपाळ व माथा लालसर-तपकिरी असतो. पंख तपकिरी, आखूड व गोलाकार असतात. शेपटी तपकिरी असून मधली पिसे लांब, टोकदार असतात आणि शेपटी नेहमी उभारलेली असते. चोच लांब, अणकुचीदार व काळपट असते. डोळे व पाय तांबूस-पिवळे असतात. नर आणि मादी दोघेही सारखे दिसतात. प्रजननकाळात नराच्या शेपटीतील मधली पिसे अधिक लांब होतात.
शिंपी पक्षी कीटकभक्षी असून तो वेगवेगळ्या प्रकारचे कीटक खातो. बहुधा तो जमिनीलगत किंवा झाडांच्या खालच्या भागात उड्या मारत वावरतो. फुलांतील कीटकांकडे तो आकर्षित होतो. सावर, पांगारा वगैरे झाडांच्या फुलांतील मकरंद तो शोषून घेतो. या वेळी त्यांच्या शरीराला परागकण चिकटल्यामुळे तो सोनेरी भासतो. आंब्याच्या फुलोऱ्यांवर तो बऱ्याचदा दिसून येतो. झुडपात असताना तो ‘टुविट SS टुविट’ असा आवाज काढत राहतो.
प्रजननकाळ नसताना शिंपी पक्षी एकटा असतो. परंतु प्रजननकाळात नर-मादी जोडीने असतात. मार्च-डिसेंबर असा त्यांचा प्रजननकाळ असला तरी जून-ऑगस्ट या काळात त्यांची वीण जोमाने होते. त्यांचे घरटे दाट झुडपांमध्ये किंवा एखाद्या वेलीवर जमिनीपासून ९० ते १२० सेंमी. उंचीवर असते. घरटे तयार करण्यासाठी ते वड, पिंपळ या झाडांची पाने वापरतात. घरटे मादी शिवते आणि त्यासाठी ती एक-दोन पाने वापरते. चोचीचा सुईप्रमाणे उपयोग करून ती पानांच्या दोन्ही कडांना सारखीच छिद्रे पाडते. ती एक किंवा दोन पाने जोडून त्यांचा द्रोण तयार करते आणि त्याचे बुडाकडील तोंड शिवून बंद करते. अशा द्रोणात कापूस, गवत ठेवून मादी घरटे तयार करते. वनस्पतींचे तंतू किंवा कोळ्यांच्या जाळ्यातील तंतू ते दोऱ्याप्रमाणे वापरतात. घरटे साधारणपणे आत असलेल्या पक्ष्यांचे आणि अंड्याचे वजन पेलण्याइतके मजबूत असते. तसेच घरटे वरून झाकले जाईल आणि त्यात पुरेसा प्रकाश येईल याचीही ते काळजी घेतात. मादी एका वेळी तीन अंडी घालते. अंडी उबविण्याचा कालावधी १२ दिवस असतो. १२ दिवसानंतर अंड्यातून पिले बाहेर येतात. नर-मादी दोघेही मिळून पिलांची काळजी घेतात. साधारणपणे १४ दिवसांनी पिले उडू लागतात. शिंपी पक्ष्याचे आयुर्मान सु. ३ वर्षे इतके असते.