भ्रूणहत्या म्हणजे गर्भावस्थेत असताना बाळाची केलेली हत्या. जगाच्या सुरुवातीपासूनच अनेक कारणांसाठी भ्रूण-बालहत्या केल्याचे दिसते. आधुनिक युगामध्ये बहुधा अनैतिक संबंधांतून बाळाचा जन्म झाल्यावर होणारी बेअब्रू टाळण्यासाठी, मुलगी नको म्हणून स्त्री-भ्रूणहत्या आणि आर्थिक कारणांसाठी बालहत्या केल्या जातात. संपत्ती मिळविण्यासाठी बाळाचा बळी देण्याची कृती आर्थिक कारणांमध्येच मोडते.
चर्चची भूमिका भ्रूणहत्येच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ख्रिस्ती धर्मात भ्रूणहत्येविरुद्ध जो पहिला अधिकृत व परिणामकारक उपाय योजला गेला, तो सम्राट कॉन्स्टंटाइनतर्फे. त्याने बालहत्येविरुद्ध दोन कायदे केले. हे कायदे ‘थीओडोशियन कोड’ (इ.स. ४३८) मध्ये सापडतात. त्यांतील पहिल्या कायद्यानुसार आर्थिक बोजामुळे भ्रूणहत्या करण्याचा मोह टाळण्यासाठी कॉन्स्टंटाइनने त्याच्या राज्याच्या खजिन्यातून ‘बालकांच्या पालकांना आर्थिक साहाय्य’ करायला सुरुवात केली. दुसऱ्या कायद्यानुसार पालकांनी ज्या बालकांची हत्या करण्याचा विचार केला किंवा तशी अयशस्वी कृती केली असेल, त्या बालकांचे रक्षण करून त्यांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तींना त्या बालकांच्या मालकी हक्काची संपत्ती देण्यात यावी अशी तजवीज केली.
जन्माअगोदर बालकाची हत्या (Prenatal Infanticide) : बाळाच्या जन्माअगोदर त्याची हत्या करणे ह्याला ‘भ्रूणहत्या’ म्हणून संबोधिले जाते. प्राचीन काळातील तत्त्ववेत्त्यांमध्ये व मध्ययुगातील धर्मवेत्त्यांमध्ये गर्भामध्ये मानवी जीव नक्की कधी प्रवेश करतो ह्याविषयी विविध मते होती; परंतु आधुनिक जीवशास्त्रवेत्त्यांमध्ये त्याविषयी एकमत आहे, ते असे : गर्भ हा गर्भधारणेच्या वेळीच मानवी स्वरूपात असतो. एकदा का गर्भधारणा झाल्यावर त्या गर्भाला जेव्हा हेतुपूर्वक नष्ट करण्यात येते, तेव्हा ती भ्रूणहत्या समजली जाते. मात्र वैद्याने (Doctor) जर सल्ला दिला की, आई व बाळ ह्या दोघांचे जीवन संकटात असून दोघांपैकी केवळ एकाचाच जीव वाचविला जाऊ शकतो; नाहीतर दोघांचाही मृत्यू अटळ आहे, तरच त्या गर्भाचा नाश केल्यास ती भ्रूणहत्या होत नसते असा आधुनिक विचारप्रवाह आहे.
गरोदर स्त्रीच्या उदरातच बाळाच्या डोक्याचा आकार मोठा असल्यास किंवा दुसऱ्या इतर कारणांमुळे जर नैसर्गिक प्रसुती सुरळीतपणे होऊ शकत नसेल, तर ते बाळ जीवंत असतानाच जुन्या काळी त्याचे डोके ठेचून त्याला स्त्रीच्या गर्भाशयातून बाहेर काढले जात असे. ह्या प्रक्रियेला मस्तक-छेदन (Craniotomy) म्हणत; परंतु ही प्रक्रिया बाळाच्या जगण्याच्या हक्काविरुद्ध जाते, अशी चर्चने अधिकृत शिकवण दिल्यामुळे ती प्रथा बंद झाली.
काही स्त्रिया गर्भपात घडवून आणण्यासाठी ठरावीक औषधे किंवा गोळ्या घेतात. ह्या औषधांनी गर्भपात घडून येईल; परंतु आपणास काही अपाय होणार नाही, अशी त्यांची चुकीची समजूत असते. मात्र ज्या औषधांमुळे गर्भपात घडून येऊ शकतो, त्या औषधांचे गंभीर परिणाम त्यांचे सेवन करणाऱ्या स्त्रियांवर होऊ शकतात.
भ्रूणहत्येला चर्चचा विरोध आहे; कारण ‘माणसाच्या गर्भसंभवापासूनच मानवी जीवनाचे संरक्षण व्हावे, त्याचा आदर राखावा, तिच्या अस्तित्वाच्या पहिल्या क्षणापासून व्यक्तीला इतर व्यक्तींप्रमाणे आदराने वागवावे. मूलभूत हक्कांपैकी एक हक्क म्हणजे निष्पाप व्यक्तीला लाभलेला जीवन जगण्याचा हक्क, अशी चर्चची भूमिका आहे.
कॅथलिक ख्रिस्तसभेचा नवा श्रद्धाग्रंथ ह्यात सांगितले आहे की, ‘मानवाच्या निर्मितीमध्ये देवाच्या पावन मंगलकृतीचा मोठा वाटा असल्यामुळे मानवी जीवन हे अतिशय पवित्र मानले जाते. परमेश्वर हाच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असल्यामुळे जीवनभर मनुष्य देवाशी खास नातेसंबंध प्रस्थापित करीत असतो. जीवनाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत परमेश्वर हाच मानवी जीवनाचा स्वामी आणि प्रभू आहे. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीला, विशेषत: निरपराधी जीवाचा, प्रत्यक्ष रीत्या नाश करण्याचा अधिकार नाही’. ह्या श्रद्धाग्रंथात पुढे सांगितले आहे की, ‘देवाची पाचवी आज्ञा आपणास प्रत्यक्ष व हेतुपुरस्सर हत्या करण्यास प्रतिबंध करते. खून आणि खुन्याला स्वेच्छेने सहकार्य करणारी माणसे गंभीर स्वरूपाचे पाप करतात. भ्रूणहत्या, बालहत्या, बंधुहत्या, पालकांची हत्या, जीवन साथीदाराची हत्या, रक्ताच्या नातलगांची हत्या हे इतर हत्यांपेक्षा अधिक गंभीर पाप मानले जाते’.
संदर्भ :
- कॅथलिक ख्रिस्तसभेचा नवा श्रद्धाग्रंथ, जीवनदर्शन प्रकाशन, १९९८.
समीक्षक : फ्रान्सिस कोरिया