
(सोप-पॉड ट्री). एक उपयुक्त काटेरी वेल. शिकेकाई ही फॅबेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ॲकेशिया कॉन्सिन्ना अथवा सेनेगालिया रुगाटा आहे. तिचे मूलस्थान आशिया असून भारत, चीन, मलेशिया, म्यानमार या देशांत ती आढळते. भारतात मध्य आणि दक्षिण प्रदेशांत तसेच महाराष्ट्रात सह्याद्रीच्या घाटात शिकेकाईची वेल आढळते.
शिकेकाईचे खोड जाडजूड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके आणि टोकाला वाकडे लहान काटे असतात. खोडाला आधार मिळाला की त्याच्या आधाराने ते वाढत दूरवर पसरते. शिकेकाईच्या वेलीच्या जाडजूड खोडामुळे आणि पसाऱ्यामुळे तिला महालता (लिॲना) असेही म्हणतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसांसारखी असून पर्णिका लहान असतात. मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात. दलांच्या ४–८ जोड्या व दलकांच्या १०–२० जोड्या असतात. फुलोरा गोलसर झुपक्यासारखा (स्तबकासारखा पुष्पविन्यास) असून फिकट गुलाबी रंगाचा असतो. फुलोऱ्यातील फुले लहान, बहुलिंगाश्रयी (एकाच वनस्पतीवर येणारी द्विलिंगी व एकलिंगी फुले) असून ती मार्च ते मे महिन्यांत येतात. शुष्क फळ (शेंग) चपटे, जाड, ७.५–१२.५ X २–२.८ सेंमी., लालसर पिंगट, सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया ६–१०, काळ्या व गुळगुळीत असून शेंगा तडकून बाहेर पडतात.
प्राचीन काळापासून शिकेकाईचा वापर केस धुण्यासाठी होत आलेला आहे. तिच्या शेंगा बाजारात ‘शिकेकाई’ नावाने मिळतात. शेंगा शीतल, मूत्रल असून वृक्क व मूत्राशय यांच्या विकारावर तसेच सुलभ प्रसूतीकरिता वापरतात. शेंगा पित्तशामक, कफोत्सारक, वांतिकारक (ओकारी करविणाऱ्या) व रेचक (जुलाब करविणाऱ्या) असतात. या वेलीची फळे, पाने व खोडाची साल वाळवून केलेले चूर्ण केशधावन (शाम्पू) म्हणून केस धुण्यासाठी वापरतात. सालीमध्ये भरपूर प्रमाणात सॅपोनीन असते. त्यामुळे शिकेकाई पाण्यात कालवल्यावर फेस निर्माण होतो. शिकेकाईच्या नियमित वापरामुळे केसातील खाज व कोंडा नाहीसा होतो. केस मुलायम होऊन केसांना नैसर्गिक चकाकी येते. केसगळती थांबून केसांची वाढ चांगली होते. केसातील उवांचा, लिखांचा नाश होतो. शिकेकाई केसांप्रमाणेच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. शिकेकाई सूक्ष्मजीवरोधी असल्याने चेहऱ्यावरील मुरुम व सुरकुत्या कमी करण्यासाठी शिकेकाईचे चूर्ण उपयोगी ठरते. भारतात विशेषेकरून एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून शिकेकाईचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.