(कॉर्क वुड ट्री/हमिंग बर्ड ट्री). एक शिंबावंत वृक्ष. हदगा ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा आहे. ही वनस्पती मूळची मलेशिया, फिलिपीन्स तसेच ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग येथील असून आशियातील सर्व देशांत तिचा प्रसार झालेला आहे. जगाच्या उष्ण तसेच दमट प्रदेशांतील अनेक देशांत हदगा हा वृक्ष दिसून येतो. भारतात तो परसात, शेताच्या कडेने तसेच मंदिरांमध्ये शोभेकरिता लावलेला आढळतो. त्याला ‘अगस्ता’ किंवा ‘अगती’ असेही म्हणतात.
हदगा हा सदाहरित वृक्ष ६–१० मी. उंच आणि वेगाने वाढतो. मुळांवर खूप गाठी असतात. खोड व फांद्या नाजूक व ठिसूळ असून फांद्या खोडाच्या वरच्या टोकाला असतात. पाने संयुक्त, मोठी, पिच्छाकृती असून पर्णिकांच्या १५–३० जोड्या असतात. फुले पानांच्या बेचक्यात स्तबक फुलोऱ्यात येतात. ती लंबगोल असून द्विलिंगी, पांढरी किंवा लालसर असतात. निदलपुंज ५ असून ती अंशत: जुळलेली असतात. दलपुंज मोठा, बाहेर झुकलेला असून प्रत्येक सुट्या पाकळीला लहान देठ असतो. पाच पाकळ्यांपैकी एक मोठी, सर्वांत बाहेरची पाकळी पताकेसारखी पसरट असून बाजूच्या दोन पाकळ्या पंखांप्रमाणे पसरलेल्या असतात. उरलेल्या दोन्ही पाकळ्या अंशत: जुळून त्यांचा नौकासारखा उभट भाग पताकासमोर येतो. यातच पुंकेसर आणि अंडपी असतात. दहा पुंकेसरांपैकी एक सुटा व उरलेले नऊ अंशत: एकत्र जुळलेले असतात. पुंकेसरांच्या नळीत तळाशी मकरंद असून तो खाण्यासाठी कीटक तिथे येतात आणि परागण घडून येते. शेंगा लांब, पातळ, चपट्या, हिरव्या, २०–६० सेंमी. लांब असून त्यात १५–५० बिया असतात.
आयुर्वेदानुसार हदग्याची मुळे, साल, पाने व फुले औषधी आहेत. मूळ उगाळून त्याचा लेप संधिवातावर लावतात. मुळाचा रस मधाबरोबर खोकल्यावर गुणकारी असते. रस साल स्तंभक व पौष्टिक असते. खरचटल्यावर पानांचे पोटीस बांधतात. पानांमध्ये अ जीवनसत्त्व असल्याने नेत्रविकारांवर ती उपयुक्त मानतात. कोवळा पाला, फुले व शेंगा भाजीप्रमाणे खातात. हदग्याचे लाकूड मऊ व पांढरे असते. त्यापासून आगपेटीच्या काड्या तयार करतात. त्याचा पाला गुरांना चारा म्हणून खायला घालतात.
पर्यावरणाच्या दृष्टीने हदगा ही अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. ती वेगाने वाढते आणि नायट्रोजन स्थिरीकरणासाठी उपयोगी पडते. त्यामुळे जेथे जमिनीची झीज अधिक झालेली आहे, तेथे झीज कमी करण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी तिची लागवड करतात. अनेकदा कुंपणासाठी, सावलीसाठी, हवारोध करण्यासाठी किंवा इतर वनस्पतींना वाढीला आधार मिळण्यासाठी हदग्याची लागवड करतात. हा वृक्ष सु. २० वर्षे जगतो.