इटलीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर. समुद्रसपाटीपासून १९३ मी. उंचीवर हे सरोवर स्थित आहे. या सरोवराची लांबी ५४ किमी., रुंदी ११ किमी., सरासरी खोली १७७ मी. आणि कमाल खोली ३७२ मी. असून क्षेत्रफळ २१२ चौ. किमी. आहे. या सरोवराच्या मजोरी या नावाचा अर्थ ‘मोठे’ असा आहे. लगतच्या ओर्ट आणि व्हरेसी सरोवरांपेक्षा हे सरोवर मोठे असल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. या सरोवरामुळे इटलीचे पूर्वेकडील लाँबर्डी आणि पश्चिमेकडील पीडमाँट हे दोन प्रशासकीय विभाग एकमेकांपासून अलग झाले आहेत. सरोवराच्या उत्तर टोकाचा विस्तार स्वित्झर्लंडमधील तिचीनो कँटनमध्ये झालेला आहे. या सरोवरातून तिचीनो नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. तिचीनो ही पो नदीची प्रमुख उपनदी आहे. याशिवाय उत्तरेकडून माजा, पश्चिमेकडून तोचे आणि पूर्वेकडील लूगानो सरोवराकडून वाहत येणारी आखूड नदी त्रेसा या उपनद्या या सरोवराला येऊन मिळतात.
भूसांरचनिक-हिमानी क्रियेतून या सरोवराच्या द्रोणीची निर्मिती झालेली आहे. सरोवराच्या पश्चिम किनारी भागात प्रसिद्ध बॉरमीअन बेटे आहेत. भूशास्त्रीय दृष्ट्या ही बेटे म्हणजे पालांझा उच्चभूमीचा विस्तारित भाग आहे. सरोवराची उत्तर सीमा स्वीस आल्प्स या पर्वतीय प्रदेशाने, तर पूर्वेकडील विस्तार लाँबर्डीच्या मैदानाने सीमित केला आहे. येथील हवामान उबदार व सौम्य स्वरूपाचे आहे.
पंधराव्या शतकापासून सरोवराच्या सभोवती बॉरमीओ कुळातील मोठे सधन शेतकरी राहत आहेत. आता ते इतर व्यवसायाकडेही वळले आहेत. अद्याप त्यांच्याकडे येथील बेटांची मालकी असून सरोवरातील मासेमारीचे अधिकार आहेत. सरोवराच्या सभोवती भूमध्य सागरी प्रकारच्या अनेक बागा आहेत. सरोवरात ट्राउट, पाइक, पर्च इत्यादी जातीचे मासे सापडतात.
सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील स्ट्रेझा, व्हर्बान्य, आरोना, कॅनबीओ या नगरांत सुप्रसिद्ध रिसॉर्ट आहेत. त्याशिवाय पूर्व किनाऱ्यावर लवीनो व लव्हेनो शहरे, तर उत्तर टोकाशी स्वित्झर्लंडचे लोकार्नो शहर आहे. या सर्व शहरांदरम्यान छोट्या स्ट्रीमरच्या साहाय्याने वाहतूक केली जाते. व्हर्बान्यच्या नैर्ऋत्येस मजोरी आणि ओर्ट सरोवरांच्या दरम्यान मौंट मॉटरोन हे १,४९१ मी. उंचीचे शिखर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या सरोवराचा परिसर विशेष प्रसिद्ध आहे.
समीक्षक : संतोष ग्या. गेडाम