(मलेरिया). सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांद्वारे प्रसार होणारा एक संक्रामक रोग. प्लास्मोडियम प्रजातीच्या एकपेशीय, परजीवी सूक्ष्मजीवांमुळे हिवताप होतो. हिवताप मनुष्याला तसेच प्राण्यांना होतो. प्लास्मोडियमच्या पुढील पाच जाती माणसामध्ये हिवतापाची बाधा निर्माण करू शकतात – प्ला. फाल्सिफेरम, प्ला. व्हायव्हॅक्स, प्ला. ओव्हल, प्ला. मलेरिई आणि प्ला. नोलेसी. हिवतापामुळे झालेले बहुतेक मृत्यू प्ला. फाल्सिफेरम जातीमुळे होतात, तर प्ला. व्हायव्हॅक्स, प्ला. ओव्हल आणि प्ला. मलेरिई यांच्यामुळे होणारा हिवताप सौम्य असतो. प्ला. नोलेसी मुख्यत: पक्ष्यांना व चिपँझींना बाधा पोहोचवतात, माणसांना त्यांची बाधा क्वचितच होते. योग्य उपचार न घेतल्यास महिन्यानंतर हिवताप पुन्हा होण्याची शक्यता असते. परंतु, अशा रुग्णांमध्ये हिवतापाची लक्षणे सौम्य असतात. हिवतापामुळे रुग्णाच्या शरीरात निर्माण झालेली प्रतिकारक्षमता काही काळाने कमी होत जाते.
हिवतापाच्या सूक्ष्मजीवांचे जीवनचक्र : हे सूक्ष्मजीव मनुष्य आणि डास यांवर परजीवी असतात. हिवतापामध्ये मनुष्य हा मध्यस्थ आश्रयी असतो, त्याच्यात परजीवींचे अलैगिंक प्रजनन होते, तर डासाच्या मादीच्या शरीरात लैंगिक प्रजनन होते. ॲनॉफेलीस डासाची मादी हिवतापाची वाहक असते, मात्र नर वाहक नसतात.
जेव्हा ॲनॉफेलीस डासाची मादी मनुष्याला दंश करते, तेव्हा प्लास्मोडियमच्या जीवनचक्रातील बीजाणुज अवस्था (स्पोरोझॉइट) मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते. हे सूक्ष्मजीव एका तासात रक्तवाहिन्यांमधून मनुष्याच्या यकृतात पोहोचतात. तेथे दोन आठवड्यांत अलैंगिक प्रजननाने वाढ होऊन बहुपेशीय खंडप्रसू (स्किझाँट) अवस्था निर्माण होते. त्यानंतर ही बहुपेशीय अवस्था रक्तात प्रवेश करून फुटते. त्यामुळे हजारो खंडजीव मुक्त होऊन सर्व शरीरभर पसरतात. त्यांपैकी बरेच खंडजीव तांबड्या रक्तपेशींमध्ये प्रवेश करून तेथे वाढू लागतात आणि प्रत्येक खंडजीवाचे रूपांतर खंडप्रसूमध्ये होते. प्लास्मोडियमग्रस्त तांबडी पेशी रक्तवाहिनीच्या आतील बाजूला चिकटून राहते आणि ती फुटून आतील खंडप्रसूपासून निघालेले अनेक खंडजीव बाहेर पडून इतर तांबड्या रक्तपेशींवर आक्रमण करतात. प्रत्येक वेळी पेशी फुटल्यावर आतील प्रथिने (प्रथिनद्रव्ये) रक्तात पसरतात. त्यामुळे दर ४८ किंवा ७२ तासांनी रुग्णाला थंडी वाजू लागते आणि ताप येतो.
काही खंडजीवांचे रूपांतर खंडप्रसूमध्ये न होता अपक्व युग्मक पेशी या लैंगिक अवस्थेत होते. जेव्हा ॲनॉफेलीस डासाची मादी हिवतापाच्या रुग्णाला दंश करते तेव्हा रुग्णाच्या रक्ताबरोबर ही युग्मके (नर व मादी) तिच्या जठरात शिरतात आणि तेथे प्रौढ होतात. तेथे नर-युग्मके आणि मादी-युग्मके यांचे मीलन होऊन त्या फलनातून हालचाल करू शकणारी युग्मनज म्हणजे ‘चलयुग्मनज पेशी’ निर्माण होते. डासाच्या जठरात या पेशीचा पूर्ण विकास होऊन तिच्या विभाजनामुळे अनेक बीजाणुज निर्माण होतात. ते हालचाल करीत असल्याने डासाच्या शरीरात फिरून लाळ ग्रंथीमध्ये पोहोचतात. या सर्व प्रक्रियेला १०–१२ दिवस लागतात. त्यानंतर ही डासाची मादी जेव्हा निरोगी मनुष्याला दंश करते आणि रक्त शोषून घेते, तेव्हा हे बीजाणुज त्वचेत सोडले जातात व यकृतात येतात. याला सामान्यपणे २४–७२ तास लागतात.
लक्षणे : सामान्यपणे बाधित मादीने निरोगी व्यक्तीला दंश केल्यानंतर पहिले ८–२५ दिवस कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सुरुवातीला थंडी वाजणे, ताप येणे, डोके दुखणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, उलट्या होणे, मळमळणे, पुष्कळ घाम येऊन नंतर ताप उतरणे अशी लक्षणे दिसून येतात. हिवतापाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे अनुक्रमे थंडी, हुडहुडी, ताप आणि नंतर घाम येणे यांचे तीव्र झटके. हे झटके प्ला. व्हायव्हॅक्स आणि प्ला. ओव्हल यांच्या संसर्गात दर दोन दिवसांनी, प्ला. मलेरिईच्या संसर्गात दर तीन दिवसांनी आणि प्ला. फाल्सिफेरमच्या संसर्गात ३६–४८ तास व त्यापेक्षाही कमी वेळात येतात. प्ला. फाल्सिफेरमच्या संसर्गात ताप तर जवळजवळ उतरतच नाही. कारण या झटक्यांच्याच दरम्यान नवीन पिढीतील खंडजीव रक्तात मिसळत असतात. रुग्णाला योग्य उपचार मिळाले नाहीत तर सूक्ष्मजीवांची संख्या वाढून परिणामत: रुग्ण दगावू शकतो.
हिवतापाचे झटके येण्याखेरीज रुग्णामध्ये पांडुरोग होणे, रक्तातील हीमोग्लोबिनाचे उत्सर्जन मूत्रातून होणे, प्लीहा वाढून ती कठीण होणे, आम्लरक्तता, दुर्बलता, निरुत्साह इ. लक्षणे उद्भवू शकतात. प्ला. फाल्सिफेरम जातीच्या सूक्ष्मजीवांचे संक्रामण अधिक गंभीर असते. त्यांमुळे तांबड्या रक्तपेशी मोठ्या प्रमाणावर बाधित होऊन रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूला चिकटून बसतात. परिणामी वेगवेगळ्या इंद्रियांतील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या रक्तप्रवाहात अडथळा येतो तेव्हा शरीराचे तापमान ४०० से.च्या पुढे वाढणे, डोकेदुखी वाढणे, शुद्ध हरपणे इ. लक्षणे दिसतात. गर्भवती स्त्रियांना हिवताप झाल्यास गर्भाशय आणि अपरा यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये बाधित तांबड्या पेशी चिकटून बसल्यामुळे गर्भपात होऊ शकतो. प्ला. फाल्सिफेरममुळे प्रमस्तिष्क हिवताप (सेरेब्रल मलेरिया) होऊ शकतो. या हिवतापात शरीराची ढब बदलणे, डोळ्यांची अनियंत्रित हालचाल, झटका किंवा निश्चेतनावस्था अशी लक्षणे दिसतात. यात मेंदूची कार्यक्षमता घटते आणि मृत्यू ओढवू शकतो.
हिवतापाची लक्षणे इतर आजारांसारखी असल्याने केवळ लक्षणांवरून हिवताप ओळखता येत नाही. बाधित व्यक्तीच्या रक्ताचा लेप काचपट्टीवर लावून सूक्ष्मदर्शीखाली पाहिल्यास सूक्ष्मजीवांवरून हिवताप कोणत्या स्वरूपाचा आहे, ते समजते. परजीवी कमी असल्यास निदानाला वेळ लागतो, तसेच निदान करणारी व्यक्ती अनुभवी असावी लागते. म्हणून पुन:पुन्हा उद्भवणारी तापाची लक्षणे, हा संकेत हिवतापाच्या निदानासाठी महत्त्वाचा मानतात. काही वेळा हिवतापामुळे काही तासांत मृत्यू येऊ शकतो.
औषधे : हिवतापाच्या उपचारासाठी सतराव्या शतकापासून दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, पेरू या देशांमध्ये सिंकोना वृक्षाची साल वापरली जात असे. १८२० च्या सुमारास या वृक्षाच्या सालीपासून क्विनीन हे हिवतापावरील प्रभावी औषध शुद्ध स्वरूपात वेगळे करण्यात आले. क्विनीन हे अल्कलॉइड आहे. कर्णनाद, धुसर दिसणे, रक्ताचे विकार आणि अधिहर्षता इ. लक्षणे क्विनीनमुळे उद्भवत असली, तरी हिवताप तीव्र असताना आणि दुसरी कोणतीही औषधे परिणामकारक ठरत नसताना क्विनीन हे औषध वापरण्यात येत होते किंवा अजूनही वापरतात.
यूरोपीय देशांनी १९४०च्या सुमारास क्विनीनचा तुटवडा जाणवू लागला तेव्हा क्विनीनमधील क्विनोलीन हा भाग वापरून क्लोरोक्वीन, मेफ्लोक्वीन, प्रायमाक्वीन यांसारखी प्रभावी औषधे तयार केली. प्राचीन काळापासून चीनमध्ये हिवतापावर औषध म्हणून आर्टेमिसिया ॲन्नूआ ही वनस्पती वापरात आहे. १९७० मध्ये चीनमधील तू यूयू या महिला वैज्ञानिक व त्यांचे सहकारी यांनी या वनस्पतीपासून आर्टेमिसिनीन हे संयुग वेगळे केले. या संशोधनाकरिता २०१५ मधील शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक या विषयातील नोबेल पारितोषिक तू यूयू यांना देण्यात आले. वरील सर्व औषधांमुळे हिवतापाचे परजीवी तांबड्या रक्तपेशींमध्ये असताना मारले जातात. हिवताप तीव्र असल्यास तत्काळ हिवतापरोधी औषधे शिरेवाटे देतात आणि तांबड्या रक्तपेशींची पातळी पूर्ववत करतात, शरीरातील द्रवाची पातळी योग्य राखतात आणि रक्तात जमा झालेले यूरिया बाहेर टाकतात.
सद्यस्थितीत आर्टेमिसिनीन हे औषध फाल्सिफेरम हिवतापावर परिणामकारक मानले जाते. १९८० नंतर आर्टेमिसिनीनापासून तयार केलेले आर्टेसुनेट, आर्टेमीयर आणि इतर रेणू ही औषधे मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. क्लोरोक्वीनच्या वापरामुळे त्याच्याविरोधी सूक्ष्मजंतूंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. यामुळे २००६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने अशी सूचना केली आहे, की आर्टेमिसिनीन वर्गातील औषधे स्वतंत्रपणे न वापरता नेहमी इतर औषधांबरोबर द्यावीत. त्यामुळे आता या औषधांचा वापर संयुक्तपणे केला जातो. हिवतापावर प्रतिबंधक लस शोधण्याचे काम चालू आहे. २०१५ मध्ये यूरोपात आरटीएस, एस (RTS, S) अशा नावाची हिवतापाची लस तयार केली गेली. आफ्रिकेतील ६ आठवडे ते १७ महिन्यांच्या बालकांसाठी या लसीची चाचणी घेतलेली आहे. प्रामुख्याने फाल्सिफेरम हिवतापावर लस शोधण्याचा प्रयत्न असून प्लास्मोडियम परजीवींचा नाश करू शकणारी, प्लास्मोडियम खंडजीव दुर्बल असलेली किंवा परजीवींच्या लैंगिक प्रजननक्षमता नष्ट करणारी लस तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
हिवतापाची लक्षणे, तीव्रता आणि परजीवींचा प्रकार यानुसार औषधोपचार करतात : (१) हिवतापग्रस्त भागात जाणाऱ्या पर्यटकांना किंवा तेथील स्थानिक नागरिकांना क्लोरोक्वीन, मेफ्लोक्वीन, डॉक्सिसायक्लॉन किंवा प्रोग्वानील व ॲटोव्हाक्वीन यांचे संयुक्त उपचार करतात. हे उपचार प्रवासाआधी एक आठवडा व प्रवासानंतर एक ते दोन आठवडे चालू ठेवणे गरजेचे असते. (२) सौम्य हिवताप बरा करण्यासाठी कॅमोक्वीन किंवा ॲमोडायक्वीन यांची एक मात्रा प्रभावी असते. त्याबरोबर क्लोरोक्वीन व इतर औषधे संयुक्तपणे देतात. (३) तीव्र हिवताप बरा होण्यासाठी आर्टेमिसिनीन किंवा क्विनीन ही औषधे शिरेवाटे देतात, रक्तातील ग्लुकोजचे व पोटॅशियमचे प्रमाण वाढवतात, शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने अंग पुसतात आणि ताप कमी करणारी औषधे देतात. (४) ताप बरा झाल्यानंतरही यकृतातील परजीवी नष्ट करण्यासाठी पुढील २-३ महिने रक्ततपासणी करतात आणि प्रायमाक्वीनसारखी औषधे देतात. तसेच रक्तातील हीमोग्लोबिन वाढावे म्हणून लोहयुक्त गोळ्या देतात. यामुळे हिवतापाचे समूळ उच्चाटन करण्यास मदत होते.
नियंत्रण आणि उपाय : क्विनिनानंतर गेल्या ७० वर्षांत हिवतापाच्या उपचारासाठी अन्य २५–३० प्रभावी औषधे शोधली तरीही हिवतापाचे निमूर्लन शक्य झालेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५ सालच्या अहवालानुसार त्या वर्षी जगात सु. २१.४ कोटी रुग्ण हिवतापाने बाधित होते आणि त्यांपैकी सु. ४,३७,००० रुग्ण मृत्युमुखी पडले. त्यांपैकी ६५% रुग्ण १५ वर्षाखालील बालके आणि मुले होती. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये दरवर्षी सु. १२.५० कोटी गर्भवती महिलांना हिवताप होतो आणि त्यामुळे सु. २ लाख अर्भके मरण पावतात. यूरोपात सु. १०,००० लोक हिवतापाने बाधित होतात, तर अमेरिकेत १,३०० ते १,५०० लोक हिवतापाने बाधित होतात. भारतात २०१७ मध्ये सु. ८४ लाख रुग्णांना हिवतापाची लागण झाली, त्यांपैकी सु.५३ लाख रुग्ण फाल्सिफेरम हिवतापाने बाधित होते आणि सु. १९४ रुग्ण मरण पावले. भारतात हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण ओडिशा राज्यात आढळले असून त्याखालोखाल छत्तीसगड, झारखंड, आसाम या राज्यांचा क्रम लागतो. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात हिवतापाचा प्रसार अधिक असल्याचे आढळले आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ या संस्थांच्या मते २००० सालच्या तुलनेत २०१५ मध्ये हिवतापामुळे मरण पावलेल्या रुग्णांमध्ये सु. ६०% घट झाली असून कीटकनाशके संस्कारित मच्छरदाण्या व आर्टेमिसिनीन औषधाचा संयुक्त रूपात वापर हे यामागील कारण आहे.
हिवतापाचा प्रसार विषुववृत्तालगतच्या देशांमध्ये दिसून येतो; उदा., अमेरिका, आशियातील अनेक देश आणि आफ्रिकेतील बहुतेक सगळे देश. यामागे पुढील कारणे आहेत : मुख्यत: उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांतील पर्जन्यमान, उष्ण तापमान आणि अधिक दमटपणा तसेच डासांची वाढ लवकर आणि त्यांचे प्रजनन चांगल्या प्रकारे होईल असे साचलेल्या पाण्याचे प्रवाह इत्यादी.
जगाच्या अनेक भागात ‘हिवताप नियंत्रण आणि निर्मूलन’ करण्याकरिता उपाय योजले जात आहेत. यात प्लास्मोडियमग्रस्त रुग्ण शोधून त्यांवर उपचार करून त्यांची संख्या कमी करणे, हिवतापाचा प्रसार करणारे डास व रुग्ण आणि निरोगी व्यक्ती यांचा संपर्क टाळण्यासाठी कीटक अनाकर्षक मलमे, डासांना पळवून लावणाऱ्या अगरबत्त्या, कीटकनाशक वाफा निर्माण करणाऱ्या वड्या/द्रव आणि मच्छरदाणी यांचा वापर करणे, डासांची पैदास कमी करण्यासाठी पाण्यावर डीझेल/केरोसीन, कीटकनाशके फवारणे, साठलेल्या पाण्यात गप्पी माशांची पैदास करणे, परिसर स्वच्छ ठेवणे इ. उपाय केले जातात.