भारतासह आशिया खंडातील प्रागितिहासाचा विशेष अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेली संस्था. भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व परिषद ही संस्था १९६७ मध्ये निर्माण झाली होती. या कार्याला जोड म्हणून आणि मुख्यतः प्रागितिहास या शाखेच्या वाढीसाठी वेगळी संस्था असावी, या उद्देशाने स्वराज्यप्रकाश गुप्ता, दिलीप चक्रवर्ती आणि डी. पी. अगरवाल यांच्या मदतीने वीरेंद्रनाथ मिश्र यांनी इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज ही संस्था स्थापन केली (१९७७). तसेच त्याच वर्षी मॅन अँड इन्व्हायरन्मंट हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक सुरू केले. हे नियतकालिक गेली चाळीस वर्षे सुरू असून प्रागैतिहासिक पुरातत्त्वाचे ते भारतातून प्रकाशित होणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नियतकालिक मानले जाते. सुरुवातीपासून ते त्यांच्या अखेरपर्यत वीरेंद्रनाथ मिश्र या नियतकालिकाचे प्रमुख संपादक होते. तसेच जवळजवळ दोन दशके त्यांनी संस्थेच्या सरकार्यवाहपदाची धुरा सांभाळली. संस्थेच्या वाढीसाठी स्वराज्यप्रकाश गुप्ता, दिलीप चक्रवर्ती, डी. पी. अगरवाल, शरद नरहर राजगुरू, रामचंद्र जोशी, बी. पी. सिन्हा, बी. बी. लाल, पी. के. थॉमस आणि एम. एल. के. मूर्ती यांनी योगदान दिले आहे.

संस्थेचे मुख्यालय प्रारंभी अहमदाबाद येथे होते. १९८९ पासून ते पुणे येथे डेक्कन कॉलेजच्या आवारात आहे. संस्थेचा मुख्य उद्देश प्रागितिहासात आंतरविद्याशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देणे, हा आहे. संस्था चतुर्थक (क्वाटर्नरी) कालखंड, पुरापर्यावरण आणि पुरातत्त्वीय विज्ञानाच्या सर्व शाखांमधील संशोधन व विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. देशविदेशांतील वरिष्ठ आणि तरुण संशोधकांना एकत्र येऊन विचारविनिमय करता यावा, यासाठी भारतीय पुरातत्त्व परिषद या समविचारी संस्थेच्या सहकार्याने दरवर्षी चर्चासत्रे, कार्यशाळा आणि परिसंवाद यांचे आयोजन केले जाते. दर्जेदार शोधनिबंध सादर करणाऱ्या तरुण संशोधकांना दरवर्षी प्रा. ह. धी. सांकलिया व मालती नागर यांच्या नावे पुरस्कार दिले जातात. तसेच दर दोन वर्षांनी भरीव योगदान करणाऱ्या एका वरिष्ठ पुरातत्त्वज्ञाला ‘प्रा. आर. के. शर्माʼ पुरस्काराने सन्मानित केले जाते.

संदर्भ :

                                                                                                                                                                                         समीक्षक : शंतनू वैद्य