पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन. प्रागैतिहासिक पुरातत्त्वात अशी एक सर्वसाधारण समजूत आहे की, एकेकाळी खंडांचे जे भाग उघडे होते त्या जागी मानवी वसती असली, तरी ते अवशेष आता पूर्णपणाने नष्ट झाले असणार आणि आता ते सापडू शकणार नाहीत. पृथ्वीच्या इतिहासात अनेकदा हिमयुगांचा कालखंड आलेला होता. दोन हिमयुगांच्या दरम्यानच्या काळात समुद्राची पातळी वाढत असे आणि समुद्राने खंडांच्या मंचांवर (Continental Shelf) आंतर हिमयुगांच्या काळात आक्रमण (Post-glacial transgression) केल्याने जमिनीचा मोठा भाग पाण्याखाली जात असे. एकेकाळी जे भाग उघडे होते तेथे प्राणी, वनस्पती आणि मानव होते. समुद्राची पातळी वाढल्याने प्रागैतिहासिक काळात माणसांनी समुद्रातील प्राण्यांचा अन्न म्हणून केलेला वापर किंवा त्यांनी तयार केलेल्या नावा यांचे जवळजवळ सर्व पुरावे आता लुप्त झाले आहेत. जेथे किनाऱ्याजवळ उंच जागी मानवी वसती होती, त्या ठिकाणी मात्र असे पुरावे मिळतात.

टेबल बे, दक्षिण आफ्रिका येथे पाण्याखाली मिळालेली दगडी अवजारे.

समुद्रातील मृदुकायकवची प्राण्यांचा (शंखशिंपले) अन्न म्हणून वापर करण्याचे पुरावे इ.स.पू. ४००० पासून मिळतात. समुद्राची पातळी वर आल्याने ते त्यांचे अवशेष अथवा जीवाश्म समुद्राच्या पाण्यात बुडलेले आहेत; परंतु  विशेष तंत्रसाधने वापरल्याने असे पाण्यात बुडलेले प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय अवशेष फ्रान्स, इटली, ग्रीस, दक्षिण आफ्रिका व कॅलिफोर्निया अशा अनेक ठिकाणी जगभरात विसाव्या शतकाच्या अखेरीपासून मिळू लागले आहेत. अशा पाण्यात बुडलेल्या प्रागैतिहासिक अवशेषांचा अभ्यासाला ब्रिटिश समुद्रवैज्ञानिक एन. सी. फ्लेमिंग यांनी अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्व (Underwater Prehistoric Archaeology) असे नाव दिले आहे. या अभ्यासात प्रागैतिहासिक पुरातत्त्वातील संकल्पना व पद्धती आणि सागरी पुरातत्त्वातील तंत्रज्ञान यांचा मिलाफ आहे. फ्लेमिंग यांनी म्हटल्याप्रमाणे असे संशोधन अद्याप क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट झालेले नाही.

अधोजल प्रागैतिहासिक पुरातत्त्वामध्ये पाण्यात बुडलेल्या गुहांमधील प्रागैतिहासिक अवशेषांच्या अभ्यासाला विशेष स्थान आहे. मेक्सिको, फिलिपीन्स, बेल्जियम, इटली व फ्रान्स यांच्या किनारी भागांत अशा अनेक प्रागैतिहासिक गुहा आता समुद्राच्या पाण्याखाली आहेत. भूमध्य समुद्र आणि अटलांटिकच्या किनारी भागात फ्रान्स ते बेल्जियम या टापूत पुराश्मयुग ते नवाश्मयुगातील अवशेष असलेल्या पाण्याखालील १८० गुहांचा शोध लागला आहे. फ्रान्समधील मार्सेयच्या किनाऱ्याजवळ असलेली कॉस्के गुहा (Cosquer Cave) हे याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

खंडांच्या मंचांवर समुद्रात बुडालेले प्रागैतिहासिक अवशेष कोणत्या स्वरूपात मिळू शकतात, याचे एक उदाहरण दक्षिण आफ्रिकेतील केप टाउनजवळील टेबल बे (Table Bay) या किनाऱ्याचे आहे. तेथे पाण्याखाली ८ मीटरवर निक्षेपात दगडाची अवजारे मिळाली. ही अवजारे अश्युलियन कालखंडातील असून ती पाण्याखालील वाळूखाली ३.५ मी. खोलीवरच्या खडकावर पडलेली होती. त्यांचा कालखंड तीन लाख ते बारा लाख वर्षपूर्व असा आहे. टेबल बे हा अपवाद वगळता आजवर सापडलेले प्रागैतिहासिक अवशेष सर्वसाधारणपणे गेल्या हिमयुगाच्या चक्रामधील म्हणजे एक लाख वीस हजार वर्षपूर्व काळातले आहेत.

ल मोन्ड्रे येथे पाण्याखाली मिळालेली दगडी अवजारे.

फ्रान्समधील नॉर्मंडीच्या किनाऱ्याजवळील ल मोन्ड्रे (La Mondrée) या ठिकाणी मध्य पुराश्मयुगातील २५०० पुरावशेष पाण्याखाली २० मी. खोलीवर केलेल्या उत्खननात मिळाले. त्याचबरोबर गवतखाऊ प्राण्यांची हाडे मिळाली. या पुरावशेषांचा कालखंड सुमारे ७०००० वर्षपूर्व असा आहे.

डेन्मार्कमध्ये समुद्रात पाच मीटरपेक्षा जास्त खोल पाण्यात मध्याश्मयुगातील तीन पुरातत्त्वीय स्थळे मिळाली असून पाण्याखालील उत्खननात तेथे विविध प्रकारचे पुरावशेष मिळाले आहेत. त्यात शिंगांपासून बनवलेली अवजारे, दगडी अवजारे, लाकडी वस्तू, वल्ही आणि ओंडक्यातून कोरून काढलेल्या नावा यांचा समावेश आहे. टायब्रिंड विग, रोनस कोव्ह आणि मोलेगाबेट-२ या स्थळांचा कालखंड इ.स.पू. ७४०० ते ५९०० वर्षे असा निश्चित करण्यात आला आहे.

तंगासेरी येथे पाण्याखाली मिळालेले पुराश्मयुगीन अवजार.

जपानमधील टोकोनामी नदीच्या मुखापाशी २५ मी. खोलीवर ९००० वर्षांपूर्वीची जार्मोन संस्कृतीचे (Jormon Culture)  पुरावशेष मिळाले आहेत. हे आशियातील अशा प्रकारचे एकमेव उदाहरण आहे.

पाण्याखालील प्रागैतिहासिक पुरातत्त्वाचे भारतात एकमेव उदाहरण उपलब्ध आहे. केरळमधील कोल्लाम जिल्ह्यात तंगासेरी या बंदरात २०१४ मध्ये वाळू काढून खोली वाढवण्याचे काम चालू होते. किनाऱ्यापासून अर्धा किमी. आत समुद्रातून ५ ते ८ मी. खोलीवरून उपसलेली वाळू किनाऱ्यावर टाकली जात होती. या वाळूच्या ढिगाऱ्यात पी. राजेंद्रन यांना पुराश्मयुगातील तोड अवजारे मिळाली. ही अवजारे चर्ट आणि क्वार्ट्झाइट या दगडांपासून छिलके काढून बनवलेली आहेत. यावरून असे दिसते की, हिमयुगाच्या काळात समुद्राची पातळी खाली असताना उघड्या पडलेल्या किनारी भागात पुराश्मयुगीन मानवांनी वसती केली असावी. नंतर आंतरहिमयुगात समुद्राची पातळी वाढल्याने ही अवजारे पाण्याखाली गेली.

संदर्भ :

  • Benjamin, J.; Bonsall, C.; Pickard, C. & Fischer, A. Eds., Submerged prehistory, Oxford, 2011.
  • Campbell, Peter B. Ed., ‘An Introduction to Archaeology in Underwater Cavesʼ, The Archaeology of Underwater Caves, pp. 5-27, Southmpton: Highfield Press, 2017.
  • Flemming, N. C. ‘Submarine prehistoric archaeology of the Indian continental shelf: A potential resourceʼ, Current Science, 86 (9): 1225-1230, 2004.
  • Rajendran, P. ‘Antiquities from Sea-bed at Tangasseri, Kollam District, Keralam, South Indiaʼ, Puratattva,  44: 58-62, 2014.

                                                                                                                                                                                     समीक्षक : शरद राजगुरू