पोशेल, ग्रेगरी लुई : (२१ जुलै १९४१–८ ऑक्टोबर २०११). विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. दक्षिण आशियातील पुरातत्त्वविश्वात ग्रेग पोशेल या नावाने परिचित. त्यांचा जन्म अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील टॅकोमा येथे झाला. पोशेल यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून मानवशास्त्रात बी.ए. ही पदवी घेतली (१९६४). पदवीचे शिक्षण घेत असताना ते स्वयंसेवक म्हणून विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ वॉल्टर फेयरसर्विस (१९२१–१९९४) यांच्याबरोबर पाकिस्तानातील क्वेट्टा खोऱ्याच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात सामील झाले. तेथून परतल्यावर पोशेल यांनी एम. ए. पदवी प्राप्त केली (१९६७). त्यानंतर ते लष्करी सेवेत दाखल झाले. ते रणगाडा दलात कॅप्टन या हुद्द्यावर होते. त्यांनी रणगाडा कमांडर म्हणून व्हिएतनाम युद्धात उत्कृष्ट सेवा बजावली. त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना लष्करातच राहण्याचा सल्ला दिला. पोशेल तेथे जनरलच्या हुद्द्यापर्यंत पोहोचले असते; तथापि पोशेलना संशोधनात रस होता.

लष्करी सेवेमधून परतल्यावर पोशेल यांनी विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ प्राध्यापक रॉबर्ट ब्रेडवूड (१९०७–२००३) यांच्या मार्गदर्शनाखाली शिकागो विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केली (१९७४). गुजरातचा प्रागैतिहासिक आणि नागरी सिंधू संस्कृतीचा पुरातत्त्वीय अभ्यास हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

पीएच.डी. चालू असताना पोशेलनी न्यूयॉर्कमधील वासेर कॉलेजमध्ये (Vasser College) एक वर्ष व्याख्याता पदावर काम केले (१९७३-७४) आणि पीएच.डी. प्रबंध पूर्ण होण्याआधीच पोशेल पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या संग्रहालयात (युनिव्हर्सिटी म्युझियम) मध्ये दक्षिण आशियाई क्षेत्रीय अभ्यास विभागाचे व्याख्याते आणि साहाय्यक अभिरक्षक या पदावर रुजू झाले. त्यानंतर साहाय्यक प्राध्यापक (१९७५-१९८१), सहयोगी प्राध्यापक (१९८१-१९८९) अशी पदोन्नती होत त्यांनी १९८९ ते २००४ या काळात प्राध्यापक आणि अभिरक्षक ही पदे भूषवली. निवृत्तीनंतरही (२००४) ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आणि विद्यापीठाच्या संग्रहालयात मानद अभिरक्षक या पदांवर सक्रीय होते. विद्यापीठात असताना पोशेल यांनी राष्ट्राध्यक्ष आणि सिनेटने नेमलेल्या अनेक समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. २००१ पासून पोशेल केंब्रिज विद्यापीठाच्या चर्चिल कॉलेजचे सन्माननीय सदस्य (फेलो) आणि २००३ मध्ये कॉलेज डी फ्रान्स येथे अभ्यागत प्राध्यापक होते. २००४ मध्ये भारतीय पुरातत्त्व परिषदेने त्यांचा मानद फेलो म्हणून सन्मान केला होता.

पोशेल यांना स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन आणि नॅशनल सायन्स फौंडेशन अशा अनेक संस्थांकडून अर्थसाहाय्य मिळाले. त्यामुळेच त्यांना गुजरातमधील ओरियो टिंबो, बाबर कोट आणि रोजडी आणि राजस्थानमधील गिलुंड या पुरास्थळांचे सर्वेक्षण आणि उत्खनन करता आले.

पोशेल यांनी भारतातील ताम्रपाषाणयुग आणि सिंधू संस्कृती या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले असून ते संदर्भसाहित्य म्हणून कायमस्वरूपी मानले जातात. त्यात एन्शंट सिटीज ऑफ द इंडस (१९७९), हरप्पन सिव्हिलायझेशनः ए रिसेन्ट पर्स्पेक्टिव (१९९३), इंडस एजः द रायटिंग सिस्टिम (१९९६), इंडस एजः द बिगिनिंग (१९९९) आणि द इंडस सिव्हिलायझेशनः ए कंटेपोररी पर्स्पेक्टिव (२००२) यांचा समावेश आहे. पोशेलनी १९८९ मध्ये भारतीय उपखंडातील पुरातत्त्वीय स्थळांवर मिळालेल्या त्या वेळेस उपलब्ध अशा सर्व रेडिओकार्बन तिथींचे संकलन केले. रेडिओकार्बन कालमापनाच्या संदर्भात दक्षिण आशियासाठी त्यांचे रेडिओकार्बन डेट्स फॉर साउथ एशियन आर्किऑलॉजी हे पुस्तक मैलाचा दगड मानले जाते.

पश्चिम भारतातील सिंधू संस्कृतीच्या व्यापक अध्ययनानंतर पोशेल यांनी असा सिद्धांत मांडला की, सौराष्ट्रातील लोक सिंधू संस्कृतीच्या अंतर्गतच असले तरी त्यांचा निराळा गट होता. बाबरकोट आणि ओरियो टिंबो येथे केलेल्या संशोधनानंतर त्यांनी असे सुचवले की, सिंधू संस्कृतीच्या अर्थव्यवस्थेत पशुपालक भटक्या समाजांनी अविभाज्य भूमिका बजावली असावी. मोहेंजोदारो (मोहें-जो-दडो) आणि हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या महानगरांच्या ऱ्हासानंतरही सौराष्ट्रात रोजडी या ठिकाणी वसाहत नष्ट न होता व्यवस्थितपणे दीर्घकाळ चालू होती, हे पोशेल यांचे निरीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे.

अनेक वर्षे पश्चिम भारतामध्ये किनारपट्टीवरील स्थळांवर काम केल्यामुळे पोशेलना दिलमुन, मगान आणि मेलुहा हे नेमके कोणते भाग होते हे शोधण्यात रस निर्माण झाला. त्यांनी अरबस्थानातील स्थळांवर कांस्ययुगातील सांस्कृतिक आणि आर्थिक सहसंबंधाचे पुरावे शोधण्यास सुरुवात केली. मगानमध्ये (प्राचीन ओमान) साडेचार हजार वर्षांपूर्वी वापरल्या जात असलेल्या नौकांच्या पुनर्बांधणीचा एक प्रयोग २००० ते २००५ या दरम्यान करण्यात आला. हा प्रयोग ‘मगान नौका पुनर्बांधणी प्रकल्पʼ या नावाने ओळखला जातो. नॉटिकल पुरातत्त्व आणि प्रायोगिक पुरातत्त्व यांच्या एकत्रित वापराच्या या अनोख्या प्रयोगामध्ये पोशेल यांचा सक्रीय सहभाग होता.

सन २००७ मध्ये ओमान सरकारने जागतिक वारसास्थळ असलेल्या बत (Bat) येथे उत्खनन सुरू करण्यासाठी पोशेलना आमंत्रित केले होते. या उत्खननाच्या पहिल्या पाच वर्षांच्या संशोधनाचा अहवाल पोशेल यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला (२०१६).

फिलाडेल्फिया येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Anonymous, ‘Obituary : Gregory L. Possehlʼ, Indiran, 6(3):3, 2012.
  • Kennedy, K. A. R. ‘Obituary : Gregory L. Possehlʼ, Man and Environment, 38(1): 120-121, 2012.
  • Thornton, Christopher; Charlotte, M. Cable & Possehl, Gregory L. The Bronze Age Towers at Bat, Sultanate of Oman Research by the Bat Archaeological Project, 2007-12, University of Pennsylvania Press, Philadelphia, 2016.

                                                                                                                                                                                          समीक्षक : शंतनू वैद्य