ऑब्रे, जॉन : (१२ मार्च १६२६ – ७ जून १६९७). प्रसिद्ध इंग्लिश लेखक व पुरावस्तू संग्राहक. त्यांचा जन्म विल्टशायर परगण्यातील इस्टन पिअर्सी या गावात एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब वडिलोपार्जित मालकीच्या जमिनी विल्टशायर आणि हेरेफर्डशायर या परगण्यांमध्ये होत्या. बरेचसे प्रारंभिक शिक्षण घरीच झाल्यानंतर ते १६४२ मध्ये ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. परंतु इंग्लंडमधील यादवी युद्धामुळे शिक्षणात खंड पडला. दरम्यान त्यांनी काही काळ लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.
ऑब्रे शिकारीसाठी गेले असताना त्यांना ॲव्हबरी येथील महापाषाणयुगीन अवशेषांचा शोध लागला (१६४९). पुढील अनेक दशके या अवशेषांची पद्धतशीर नोंदणी करून त्यावरील संशोधन ऑब्रे यांनी त्यांच्या मॉन्युमेंटा ब्रिटानिका या हस्तलिखित पुस्तकात मांडले. तथापि हे पुस्तक त्यांच्या मृत्यूपर्यंत अप्रकाशितच राहिले. ऑब्रे यांनी सुप्रसिद्ध स्टोनहेंज या वारसास्थळाला भेट दिली आणि त्याचा नकाशा बनवला. ॲव्हबरी येथील आणि स्टोनहेंज हे अवशेष रोमन किंवा डॅनिश लोकांशी संबंधित असल्याचे प्रचलित मत त्यांना मान्य नव्हते. हे अवशेष रोमन कालखंडापूर्वीच्या स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे असल्याची नवीन कल्पना त्यांनी मांडली. या लोकांना त्यांनी ड्रुइड (Druids) असे नाव दिले. ऑब्रे यांच्या मते ड्रुइड हे धर्मगुरू होते. त्यांच्या या संशोधनाचा पुढील काळातील विल्यम स्टकली (१६८७–१७६५) यांच्यासारख्या पुरातत्त्व संशोधकांवर मोठा प्रभाव पडला. पुढे दोन शतके ही कल्पना इंग्लिश पुरातत्त्वात सर्वमान्य होती. ऑब्रे यांनी १६८७ मध्ये गावांच्या नावांचा अभ्यास करणारे व्हिलारे अँग्लिकानम (Villare Anglicanum) हे पुस्तक लिहिले व ते ॲश्मोलियन म्युझियमकडे सोपवले. गावांच्या नावांचा ऐतिहासिक अभ्यास करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. तसेच त्यांनी अँथनी वूड या इतिहासकाराबरोबर काही काळ त्या वेळच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्राचे लेखन करण्याचे काम केले. ऑब्रे यांच्या जीवनकाळात मिसेलेनीज (१६९६) हे एकमेव पुस्तक प्रकाशित झाले. त्यात नाना प्रकारच्या लोककथा व चमत्कृतीपूर्ण कथा संग्रहित केलेल्या होत्या.
ऑब्रे यांनी इतिहासाचा मागोवा घेण्याचा नवा मार्ग दाखवून दिला. लिखित साधनांइतकेच महत्त्व पुरातन काळातील (अद्याप पुरातत्त्वीय अवशेष अशी संज्ञा तयार झालेली नव्हती) वस्तूंना असल्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे भूतकाळ एकप्रकारे निव्वळ लिखित पुराव्यांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यामुळे पुढील काळातील संशोधनाला वेगळी दिशा प्राप्त झाली व निदान काही जणांना केवळ जुन्या वस्तू जमा न करता त्यांचा अर्थ लावावा अशी प्रेरणा मिळाली.
ऑब्रे रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्य बनले (१६६३). त्यांचा सर थॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) सारख्या अनेक विचारवंत, इतिहासकार व अभ्यासक यांच्याशी परिचय होता. ते अत्यंत रोचक व चपखल बोलण्यासाठी, आणि कामातील शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. ऑब्रे यांच्या विविध संग्रहालयात उपलब्ध असलेल्या टिपणांच्या व रेखाटनांच्या अभ्यासातून त्यांनी पुरातत्त्वविद्येत केलेले कार्य एकोणिसाव्या शतकात उजेडात आले.
ऑक्सफर्ड येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Aubrey, Burl, John Aubrey and Stone Circles: Britain’s first archaeologist, from Avebury to Stonehenge, Stroud: Amberley, 2010.
- Bennett, Kate, John Aubrey: Brief Lives with an Apparatus for the Lives of our English Mathematical Writers, Oxford University Press, Oxford, 2015.
- Hunter, Michael, John Aubrey and the Realm of Learning, Duckworth, London, 1975.
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर