शर्मा, तरुणचंद्र : (११ एप्रिल १९२९ – १७ नोव्हेंबर २०११). ईशान्य भारतात महत्त्वाचे संशोधन करणारे प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म आसाममधील नलबाडी जिल्ह्यातील दक्षिणगाव येथे झाला.
शालेय शिक्षण जन्मगावात पूर्ण केल्यानंतर शर्मा यांनी गुवाहाती (गौहाती) येथील कॉटन कॉलेजातून मानवशास्त्रात बी. एस्सी. (१९५१) व गुवाहाती विद्यापीठातून एम. एस्सी. (१९५८) या पदव्या घेतल्या. ब्रिटिश सरकारची कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती (१९६३-१९६६) मिळवून शर्मा इंग्लंडला गेले आणि त्यांनी लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजीतून आसाममधील प्रागैतिहासिक पुरातत्त्व या विषयावर पीएच. डी. संपादन केली (१९६६). त्यांच्या या प्रबंधाला गॉर्डन चाइल्ड मेमोरियल पुरस्कार मिळाला होता.
इंग्लंडहून भारतात परतल्यावर शर्मा गुवाहाती विद्यापीठात रुजू झाले आणि तेथूनच ते प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले (१९८९). यानंतर ते कोहिमा येथे नॉर्थ इस्टर्न हिल विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक (१९९०-१९९४) म्हणून कार्यरत होते. कोहिमा येथे नागालँड विद्यापीठाची स्थापना झाल्यावर ते दोन वर्षे (१९९५-१९९७) अभ्यागत प्राध्यापक पदावर होते.
शर्मा यांनी ईशान्य भारतात विशेषतः मणिपूर, नागालँड आणि मेघालय या राज्यांमध्ये अनेक प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळांचे सर्वेक्षण केले. त्यांनी नॉर्थ काचार हिल्स भागात दाओजली हादिंग, गारो हिल्स भागात सेबलगिरी आणि आता गुवाहाती शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबारी या स्थळांचे उत्खनन केले. शर्मा कोहिमा येथे आल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने नागालँड राज्यात चुंगलीयिम्ती या स्थळाचे चाचणी उत्खनन करण्यात आले (१९९२). या उत्खननातून नवाश्मयुगीन संस्कृतीचे महत्त्वाचे अवशेष मिळाले.
शर्मा यांनी ईशान्य भारतात संशोधन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी मार्गदर्शन केले. अँथ्रॉपॉलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थइस्ट इंडिया (१९७६-१९७८) आणि इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज (१९८४) या संस्थांचे ते अध्यक्ष होते.
गुवाहाती येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Rajaguru, S. N. ‘T. C. Sharmaʼ, Man and Environment, 37(1): 121-122, 2012.
समीक्षक : शंतनू वैद्य