प्राचीन ग्रीकमध्ये इ.स.पू. साधारण सहाव्या शतकांत निर्माण झालेली काळ्या रंगातील मृत्पात्रांवरील लाल आकृत्यांची चित्रशैली. ही शैली साधारण इ.स.पू. ५३० पासून अथेन्समध्ये उदयास आली आणि ह्या शैलीने आधीच्या काळातील काळ्या आकृत्यांच्या शैलीची जागा घेतली. मृत्पात्री चित्रणात ह्या शैलीची निर्मिती इ.स.पू. ५३० ते ४८० व ४८० ते ३२० अशा दोन कालावधीत झाल्याचे दिसून येते. या शैलीच्या प्रमुख उत्पादन केंद्रांमध्ये अथेन्सशिवाय दक्षिण इटलीचा समावेश होतो. ग्रीसच्या इतर भागातही ही शैली स्वीकारली गेली होती. ग्रीसच्या बाहेरचे एट्रुरिया (Etruria) हे या प्रकारच्या मृत्पात्राचे एक महत्त्वाचे उत्पादनाचे केंद्र बनले होते. लाल आकृत्यांच्या शैलीचे अनुकरण हे साधारण इ.स.पू. ४९० नंतरच सुरू झाल्याचे आढळते. ॲटिक लाल आकृत्यांची मृत्पात्री संपूर्ण ग्रीस व त्यापलीकडेही निर्यात केली गेली. इतर मृत्पात्र चित्रणशैलींच्या तुलनेत लाल आकृत्यांची शैली बराच काळ टिकून राहिल्याचे दिसते. या काळात मृत्पात्र निर्मिती क्षेत्रात नावीन्य, गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने अथेन्सबरोबर स्पर्धा करू शकणारी केंद्रे फार कमी प्रमाणात होती. ह्या शैलीचे अखेरचे नोंदविण्यात आलेले मृत्पात्र इ.स.पू. ३२० मधील आहे. संशोधकांनी ह्या शैलीतील कलात्मक गट व स्वतंत्र कलाकार ओळखण्यात यश मिळविलेले दिसते. १९२५ मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक सर जॉन बेझले (Sir John Beazley) यांनी ह्या शैलीतील ६५,००० हून अधिक मृत्पात्रांचा अभ्यास करून त्यातील विविध चित्रण तंत्र पद्धतीवरून जवळजवळ १७,००० हून अधिक कलाकारांची ओळख पटविली.
लाल आकृत्यांच्या शैलीचा शोधकर्ता अँडोकिड्स (Andokides) असल्याचे मानले जाते. अँडोकिड्स व त्याच काळातील सायआक्स (Psiax) या चित्रकारांनी एकाच वेळी काळ्या व लाल आकृत्यांच्या शैलींत चित्रण केल्याचे द्विभाषिक मृत्पात्र चित्रणामध्ये दिसून येते. ह्या चित्रणात जरी काळ्या आकृत्यांच्या शैलीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रगती दिसत असली, तरी त्यांच्या उपलब्ध उदाहरणांमध्ये आकृत्या थोड्या स्तब्ध व क्वचितच एकमेकांवर आच्छादलेल्या दिसतात.
मृत्पात्रांचे तंत्र – आधीच्या काळ्या शैलीतील रचना व तंत्र पुढेही वापरात राहिल्याचे दिसते. लाल आकृत्यांच्या शैलीमध्ये लाल छायाकृती काळ्या रंगाच्या मृत्पात्रांवर काढलेल्या असून काळ्या पार्श्वभूमीवर परतपरत रंगाचा थर दिल्याने रंग अधिक गडद झालेला दिसतो. ह्यामुळे आकृतीवरती नंतर हवे तसे बारकावे चित्रित केलेले आढळतात. बारीक तपशीलासाठी कुंचल्याच्या साहाय्याने अधिक रंगांचा वापर करून लाल आकृत्यांच्या चित्रकारांनी विविध परिणाम साधण्यासाठी कधी पातळ तर कधी दाट रंगांच्या थरांचा उपयोग केलेला दिसतो. कोरीव रेषांनी काळ्या आकृत्यांच्या शैलीप्रमाणेच ह्याही शैलीत महत्त्वाची भूमिका निभावलेली दिसते. त्यांवर जास्त जागा व्यापण्यासाठी अतिरिक्त लाल रंगाचे लेपन केल्याचे आढळून येते. कधी कधी ह्या शैलीतील आकृत्यांवर कोरण्यापेक्षा काळ्या रंगाचे रेखाटन करून बारकाव्यांना अधिक उठाव आणलेला दिसतो.
ग्रीसमध्ये सर्वत्र उपलब्ध असलेली उत्तम स्वरूपाची ॲटीक मृत्तिका ही या मृत्पात्रांसाठी प्रामुख्याने वापरण्यात आलेली दिसते. ह्या मृत्तिकेत उपलब्ध असलेल्या लोहामुळे भाजल्यानंतर तिला केशरीतांबडा रंग आलेला दिसतो. ग्रीक मृत्पात्री प्रामुख्याने चाकावर बनविलेली असून पाया, खालचा भाग, वरचा भाग, मान आणि मृत्पात्र धरण्यासाठी कान वेगवेगळे बनवून ते नंतर एकमेकांना जोडले जात. चित्रणाच्या प्रचलित तंत्रामध्ये, पूर्ण अथवा मृत्पात्राच्या एखाद्या भागावर जाड काळ्या आसंजक रंगाचे कुंचल्याच्या साहाय्याने लेपन करत. ह्या काळ्या रंगामध्ये अल्कली पोटॅश अथवा सोडा, सिलिकॉनचा अंश असलेली मृत्तिका आणि काळे लोहाचे ऑक्साईड यांचे मिश्रण केलेले असे. मृत्पात्रांवर हा रंग घट्ट बसावा म्हणून त्यात बद्धिकारक सिरका मिसळत. ज्यामुळे भट्टीत भाजल्यानंतर सिरका जळून जाऊन रंग मातीवर घट्ट बांधला जातो. काळ्या-आकृत्यांच्या शैलीप्रमाणेच लाल आकृत्यांच्या शैलीची मृत्पात्रे भाजताना तीन टप्प्यात भाजली असावी. ज्यामध्ये आवश्यक तेव्हा प्राणवायूशी संयोग व आवश्यक तेव्हा प्राणवायू पुरवठा बंद केला जातो. ह्या तंत्रात मृत्पात्रावरील हवा तो भाग नारिंगी व हवा तो भाग काळ्या रंगात रूपांतरित होतो.
शैलीचा प्रारंभ काळ – सुरुवातीच्या काळात सुमारे इ.स.पू. ५२० ते ५०० च्या दरम्यान सक्रिय असलेल्या ह्या शैलीचा पाया रचणाऱ्या तथाकथित “पायोनियर ग्रुप” च्या कलाकारांनी लाल-आकृती तंत्राच्या संभाव्यतेच्या पूर्ण विकासाच्या दिशेने पाऊल टाकले. यातील महत्त्वाच्या कलाकारांमध्ये युफ्रोनिओस (Euphronios), युथइमाइड्स (Euthymides), इपिक्तेतोस (Epiktetos) आणि फिंटियास (Phintias) यांचा समावेश होतो. या काळात चित्रातील प्रतिमा वेगळ्या दृष्टीने चित्रित होऊ लागल्याचे आढळते. जसे आकृती समोरून अथवा मागून दाखविलेली दिसते. पूर्वदृष्टी असलेल्या चित्ररचनांमध्ये गती निर्माण होईल असे प्रयोग केलेले होते. युफ्रोनिओसने उठावदार रेषांचा अनुप्रयोग प्रथमच केला. बरेच चित्रकार स्वतः कुंभार म्हणून सक्रिय होते. त्यांनी सायकटर (psykter) आणि पेलीके (pelike) अशा नवीन आकारांच्या मृत्पात्रांचा शोध लावला. हा या काळातील महत्त्वाचा विकासाचा टप्पा मानला जातो.
उत्तर आर्ष काळ – प्रारंभ काळानंतर सुमारे इ.स. पू. ५०० ते ४७० या काळात सक्रिय असलेल्या कलाकारांमुळे या शैलीची नवीन भरभराट झाली. या काळातील काही प्रसिद्ध ॲटीक मृत्पात्र चित्रकारांमध्ये बर्लिन चित्रकार, क्लीओफ्रेड्स चित्रकार तसेच वाडग्यांवरील चित्रणासाठी ओनेसिमोस (Onesimos), डोरिस (Douris), मॅक्रॉन आणि ब्रायगॉस (Brygos) अशा चित्रकारांचा समावेश होतो. या काळातील ॲटीक मृत्पात्री चित्रकारांनी चित्रणात यथार्थदर्शन दाखविण्यात प्राविण्य मिळविलेले दिसते. यामुळे आकृती व कृतींचे अधिक नैसर्गिक चित्रण शक्य झाले. याव्यतिरिक्त वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मृत्पात्रावरील शोभेच्या सजावटीतील व आकृत्यांमधील तीव्र घट, आकृत्यांचे शरीरशास्त्रीय तपशील. नवीन आकारांमध्ये नोलन अँफोरा (Nolan amphora), लेकीथोई (lekythoi), अस्कोस (askos) व दीनोस (dinos) सारख्या वाडग्यांची निर्मिती झाली.
अभिजात काळ – आरंभिक अभिजात काळातील आकृत्या त्यांच्या पूर्ववर्ती आकृत्यांपेक्षा अधिक सशक्त व कमी गतिशील होत्या. आकृत्यांच्या कपड्यांच्या घड्या कमीत कमी रेषांनी दाखविलेल्या आढळतात. देखावे सादर करण्याच्या पद्धतीतही लाक्षणीय बदल झाल्याचे दिसते. चित्ररचनेत यापूर्वी घटना वा प्रसंगावर लक्ष केंद्रित केले जात असे. त्याऐवजी दृश्य नाट्यमय तणावाने दर्शविलेले आढळते. ज्यामुळे दृश्याचा योग्य व संदर्भित अर्थ लागतो. या काळातील महत्त्वाच्या चित्रकारांमध्ये हेर्मोनाक्स (Hermonax), अकिलीस (Achilles), फियाले (Phiale), पॅन चित्रकार (Pan painter), निओबिड (Niobid), पॉलीग्नोटोस (Polygnotos), क्लीओफोन (Kleophon), डायनोस (Dinos), पेन्थेसिलिया (Penthesilea) या चित्रकारांचा समावेश होतो. चौथ्या शतकाच्या सुरुवातीस लाल आकृती तंत्राच्या दोन वेगवेगळया उपप्रकारांची निर्मिती झाल्याचे आढळते. एकीकडे त्याकाळात समृद्धीस आलेल्या उच्च शिल्पकला शैलीचा प्रभाव मृत्पात्रांवरील चित्रणात दिसून येतो, तर दुसरीकडे कामुक दृश्य व भावनात्मक चित्रणावर कलाकारांनी भर दिलेला आढळतो.
सुरुवातीच्या काळातील मृत्पात्रांवर रेखाटलेल्या विषयांमध्ये वीरांची व ग्रीक देव डायोनिससशी संबंधित दृश्ये तसेच दैनंदिन जीवनातील दृश्यांचा समावेश होतो. चित्रणातील आकृत्यांच्या रेखाटनामध्ये नैसर्गिकतेचा अभाव असला, तरी त्यावरील बारकाव्यांनी अधिक सजावटीच्या केलेल्या होत्या. इ.स.पू. ४८० ते ३२३ या कालावधीतील कलश खूप भपकेदार होते; पांढऱ्या, कधीकधी पिवळ्या-तपकिरी, सोनेरी आणि निळ्या रंगामध्ये बारीक तपशील दाखवलेले होते. विषय आणि त्यांवरील अभिक्रिया सहसा किरकोळ स्वरूपाची असली तरी बऱ्याचदा विषय भावनिकही असत. नैसर्गिक चित्रणाच्या आणि खोली दाखवण्यासाठी त्रिमिती चित्रणाच्या प्रयत्नांमुळे, कोरीव कामामुळे मृत्पात्रांचे मूळ जाडीचे स्वरूप बदलल्याचेही दिसून येते.
लाल आकृत्यांच्या शैलीच्या अथेन्स व दक्षिण इटलीच्या बाहेर स्थानिक कार्यशाळा विकसित झाल्या. एट्रुरिया येथे ॲटिक मृत्पात्रांसाठी मुख्य निर्यात बाजारपेठेशिवाय स्वतंत्र उत्पादनाच्या कार्यशाळा विकसित झाल्या. मुख्य प्रवाहातील लाल आकृत्यांची शैली साधारण इ.स.पू. ३६० च्या सुमारास संपुष्टात आली. परिणामी ग्रीक मृत्पात्र चित्रण कलेतील दर्जा आणि कलात्मक गुणवत्ता यांवर परिणाम झालेला दिसतो. तरीही इ. स.पू. चौथ्या ते तिसऱ्या शतकात मृत्पात्री बनविण्याचे कार्य सुरूच राहिलेले दिसते. ॲटिक मृत्पात्र चित्रकारांनी काळ्या समुद्राच्या उत्तर क्षेत्रातील बाजारासाठी इ.स.पू. ३७० ते ३३० या काळात केर्च शैलीतील (Kerch style) मृत्पात्रांची विशेष काळजीपूर्वक निर्मिती केली. त्याचबरोबर दक्षिण इटली, सिसिली (Sicily), अपुलिया (Apulia), लुकेनिआ (Lucania), कॅम्पनिआ (Campania) व पेस्तुम (Paestum) मध्ये स्थानिक स्वरूपातील लाल आकृत्यांच्या शैलीची भरभराट झालेली दिसते.
संदर्भ :
- Boardman, J., The History of Greek Vases, Thames & Hudson, 2006.
- Cook, R.M. and Pierre, Dupont, East Greek Pottery : Routledge, London, 1998.
- Stansbury-O’donnell, Mark, A History of Greek Art, 2015.
समीक्षक : मनीषा पोळ