महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. हिला अंध जमात असेही म्हटले जाते. या जमातीची वसती प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा या विभागांत आहे. त्याच बरोबर ही जमात आंध्र प्रदेशातील आदिलाबादच्या पश्चिमेला पसरलेल्या डोंगराळ भागात आणि अगदी तुरळक प्रमाणात मध्य प्रदेश राज्यात आढळतात. २०११ च्या जनगणनेनुसार आंध लोकांची संख्या ४,७४,११० इतकी होती.

आंध लोकांचे वंशज माहूर व त्याच्या आजूबाजूच्या भागांत राहत होते. कालांतराने ते रोजगारासाठी पलायन करून मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत आणि विदर्भामध्ये स्थलांतर झाले. एशियाटिक सोसायटी, मुंबईचे माजी अध्यक्ष जॉन विल्सन यांच्या इ. स. १८७७ मध्ये प्रकाशित झालेल्या इंडियन कास्ट या ग्रंथातील उल्लेखानुसार प्राचीन आर्यांच्या ‘आंध्र’ या संस्कृत शब्दाचा ‘आंध’ हा अपभ्रंश असावा. ब्रिटिशकालीन इतिहासतार रसेल आणि हिरालाल यांच्या मतानुसार आंध हे नाव आंध्र प्रदेशातील प्रादेशिकतेवरून या जमातीस पडले असावे.

आंध लोकांची बोलीभाषा मराठी असून त्यांचे रितीरिवाज कुणबी मराठा लोकांसारखे आहेत. त्यांची लिपी देवनागरी असून कुलचिन्हेही कुणबी मराठ्यांसारखीच आहेत. या लोकांचे मराठी आणि गोंड जमातीच्या लोकांशी शारीरिक साधर्म्य आहे. त्याच प्रमाणे आंध्र प्रदेशातील आंध लोकांची आंध आणि साधू आंध अशी अंतर्विभागणी होते. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरी ते तेलुगु आणि उर्दू भाषा बोलू व वाचू शकतात. साधारणत: मध्यम ते कमी उंची, जाड ओठ आणि पसरट नाक अशी त्यांची शारीरिक ठेवण आढळून येते. आंध पुरुष धोतर, बंडी परीधान करतात, तर स्त्रिया लुगडे, साडी-चोळी वापरतात. कालमानपरत्वे आंध लोकांच्या पोशाखपद्धतीत बदल झाला आहे.

आंध लोकांतील कुलांची नावे बनसाळे, डुकरे, देवकर, फाफरे, गोहाडे, खैरकर, खडके, मगरे, मिटकरी, नाटकर, नागमोती, पारधी, साखरकर, ताडचे, थोटे, उमरे, वाघमारे इत्यादी आढळून येतात. यांची आडनावे प्राणी अथवा वनस्पतींच्या नावाने असलेल्या कुलचिन्हांवरून पडलेली दिसतात. आंधांची वरताटी व खालताटी अशी दोन प्रकारांत विभागणी झालेली आढळते. वरताटी म्हणजे औरस संततीची प्रजा आणि खालताटी म्हणजे अनौरस संततीची प्रजा अशी एक मान्यता होती. यामुळे यांच्यात सहभोजनास मान्यता असली, तरी विवाहमान्यता नाही.

आंध लोक पूर्वी जंगलातून मोहफुल, डिंक, चारोळ्या इत्यादी वस्तू मिळवून आपला उदरनिर्वाह करीत. कालांतराने ते शेती किंवा हंगामी शेतमजूरी असा शेतीशी निगडित व्यवसाय करू लागले; मात्र आता या जमातीतील अनेक मुलं शिक्षण घेऊन सरकारी किंवा खाजगी नोकरीत आहेत. तसेच काही आंध इतर व्यवसायात स्थिरावलेले दिसतात. आंध लोक शाकाहारी व मांसाहारी आहेत.

आर्थिक परिस्थितीनुसार स्त्री-पुरुष पारंपरिक आभूषणे वापरतात. स्त्रिया कपाळ, हनुवटी व गालावर ठिपके तर डाव्या हातावर तुळशी वृंदावन, सीतेची नहाणी गोंदवून घेतात. मुलगी लहान वयाची असतानाच तिला गोंदविण्याचे काम गावात येणाऱ्या थोटी परधान किंवा गोंडांकडून करून घेतले जाते.

आंध जमात पितृसत्ताक असून कुटुंब पैतृक अधिकाराने चालते. ही जमात प्रामुख्याने अंतर्विवाही असून त्यांच्यात सगोत्र विवाह निषिद्ध आहे. त्यामुळे ते आपल्या गोत्राबाहेर विवाह करतात. लग्न मुलीच्या घरी गोरज मुहूर्तावर (सूर्यास्ताच्या वेळी) लावले जाते. ‘साटवाट’ म्हणजे ज्या घरात मुलगी दिली आहे, त्याच घरातील मुलगी लग्न करून घेणे होय. दोन भावांनी दोन बहिणींशी विवाह करणे, मामाच्या मुलीशी विवाह करणे अशा पद्धतीने वैवाहिक नाती जोडली जातात. जवळच्या नात्यांमधील लग्नसंबंध जमातीत निषिद्ध मानले आहेत.

आंध लोक २०११ च्या सर्वेक्षणानुसार आदी बस्सी, मल्ला व इतर काही धार्मिक प्रथांचे पालन करतात. जमातीत महादेव, खंडोबा, मस्साई, मुंजा किंवा कृष्ण अशा देवतांचे पूजन केले जाते. हे लोक आखाडी, गुढीपाडवा, नागपंचमी, पोळा, शिवरात्री, दसरा, होळी ही हिंदू सण साजरे करतात. सणांच्या वेळी ते गोंड जमातीबरोबर व काही प्रमाणात स्वत: सामूहिकपणे दंडार किंवा दंडारण हे नृत्य-नाट्य साजरे करतात. ते एक प्रमुख मनोरंजनाचे साधन आहे. त्यांचे बंजारा, मराठा, नाईकपोड आणि चांवर यांच्या बरोबर साहचर्याचे संबंध आहेत.

आंध जमातीत मुलीचे पहिले बाळंतपण माहेरी केले जाते. पारंपरिक पद्धतीत गावातील सुईन बाई (दाई) बाळाची नाळ चिमट्याने कापते व ती बाळंतिणीच्या बाजेशेजारी खड्डा खणून पुरली जाते. पाचव्या दिवशी सुईनकडून संध्याकाळी या खड्ड्याचे पूजन केले जाते. या वेळी ‘दिवानाळ’ म्हणजे तेलाचा दिवा लावून गावातील पाच मुलांना वरण भाकरीचे जेवण दिले जाते. बाळंतिणीला पहिले सात दिवस जवसाचे तेल व भात असा हलका आहार दिला जातो. या काळात सुईन बाळ-बाळंतिणीची काळजी घेते. त्याबदल्यात तिला ज्वारी किंवा इतर वस्तू दिल्या जातात. सातव्या दिवशी दोघांना आंघोळ घालून घर, सर्व कपडे धुतले जातात व गोमुत्र शिंपडून जागा पवित्र केली जाते. बाराव्या दिवशी पाच सुवासिनींच्या उपस्थितीत बाळाला पाळण्यात घालून त्याचे नाव ठेवले (बारसे) जाते. सधन आंध लोक या वेळी जेवण देतात; परंतु अशी रूढी किंवा चाल नाही. पाच आठवड्यानंतर बाळाला आईच्या मांडीवर ठेवून मामा त्याचे जावळ काढतो. कापलेले केस वाहत्या पाण्यात सोडून दिले जातात. काळानुसार या पारंपरिक पद्धतीत बदलही झालेले आहेत.

आंध लोकांमध्ये मृत व्यक्तीचे दफन केले जाते. मृत्यूनंतर मृत व्यक्तीचे डोके त्याच्या जवळच्या नातलगाच्या (विशेष करून पती, पत्नी अथवा पुत्र) यांच्या मांडीवर ठेवले जाते. ती व्यक्ती मृताच्या तोंडात साखरेचे पाणी घालते व तुळशीपत्र ठेवते. यानंतर मृताला आंघोळ घालून त्याच्या तोंडात शक्य असल्यास सोन्याचा छोटा तुकडा किंवा पानविडा ठेवून त्याला तिरडीवर ठेवतात. तिरडीला ज्वारी-तुरीचे फुलोरे आणि दोन नाणी बांधतात. मृताचा चेहरा रुई व बेलाच्या पानांनी झाकून मृताला झोपलेल्या अवस्थेत पुरले जाते. नंतर प्रमुख नातलग मृताला मूठमाती देतात. स्त्रियांना या ठिकाणी प्रवेश निषिद्ध असतो; परंतु वृद्ध स्त्रिया अंत्ययात्रेत सामील होऊ शकतात. काही ठिकाणी सर्वच स्त्रिया अंत्यविधीच्या शेवटापर्यंत असतात. या लोकांचा भुताखेतावर विश्वास असतो.

आंध जमातीत पूर्वी पंचायतपद्धत प्रचलित होती. परंपरागत याचे प्रमुख पद जमातीतील ज्येष्ठ व्यक्तीकडे असे. त्यास ‘मोहतरिया’ म्हणत. स्वातंत्र्योत्तर काळात आंध जमातीतून राजकीय नेतृत्व उदयास आल्याचे दिसून येते. यामुळे जमातीतील तरुण पिढी राजकारणात सक्रीय होत आहे. यामध्ये काही प्रमाणात स्त्रियांचाही सहभाग आहे. जमातीत शिक्षणाच्या वाढत्या महत्त्वामुळे त्यांच्यात सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल होताना दिसत आहे.

संदर्भ :

  • Sing, K. S., The people of India, Delhi, 1997.
  • Wilson, John, Indian Caste, Vol. I & II, London, 1877.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर