प्रस्तावना : नैतिक तत्त्वे व नीतिमूल्ये ही प्रत्येक परिचारिकेच्या वर्तणुकीचा अथवा कर्तव्याचा एक अविभाज्य आहे. परिचारिका आपल्या व्यावसायिक पदानुसार रुग्णांना शुश्रूषा देताना वेळोवेळी अनेकदा नैतिक तत्त्वे व नीतिमूल्ये यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन विविध आव्हाने पेलतात.

१९७२ मध्ये अमेरिकन हॉस्पिटल असोसिएशन (AHA) यांचे मार्फत रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठीचा अधिकार प्रस्तावित मान्यताप्राप्त दस्तऐवज म्हणून मानला गेला. ज्याचा परिचर्येच्या आचारसंहिता या संकल्पनेशी जवळून व प्रत्यक्ष रीत्या संबंध असतो.

परिचर्येतील मार्गदर्शक नैतिक तत्त्वे :

  • परिचर्या व्यवसायातील प्रक्रिया (Nursing Procedures) ह्या रुग्णाच्या व लोकांच्या विश्वासावर आधारित असून सर्वांच्या आरोग्यासाठी हितावह असाव्यात.
  • सामाजिक आरोग्याची नैतिक तत्त्वे व नीतिमूल्ये ही एका व्यक्तीच्या आरोग्य अधिकारापासून सुरू होऊन सर्व लोकांच्या आरोग्य अधिकारापर्यंत पोहोचणारी असावीत.
  • आरोग्य सेवा पुरविताना रुग्णाच्या व लोकांच्या हक्कांची पूर्तता व्हावी, परिणामी सर्वलोक निरोगी राहतील. गरजू आणि दुर्लक्षित लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविता येतील.

आरोग्य सेवा अधिकारांतर्गत रुग्णाचे हक्क :

  • रुग्णास नियोजित उपचारासाठी आदराने व सहानुभूतीपूर्वक सेवा दिली जावी.
  • रुग्णास त्याचा आजार व त्यावर करण्यात येणारा इलाज याबाबत संपूर्ण माहिती मिळावी.
  • नियोजित उपचारासाठी संमती पत्रावर सही घेताना आजाराची संपूर्ण माहिती द्यावी.
  • रुग्णास नियोजित उपचारासाठी नकार देण्याचा किंवा विनंती करण्याचा अधिकार असतो. तसेच तो नियोजित उपचारासाठी सातत्याची (continuity) मागणी करू शकतो.
  • रुग्ण संशोधन प्रक्रियेतून त्याचा सहभाग नाकारू शकतो.
  • रुग्णास आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेविषयी व त्यांचे नियम जाणून घेण्याचा हक्क असतो.
  • रुग्णास त्याचा आजार व उपचार याविषयीची कागदपत्रे /दस्तऐवज याबाबत गुप्तता बाळगण्याचा अधिकार असावा.
  • रुग्णास आवश्यकता असल्यास संदर्भ सेवेचा लाभ मिळविण्यासाठी इतर आरोग्य संस्थेविषयी माहिती मिळविण्याचा अधिकार असतो.
  • रुग्णास आपल्या नियोजित उपचारामुळे दुष्परिणाम झाल्यास त्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे मागण्याचा अधिकार असतो.

परिचारिकेसाठी व्यवसायिक आचारसंहिता (Code of Ethics) : आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रुग्ण सेवा व त्यातील जबाबदाऱ्या ह्या रुग्णाच्या आरोग्य सेवा अधिकारासोबत जोडल्या जातात. रुग्ण सेवेची आचारसंहिता ही परिचर्येतील नैतिक तत्त्वे व नीतिमूल्ये यावर आधारित वागणूक यावर अवलंबून असते. अमेरिकन नर्सेस असोसिएशन (ANA) यांनी परिचारिकांसाठी मांडलेली आचारसंहिता ही नैतिक तत्त्वाप्रमाणे बंधनकारक आणि कायद्याच्या चौकटीवर आधारित आहे. तीच आचारसंहिता भारतात सुद्धा वापरात आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • सत्यता (Veracity) : परिचारिकेने रुग्णाला त्याच्या आजारासंबंधी व देण्यात येणाऱ्या शुश्रूषेविषयी आवश्यकतेनुसार सर्व सत्य परिस्थिती समजावून सांगावी.
  • गोपनीयता (Confidentiality) : रुग्णाचा मूलभूत हक्क समजून परिचारिकेने रुग्णाचा आजार, उपचार व केस रेकॉर्ड याबाबत गोपनीयता बाळगावी. त्यावर चर्चा करू नये.
  • समर्थनार्थ /उपदेशपर (Advocacy) : परिचारिकेने रुग्णास शुश्रूषा नियोजनात कोणत्याही प्रकारे अनैतिक तत्त्वामुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन सेवा द्यावी. सर्वतोपरी आश्वासक काळजी घेऊन आजारातून लवकर बरे होण्यास मदत करावी.
  • वात्सल्य पूर्ण काळजी घेणे (Caring) : प्रत्येक रुग्णास एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वात्सल्यपूर्ण व भावनिकतेने सेवा देऊन त्यांचे आरोग्य व निरोगीपण (welfare) जपावे.
  • उत्तरदायित्व (Accountibility) : परिचर्येच्या आचारसंहितेनुसार परिचारिका म्हणून रुग्णास जी सेवा देतात त्यास परिचारिका जबाबदार असतात. रुग्णास उत्तमात उत्तम आणि गुणवत्ता पूर्वक सेवा देणे हे परिचारिकेचे उत्तरदायित्व असते. तसेच परिचारिका ज्या संस्थेत काम करते, त्या संस्थेसाठी आणि आपल्या व्यवसायासाठी केलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मक कृतीचे उत्तरदायित्व स्वीकारते.

 आचार संहिता-परिचर्येतील तत्त्वे ( Ethical Principles/Code of Ethics)

  • परोपकारी वर्तणूक सिद्धांत (Principle of Benificience) : रुग्णाला नियोजित शुश्रूषा देताना त्याला केवळ फायदाच होईल व कोणताही अपाय होणार नाही याची खबरदारी घेणे.
  • स्वायत्तता सिद्धांत (Principle of Autonomy) : रुग्ण ही स्वतंत्र व्यक्ती असून त्याला स्वतःविषयी निर्णय घेण्याची स्वायत्तता असते. उदा., गोपनीयता जपणे, नियोजित उपाय किंवा शस्त्रक्रिया संमती पत्रावर सही करणे.
  • न्यायावर आधारित सिद्धांत (Principle of Justice) :
  • नैसर्गिक हक्क सिद्धांत (Entitement Theory) : प्रत्येक रुग्णास प्रथम व प्राथमिकतेने आरोग्य सेवा मिळविण्याचा अधिकार असतो.
  • उपयोगिता वाद सिद्धांत (Utilitarian Theory) : प्रत्येक रुग्णास जास्तीत जास्त चांगले उपयुक्त स्त्रोत वापरून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात याव्यात.
  • गरजू रुग्णास सेवा देण्याचा सिद्धांत (Maximum Theory) : रुग्णामधील जास्तीत जास्त रुग्ण सेवेची गरज असणाऱ्या रुग्णास आवश्यक त्या सेवा देण्यात याव्यात.
  • समानतावाद सिद्धांत (Egalitarian Theory) : रुग्णालयात दाखल होणारे सर्व रुग्ण हे एकसमान असून सर्वांना आवश्यकतेनुसार परंतु सारख्या सेवा मिळाव्यात.

सामाजिक परिचर्येमध्ये रुग्णालयातील परिचर्येचा तुलनात्मक विचार केला असता नैतिक मूल्याची प्राथमिकता बदलते. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर व सर्वांना उपयुक्त, तसेच उपयोगिता सिद्धांतानुसार कमजोर आणि बाधित व्यक्तीस आचारसंहिता व नैतिक मूल्यावर आधारित सेवा दिल्या जातात.

रिचर्येमध्ये येणाऱ्या तात्विक आडचणी व त्यावर उपाय :

  • आरोग्य समस्यांचे वर्गीकरण करण्यात डॉक्टरांना मदत करताना होणारे मतभेद.
  • रुग्णास आवश्यक असलेल्या सेवा व रुग्णालय व्यस्थापनाच्या नियम व अटी यामध्ये संवाद साधून रुग्ण सेवेचा समन्वय साधणे.
  • आरोग्य समस्या सोडविताना विविध सेवा उपाय योजनांचे नियोजन करणे (Alternative Solution). त्यातील योग्य त्या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याची कसरत करावी लागते.
  • शुश्रूषा नियोजन करताना व्यावसायिक तत्त्वे व नीतिमूल्ये यांची एकत्र सांगड घालणे.
  • रुग्ण परिचर्येच्या समस्या, त्यावर घ्यावयाचे निर्णय व रुग्ण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय यात असमतोल असल्यास रुग्ण सेवेवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे.
  • प्रत्येक रुग्णास चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा देण्याचे परिचारिकेपुढील आव्हान.
  • रुग्ण आणि रुग्ण संस्थेचे नियम यात समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे.
  • सेवा देताना आचारसंहिता सांभाळून आरोग्य व्यवस्थापनेवर येणारा अतिरिक्त ताण कमी करणे.
  • सुरक्षित आरोग्य सेवा देताना रुग्ण, नातेवाईक व संस्थेचे पदाधिकारी याचे बरोबर असणारी वागणूक आदर पूर्वक आणि पारदर्शक ठेवणे.
  • आरोग्य सेवा देताना परस्पर संबंध राखणे (Human Relation), जबाबदारी (Accountibility), आरोग्य सेवा संघाचा एक घटक (Health Team Member), म्हणून कार्यरत असणे.

सारंश : परिचारिकांनी रुग्ण सेवेची जबाबदारी पार पाडण्यासाठी आचारसंहिता आणि नैतिक तत्त्वे व नीतिमूल्ये ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत. ज्या भारतीय परिचर्या परिषदेने प्रस्थापिक केलेल्या असून प्रत्येक व्यवसायिक परिचारिकेसाठी एक मापदंड आहेत.

संदर्भ :

  • भारतीय परिचर्या परिषद
  • Marcia Stanhope; Jeanette Lancaster, Promoting Health of AggregatesFamilies and Individuals, 4th ed.