आल्बोर्नोज, सीवीरो ओचोआ द : (२४ सप्टेंबर १९०५ – ०१ नोव्हेंबर १९९३) सीवीरो ओचोआ द आल्बोर्नोज यांचा जन्म स्पेनच्या किनारपट्टीवर लुआर्का येथे झाला. सीवीरो यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माल्गा येथे पूर्ण झाले. त्यांच्या माध्यमिक शाळेचे नाव होते, इन्स्तित्यूतो द बॅकिलरातो द माल्गा. तेथील रसायनशास्त्राच्या शिक्षकांनी बालवयातच सीवीरो यांना नैसर्गिक विज्ञानाची गोडी लावली.
माल्गा महाविद्यालयामधून सीवीरो यांनी बी.ए. पदवी मिळविली. वैद्यकीय शिक्षणाची काही काळ तयारी करून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ माद्रिदमधील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षणाचे दुसरे वर्ष चालू असताना प्राध्यापक हुआन नेग्रिन यांच्या प्रयोगशाळेत शिक्षण सहाय्यक म्हणून त्यांना काम मिळाले. विशेष प्राविण्यासह त्यांनी एम.डी. ही पदव्युत्तर पदवी मिळविली त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक नोएल पेटन आणि ग्लासगो विद्यापीठातील हुआन नेग्रिन हे होते.
गुरुस्थानी असणाऱ्या काहाल यांच्याबरोबर संशोधन करण्याची सीवीरो यांची तीव्र इच्छा होती. काहाल निवृत्त झाल्याने सीवीरो यांचे स्वप्न अपुरे राहिले. नेग्रिन यांनी सीवीरो आणि होजे वाल्दकासीस यांना मूत्रामधून क्रिएटिनीन वेगळे करण्यासाठी प्रयत्न करा असे सुचवले होते. त्यांनी मूत्र क्रिएटीनीनबरोबर स्नायूंमधील क्रिएटिनीन अलग करण्याची पद्धत शोधून काढली. सीवीरो आणि वाल्दकासीस यांनी कालांतराने ती पद्धत आणखी सुधारली. पुढे दोघांनी मिळून क्रिएटिनीन अलग करण्याच्या या पद्धतीवर एक शोधनिबंध लिहिला. तो जर्नल ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्रीकडे पाठवला. तो प्रकाशनासाठी लगेच स्वीकारला गेला. ही सीवीरो यांच्या जीवरसायनशास्त्रातील कारकीर्दीची सुरुवात होती.
‘अधिवृक्क ग्रंथींचा स्नायूंच्या आकुंचनावर परिणाम’ हा प्रबंध सादर करून एम.डी. मिळाल्यानंतर सीवीरो, स्पॅनिश कौन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च यांच्याकडून मदत घेऊन जर्मनीला गेले. तेथे ऑटो मायरहॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली कैझर विल्हेल्म इन्स्टिट्यूट फर मेडिसिनेझ फर्स्चंग, या संस्थेत संशोधन करू लागले. या कालावधीत त्यानी स्नायूंचे जीवरसायनशास्त्र आणि शरीरक्रियाशास्त्र यांचा अभ्यास केला. मायरहॉफ यांची प्रयोगशाळा सीवीरो यांच्या मते जगातील सर्वात अग्रगण्य जीवरसायनशास्त्र प्रयोगशाळा बनली होती. ऐच्छिक स्नायूंसारख्या मोठ्या इंद्रियापासून या प्रयोगशाळेचे लक्ष्य पेशीसारख्या लघुतम सूक्ष्म घटकाकडे केंद्रित झाले होते. ग्लायकॉलिसीस आणि किण्वन या जीवरासायनिक प्रक्रियांचा अभ्यास या प्रयोगशाळेत होत होता. सीवीरो माद्रिद विद्यापीठात शरीरक्रियाशास्त्राचे व्याख्याता म्हणून कार्यरत राहिले. काही काळ एच. डब्ल्यू. डडली यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लायॉक्सीलेज विकरावर संशोधन करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी हे काम नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च (एनआयएमआर), लंडनमध्ये केले. या कार्यकाळात त्यांना एनआयएमआरचे संचालक हेन्री हॅलट डेल भेटले. डेल हे नोबेल पारितोषिक विजेते आणि हिस्टॅमिन तसेच ॲसिटिलकोलीनचे संशोधक होते. चेतातंतू संवेग वहन संशोधन ऑटो लोवी यांचे ते सहसंशोधक होते. सीवीरो यांच्या उमेदवारीच्या काळात सर डेल यांनी त्याना कोरी दंपतीला उद्देशून एक शिफारस पत्र दिले. त्यामुळे डंडी येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये नवस्थलांतरित सीवीरो यांना जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापकपद मिळण्यात मदत झाली.
सीवीरो माद्रिद विद्यापीठामध्ये परतले. ह्रदय स्नायूंतील ग्लुकोजलयन क्रियेचा (ग्लायकॉलायसिसचा) अभ्यास त्यांनी सुरू केला. पदोन्नती मिळून सीवीरो मेडिकल संशोधनातील शरीरक्रियाशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. परंतु स्पेनमधील गृहयुद्धामुळे स्पेन सोडून जर्मनी, इंग्लंडद्वारे ते अमेरिकेत पोहोचले. परिस्थिती बिकट झाल्याने त्यांना वारंवार स्थलांतरे करावी लागली. तरीही त्यांची संशोधन क्षेत्रात काम करण्याची ओढ कमी झाली नाही.
पुढे मायरहॉफ यांच्या हायडेलबर्ग जर्मनीतील प्रयोगशाळेत संशोधन सहाय्यक म्हणून काम करण्याची सीवीरो याना संधी मिळाली. ग्लुकोजच्या विनॉक्सी (anerobic) श्वसन आणि किण्वन (fermentation) यातील काही पायऱ्यांचा त्यांनी अभ्यास केला. नंतर प्लायमाउथ मरीन बायॉलॉजिकल लॅबॉरेटरीत सीवीरो रे लँकेस्टर अन्वेषक पदावर कार्यरत होते. नंतरची सुमारे तीन वर्षे सीवीरो यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामधील प्राध्यापक आर. ए. पीटर्स यांच्या प्रयोगशाळेत जीवनसत्त्व बी-१ (थायमिन) संबंधी नफिल्ड (Nuffield) संशोधन सहाय्यक म्हणून काम केले.
ऑक्सफर्ड विद्यापीठात असताना पेशी पातळीवरील श्वसनक्रियेत केलेले काम पुढे त्यांनी अमेरिकेतही चालू ठेवले. सीवीरो अमेरिकेत सेंट लुइसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातील वैद्यक विभागात पोहोचले. तेथे औषधीशास्त्र विभागात कार्ल आणि जर्टी कोरी यांच्याबरोबर विकरांवर संशोधन करण्याची संधी त्याना मिळाली. नंतर सीवीरो न्यूयॉर्क विद्यापीठातील वैद्यक विभागात सहसंशोधक म्हणून रुजू झाले. तेथेच १९४५ साली सहाय्यक प्राध्यापक, व पुढे औषधीशास्त्र विभागात पूर्ण प्राध्यापक, काही काळानंतर जीवरसायनशास्त्र विभागात प्राध्यापक अशी क्रमाने उच्च पदे त्यांनी मिळविली. नंतर ते त्या विभागाचे अध्यक्ष झाले.
सीवीरो यांचे काम जैविक ऑक्सीडीकरण (biological oxidation) आणि ऊर्जेचे हस्तांतरण (transfer of energy) या जीवशास्त्रातील मूलभूत संकल्पनांवर प्रकाश टाकणारे होते. त्याचा कर्बोदक आणि मेदाम्ले यांचा चयापचय कळायला उपयोग झाला. तसेच केंद्रकाम्लांचे संश्लेषण, पायरुव्हिक आणि कीटोग्लूटारिक आम्ल यांच्याशी संबंधित फॉस्फेट वा कार्बनडाय ऑक्साइड रेणू जोडणे या क्रिया समजण्यात स्पष्टता आली. जीवनसत्त्व बी-१ म्हणजेच थायमिनचे पेशीतील काम, क्रेबच्या ऑक्सीश्वसन चक्रातील (Krebs citric acid cycle) पायऱ्या संगतवार दाखवणे हे सारे सीवीरो यांच्या प्रदीर्घ प्रयत्नांमुळे शक्य झाले.
सीवीरो यांनी जीवाणूंमध्ये डीएनए आणि आरएनए ही केंद्राकाम्ले कशी तयार होतात, त्यासाठी जीवाणूंतील कोणती विकरे उपयोगी पडतात याचा अभ्यास केला. सीवीरो आणि मरियन ग्रनबर्ग मॉनेगो या दोघांना केंद्रकाम्लांची घटक एकके न्यूक्लिओटाइड्स जोडणारे विकर जीवाणूंत सापडले. त्याला त्यांनी पॉलीन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेझ असे नाव दिले. त्यांना आधी वाटले की पेशीकेंद्रकातील डीएनएत साठवलेल्या माहितीनुसार हे विकर न्यूक्लिओटाइड्स विशिष्ट क्रमाने आणि ठराविक संख्येत जोडून आरएनए बनवत असेल. परंतु नंतर हा अंदाज चुकीचा आहे हे सिद्ध झाले. स्तनी प्राण्यात ते आढळत नाही. त्याअर्थी ते आरएनए बनवण्याचे काम करत नसेल हे कळले. कालांतराने प्रयोगशाळेत पॉलीन्यूक्लिओटाइडस फॉस्फोरायलेझचा जनुकीय सांकेतिक भाषा जाणून घेण्यात उपयोग झाला. पुढे पॉलीन्यूक्लिओटाइड फॉस्फोरायलेझ विकर पेशींत वेगळेच उपयुक्त काम करते हे लक्षात आले. ते काम म्हणजे, उपयोगी नसणारे आरएनए रेणू विघटनानंतर घटक न्यूक्लिओटाइड्स पुनर्वापरासाठी मिळवणे. लवकरच आर्थर आणि थॉमस कॉर्नबर्ग यांनी ई. कोलाय जीवाणूंतून डीएनए पॉलीमरेझ हे विकर वेगळे करण्यात यश मिळवले. ते न्यूक्लिओटाइड्स विशिष्ट क्रमाने आणि ठराविक संख्येत जोडून डीएनए बनवू शकते हे कळले.
सीवीरो यांना पाच दशकांच्या कार्यकालात अनेक सन्मान मिळाले. अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली. सान मार्कोस विद्यापीठ, लिमा, पेरू यानी त्याना मानद प्राध्यापकपद दिले. नॅशनल मेडल ऑफ सायन्स देऊन अमेरिकन सरकारने त्यांचा गौरव केला. सीवीरो यांना मिळालेला सर्वोच्च सन्मान म्हणजे आर्थर कॉर्नबर्ग यांच्याबरोबर १९५९ चे शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार. हा पुरस्कार सीवीरो आणि कॉर्नबर्ग यांना आरएनए आणि डीएनए यांचे संश्लेषण होण्याची पद्धत शोधून काढल्याबद्दल दिले गेले.
सीवीरो यांनी लिहिलेले संशोधनपर लेख प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत. उदा., ॲन्युअल रिव्ह्यू ऑफ बायोकेमिस्ट्री; जर्नल ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्री; यूरोपियन जर्नल ऑफ बायोकेमिस्ट्री; बायोकेमिकल अँड बायोफिजिकल रिसर्च कम्युनिकेशन्स; प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS).
सीवीरो प्रथिन संश्लेषण आणि आरएनए विषाणूंवर काम करत होते. आयुष्याची शेवटची काही वर्षे मायदेशी घालवावी या विचाराने ते स्पेनला परतले. तेथे वैज्ञानिक धोरणांना अंतिम स्वरूप देण्यात त्यांनी स्पॅनिश सरकारला मदत केली.
ते माद्रिद, स्पेन येथे न्यूमोनियाने निधन पावले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1959/ochoa/lecture/
- https://www.britannica.com/biography/Severo-Ochoa
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/1959/ochoa/facts /
- https://www.encyclopedia.com/people/medicine/medicine-biographies/severo-ochoa
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.