बापट, उल्हास यशवंत : (३१ ऑगस्ट १९५० – ४ जानेवारी २०१८). प्रसिद्ध निष्णात महाराष्ट्रीय संतूरवादक आणि या तंतुवाद्यावर ‘मींड’ (स्वरसातत्य) घेण्याच्या तंत्राचे विकासक व ‘क्रोमॅटिक ट्युनिंग’ (अनावश्यक असलेला स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य) या वाद्य जुळविण्याच्या स्वतंत्र व वेगळ्या शैलीचे विकासक.
उल्हास बापट यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील यशवंत गणेश बापट हे पोलीस खात्यात नोकरीस होते. त्यांना संगीताची जाण आणि आवड होती. ते गायकही होते. पुण्यातील गोपाळ गायन समाजातील देसाई मास्तरांचे ते पट्टशिष्य. त्यांनी मुंबईत घरीच खारकर मास्तरांची तबल्याची शिकवणी लावलेली होती. उल्हास बापट यांच्या आई वसुंधरा बापट या फिनिक्स मिलमध्ये नोकरी करत असत. आईकडूनही त्यांच्या संगीतशिक्षणाला सक्रीय उत्तेजन मिळाले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत पोद्दार व विल्सन हायस्कूलमध्ये झाले. गव्हर्नमेंट स्कूल ऑफ लेटरप्रेसमधून त्यांनी पदविका घेतली. नोकरी करत असताना घरी धाकट्या भावासमवेत ते स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसायही करू लागले. १९७३ साली नोकरी सोडून त्यांनी ‘मुद्रा ॲडव्हर्टाइझिंग टाइप सेटर्स’ या नावाने छापखाना सुरू केला.
उल्हास बापट यांना बालपणापासूनच तालाची, तबल्याची आवड व आकर्षण होते. वडिलांबरोबर त्यांनीही सुरुवातीला खारकर मास्तरांकडे तबल्याचे प्राथमिक धडे घेतले. नंतर रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे त्यांनी तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. साथीसाठी आणलेली हार्मोनियम वाजविण्याचे कसब त्यांनी स्वत: साध्य केले. तसेच इटालियन व्हायोलिनही ते शिकले. म्हापसेकर गुरूजींसोबतच्या कार्यक्रमात तबल्याचे छोटे एकपात्री कार्यक्रम सादर ते करत. त्यामुळे त्यांना मैफलीच्या तंत्राची ओळख झाली. बॉम्बे लॅबमध्ये तबलावादनाच्या पहिल्या ध्वनिमुद्रणाची संधी त्यांना मिळाली (१९७४). ते सतारवादक उ. उस्मानखाँना मैफलीत तबल्याची साथ करत. तसेच प्रसिद्ध तबलावादक सुरेश हळदणकरांसोबतही विविध कार्यक्रमांत तबलावादन करत असत. भारतातील प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मांच्या एका कार्यक्रमात त्यांनी संतूर वाद्यावर वाजविलेला ‘अभोगी’ हा राग ऐकला आणि त्यांना संतूरवादन शिकण्याची प्रेरणा मिळाली; पण या अनवट वाद्याचा गुरू न मिळाल्यामुळे अनुभव हाच गुरू मानून त्यांनी सराव सुरू केला. त्यातूनच हार्मोनियमप्रमाणे संतूरवर कोणताही राग सहजपणे वाजविता यावा या दुर्दम्य इच्छेपोटी त्यांनी सर्वच्या सर्व १२ स्वर संतूरवर लावण्याची अफलातून कल्पना (क्रोमॅटिक पद्धत) अथक प्रयत्नांनी साध्य केली. तसेच मींड काढण्याचे कौशल्यही प्राप्त करून घेतले. त्यामुळे ते मैफलीत रागमाला (बागेश्री, जयजयवंतीपासून मालकंसपर्यंत अनेक रागांची मालिका) सलगपणे सादर करू शकत असत.
पं. रविशंकर यांच्या ‘संचारिणी’ या संस्थेच्या आणि ब्राह्मण साहाय्यक संघ यांच्या सहयोगाने झालेल्या जाहीर कार्यक्रमात पं. उल्हास बापट यांनी पहिले सार्वजनिक संतूरवादन केले. यानंतर प्रसिद्ध सरोदवादिका झरीन दारूवाला शर्मा यांनी त्यांना तंतकारी अंगाचे शिक्षण दिले व पुढे पं. के. जी. गिंडे यांच्याकडे ते रागदारी संगीत शिकले. याशिवाय जयपूर अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांच्याकडूनही त्यांना संगीत शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रत्यक्ष संतूरवादक गुरू उपलब्ध नसले तरी शास्त्रीय संगीताची तालीम त्यांना मिळाली. या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य प्राप्त केले आणि वादनकला विकसित केली. नंतरच्या काळात राहुलदेव बर्मन, खय्याम, वनराज भाटिया, अशोक पत्की, श्रीनिवास खळे, अनिल मोहिले आदी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांकडे तसेच अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संतूरवादन केले.
१९८८ पासून अमेरिका, कॅनडा, स्कॉटलंड, आयर्लंड, स्वित्झर्लंड, दुबई, चीन व पाकिस्तान अशा अनेक ठिकाणी त्यांनी यशस्वी कार्यक्रम केले. त्यांच्या संतूरवादनाच्या बऱ्याच ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. पं. नारायण मणी यांच्याबरोबर त्यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे इन कस्टडी आणि कॉन्व्हर्सेशन्स या नावांचे दोन ध्वनिमुद्रिका संच प्रकाशित झाले आहेत. २००१ मध्ये बेलारूस, फिनलंड व जर्मनी या देशांचा त्यांनी दौरा केला. संतूरवादनाच्या तेथे केलेल्या सादरीकरणामुळे त्यांना तेथे खूप प्रसिद्धी मिळाली. २००३ मध्ये न्यूयॉर्क येथे बृहन्महाराष्ट्र संमेलनात व २०१२ मध्ये यूरोपीय मराठी संमेलनात त्यांनी आपली कला सादर केली आहे. अनेक कलाकारांच्या ध्वनिमुद्रिकांसाठी, नृत्यनाट्यांसाठी, योगाभ्यासकांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त अशा ध्वनिमुद्रिकांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन व संतूरवादन केले आहे.
नंतरच्या काळात संतूरवादनाच्या प्रसारासाठी त्यांनी घरीच संतूरवादनाचे वर्ग सुरू केले होते. त्यात रेखा आचरेकर, मंगेश जगताप, वरदा खाडिलकर व राधिका माने इत्यादी शिष्यांनी प्राविण्य मिळवले.
उल्हास बापट यांनी पारिजात, चारुवी हे प्रभात समयीचे व गोरख कंस, अमृत रांजणी, अभोगिनी हे रात्र समयीचे, पूर्ण नाद (समय बंधमुक्त), सावली हा दोन षड्ज समावेशक व ‘दिमिनिसा’ हा वेस्टर्न हार्मनी डिमिनिशवर आधारित अशा नवीन रागांची निर्मिती केली. तसेच ११ मात्रांचा (साडेपाच मात्रांचे दोन खंड) ताल ‘मकरंद’ व ९ मात्रांचा (साडेचार मात्रांचे दोन खंड) असलेला ताल ‘प्रतीक’ यांचीही निर्मिती केली. २०१२ मध्ये सह्याद्री दूरदर्शन वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांपैकी ‘संगीतरत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.
वृक्कविकाराने त्यांचे मुंबई येथे निधन झाले.
संदर्भ :
- बापट, उल्हास, सहज स्वरातून मनातलं, मुंबई, प्रथमावृत्ती जाने. २०१५.
समीक्षक : सुधीर पोटे