संपादित ज्ञानाचे उपयोजन करण्याचे कौशल्य म्हणजे क्षमताधिष्ठित अध्ययन. शिक्षणक्षेत्रासंबंधात क्षमतेला शिकण्याची शक्ती किंवा ताकद असे म्हणतात. क्षमता मिळविताना आकलन, उपयोजन, विश्लेषण, संयोजन, शैक्षणिक मूल्यमापन इत्यादी बौद्धिक प्रक्रियांचा वापर करून मिळवावी लागते. अभ्यासक्रमात ज्या विषयांचा समावेश केलेला असतो, त्या प्रत्येक विषयाची उद्दिष्टे दिलेली असतात. विषयांच्या उद्दिष्टांवरून प्रत्येक विषयाच्या अध्ययन-अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्य पातळीवर कोणते वर्तन बदल दिसून यायला हवेत, याचा बोध होतो. शिकविलेल्या संज्ञा, सूत्रे, संरचना, सिद्धांत आठवून लेखी व तोंडी स्वरूपात अभिव्यक्त करणे, हे ज्ञानात्मक पातळीवरील उद्दिष्टांसंदर्भात अपेक्षित असते. आकलनामध्ये साम्य भेद ओळखणे, फरक स्पष्ट करणे, उदाहरणे देणे, वर्गीकरण करणे या गोष्टी अपेक्षित असतात. एखाद्या गोष्टीचे केवळ ज्ञान व आकलन उपयोगी नसते, तर संपादित ज्ञानाचा दैनंदिन व्यवहारात उपयोग करण्याची क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होणे महत्त्वाचे असते. ज्यामुळे ते आपले जीवन संपादित केलेल्या ज्ञानाचा उपयोग करून समर्थपणे व यशस्वीपणे जगू शकतात.
प्रत्येक माणसामध्ये काही सुप्त शक्ती आणि काही उपजत गुण मूलतः अदृश्य स्वरूपात असतात. त्यांचे उपयोगितेत म्हणजे स्वरूपातील दृश्य रूपांतर म्हणजे क्षमता होय. उदा., वीज जेव्हा बल्बमध्ये येते, तेव्हा तिच्या प्रकाशमय क्षमतेचा प्रत्यय येतो. हवा अदृश्य असते; परंतु पवन चक्की जेव्हा फिरते, तेव्हा तिच्या क्षमतेचा प्रत्यय येतो. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या या सुप्त गुणांच्या शक्तींची जाणीवही त्याच पद्धतीने होते. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतून त्यांचा विकास होणे आवश्यक असते. सराव, प्रशिक्षण, संधी व पक्वता यातून क्षमतांचा विकास होतो.
विविध इयत्तांच्या अभ्यासक्रमांमध्ये विविध विषय असतात. ज्याद्वारे विद्यार्थ्यांत सुप्तावस्थेमध्ये असणाऱ्या विविध क्षमता विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास घडविला जातो; परंतु या हेतूकडे दुर्लक्ष होऊन शिक्षणातून केवळ स्मरणशक्ती वा आकलनशक्तीचा विकास होताना दिसतो. प्रत्येक विषयात भिन्न भिन्न क्षमता आढळतात. भाषा विषयात श्रवण, भाषण, वाचन, लेखन, आकलन कार्यात्मक व्याकरण इत्यादी क्षमता; गणितात संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन व घनमूळ, चलन, मापन इत्यादी क्षमता; भूगोलात नकाशावाचन, स्थळ, नदी, धरणे, पर्वत, समन्वेषक इत्यादी क्षमता; विज्ञानात निरीक्षण, प्रयोग, कार्यकारणसंबंध इत्यादी क्षमता असतात. या क्षमतांचा विकास इयत्तांनुसार वाढत जातो. केवळ माहिती वाचणे व पाठ करणे म्हणजे अध्ययन नसून अध्ययनातून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचा क्रमश: विकास होणे महत्त्वाचे असते.
ज्ञान व आकलन या बोधात्मक पातळीवरील निम्न दर्जाच्या प्रक्रिया असतात. विश्लेषण, संश्लेषण व मूल्यमापन या उच्च बोधात्मक क्रियांच्या विकासासाठी शिक्षकाला अभ्यासक्रमातील विविध विषयांचा साधन म्हणून उपयोग करता आला पाहिजे. शिक्षण प्रक्रियेतील ही त्रुटी दूर करण्यासाठी अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञांनी एक प्रयोग केला. त्यांनी प्रौढ नागरिकाच्या यशस्वी जीवनासाठी कोणकोणत्या क्षमता आवश्यक आहेत, याचा शोध घेतला. या क्षमतांना केंद्रीभूत ठेवून सर्व अध्ययन अनुभवांची आखणी केली आणि या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात की, नाही याचे मूल्यमापन केले. प्राप्त प्रत्याभरणानुसार उपचारात्मक अध्यापन केले. त्या वेळी त्यांना असे आढळून आले की, क्षमतेवर विद्यार्थी प्रभुत्व संपादन करू शकतो. अमेरिकेत शिक्षणाची अंमलबजावणी करताना दृश्य स्वरूपातील वर्तनावरून क्षमताविकास मोजला गेला. त्यामुळे हा कार्यक्रम तिथे प्रभावी ठरला नाही.
ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करता येणे महत्त्वाचे असते. शिक्षणाच्या उपयोगिता मुल्यातूनच क्षमताधिष्ठित शिक्षणाची गरज निर्माण होते. या पार्श्वभूमीवरच १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनी प्रत्येक इयत्तेअखेर प्राप्त करायच्या किमान अध्ययन क्षमता निश्चित कराव्यात, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रम तयार केला. महाराष्ट्रात १९९४ मध्ये क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्यात येऊन १९९५ पासून या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. १९८६ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानंतर शिक्षक शिक्षण संकल्पनेत अनेक बदल झाले. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) क्षमताधिष्ठित शिक्षणानुसार शिक्षक शिक्षणाच्या अभ्यासक्रम चौकटीत क्षमता, बांधिलकी आणि वर्तन यांची क्षेत्रे पुढीलप्रमाणे निश्चित केली ꞉
विद्यार्थ्यांचे क्षमताधिष्ठित अध्ययन होण्यासाठी शिक्षकाने विचारात घ्यायच्या बाबी ꞉
- अध्यापनामध्ये आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्याचा सुयोग्य वापर करावा.
- क्षमता संपादणुकीसाठी अध्यापनात कोणत्या अध्ययन प्रसंगाचा उपयोग करता येईल, याचा विचार करावा.
- क्षमता विकसनात अध्ययन अनुभवांचे महत्त्व लक्षात घेऊन अध्यापनाच्या वेळी व इतर वेळी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अध्ययन अनुभवांची संधी प्राप्त करून द्यावी.
- अभ्यासक्रमात दिलेल्या क्षमता केवळ पाठ्यपुस्तकातील आशयाच्या अध्यापनातूनच विकसित होत नाहीत, तर त्यासाठी सहशालेय उपक्रमांचीदेखील मदत घ्यावी लागते, हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त करून द्यावी.
- आपले अध्यापन विद्यार्थीकेंद्रित, आनंददायी आणि कृतीयुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
- अपेक्षित असलेल्या किमान क्षमता विकसित करताना विद्यार्थ्यांना नाऊमेद न करता त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्वास संपादन करावा आणि विश्वासातून त्यांचा आत्मविश्वास वाढीस लावावा.
- वर्गात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घटक सोपे करून शिकवावे, उपचारात्मक अध्यापन करावे.
- प्रभुत्व संपादनासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा सराव द्यावा. त्यासाठी त्यांना स्वयंअध्ययन साहित्याचा उपयोग करण्यास सांगावे.
- सर्व विद्यार्थ्यांत सर्व क्षमता विकसित होण्यासाठी प्रयत्न करावा इत्यादी.
समीक्षक ꞉ के. एम. भांडारकर