हा ऐतिहासिक शैलीचा एक अमेरिकन चित्रपट आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत एका जर्मन व्यक्तीने हजारो ज्यू धर्मियांचे प्राण वाचविले होते. या सत्यघटनेचे वर्णन असलेल्या ऑस्ट्रेलियन लेखक थॉमस केनेली यांच्या शिंडलर्स आर्क या कादंबरीवर आधारित हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला. प्रसिद्ध अमेरिकन दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. स्पिलबर्ग यांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले आहे. चित्रपटातील कथेला पूरक असणारा तंत्राचा प्रभावी वापर हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे दिग्दर्शकीय वैशिष्ट्य मानले जाते.
या चित्रपटाची निर्मिती स्टीव्हन स्पिलबर्ग, जेरल्ड मोलेन आणि ब्रांको लस्टिग या तीन निर्मात्यांनी एकत्रितपणे केली. चित्रपटाची पटकथा स्टीव्हन झेलीयन यांनी तर चित्रपटाचे छायांकन जानुझ कामिन्स्की यांनी केले आहे. संकलन मायकल कान आणि संगीत जॉन विलीयम्स यांचे आहे. ॲलन स्टार्स्की आणि एव्हा ब्राऊन यांनी कला दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात लियम निसन, बेन किंग्जले, राल्फ फिनेस, कॅरोलीन गुडॉल, जोनाथन सगाल आणि एम्बेथ डेव्हिडट्झ प्रमुख भूमिकांमध्ये दिसून येतात.
शिंडलर्स लिस्ट या चित्रपटाची सुरुवात १९४१ सालच्या पोलंडमधील क्रॅको या शहरात घडणाऱ्या घटनांपासून होते. या शहराचा कब्जा घेतलेल्या नाझी सैनिकांनी तेथील सर्वच ज्यू नागरिकांना वेगळ्या, खुराडेवजा छावण्यांमध्ये (घेट्टोंमध्ये) डांबायला सुरुवात केली. त्याचवेळी मूळचा चेकोस्लोव्हाकियाचा रहिवासी असणारा जर्मन व्यावसायिक ऑस्कर शिंडलर क्रॅको शहरात प्रवेश करतो. युद्धाच्या धामधुमीचा फायदा घेऊन अमाप पैसा कमावणे हाच त्याचा एकमेव उद्देश असतो. त्यासाठी तेथील नाझी सैन्य अधिकाऱ्यांना लाच देऊन तो क्रॅकोमध्येच भांडी बनवण्याचा कारखाना सुरू करतो. कारखाना उभारून तो चालवण्यासाठी इझाक स्टर्न या ज्यू अकाऊंटंटला शिंडलर मदतीस घेतो. स्टर्नच्या मदतीने शिंडलर या कारखान्यात क्रॅकोमधील घेट्टोंमध्ये डांबलेल्या काही ज्यू माणसांची कामगार म्हणून भरती करून घेतो. अशाप्रकारे शिंडलरला मामुली दरात कामगार वापरायला मिळतात; पण १९४२ साली क्रॅकोमधील सगळ्या ज्यू कुटुंबांना जर्मन कमांडर अमॉन गोएथच्या देखरेखीखाली उभारण्यात आलेल्या प्लॅझो येथील लेबर कँपमध्ये हलविण्यात येते. सगळे ज्यू भयभीत होतात; कारण माथेफिरू अमॉनला आपल्या मर्जीप्रमाणे कँपमधील कोणत्याही व्यक्तीला कधीही गोळ्या घालून ठार मारण्याचे व्यसन असते. क्रॅकोमधून प्लॅझो कँपमध्ये नेताना ज्यू धर्मीयांचा झालेला नरसंहार पाहून शिंडलर अतिशय व्यथित होतो. त्याच्या स्वार्थी स्वभावात हळूहळू बदल घडायला सुरवात होते. आपले सगळे कौशल्य वापरून तो अमॉनचे मन वळवतो आणि पूर्वीच्याच ज्यू कामगारांना बरोबर घेऊन प्लॅझो लेबर कँपमध्ये नवीन कारखाना सुरू करतो; पण आता शिंडलरच्या जगण्याचा उद्देशच बदलतो. नाझी अधिकाऱ्यांना ऐषारामाच्या वस्तू पुरवीत तो स्टर्नच्या मदतीने गुप्तपणे ज्यूंचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यासाठी जास्तीतजास्त ज्यूंना स्वतःच्या कारखान्यात कामगार म्हणून भरती करून घेतो. त्यानंतरही या ज्यू कामगारांवर अनेक संकटे येतात; पण शिंडलर आणि स्टर्न त्यातून मार्ग काढतात. जर्मनीचा युद्धात पूर्ण पराभव होईपर्यंत शिंडलरच्या कामगारयादीत एक हजाराहून अधिक जणांची नावे असतात. ऑस्कर शिंडलर आणि त्याची पत्नी एमिली शिंडलर यांनी जीवनदान दिलेला हा समुदाय चित्रपटाच्या शेवटी शिंडलरच्या समाधीवर श्रद्धांजली वाहत असताना चित्रपट संपतो.
माहितीपट शैलीचा प्रभाव असलेल्या या चित्रपटात स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी चित्रपट कलेच्या विविध अंगांचा सुयोग्य वापर करीत या महाशोकांतिकेचे वेगवेगळे पदर प्रभावीपणे मांडले आहेत. कथेची मांडणी करताना त्यांनी समांतर संकलन शैलीचा वापर करीत एकाच वेळी वेगवेगळ्या स्थळी घडणाऱ्या घटना प्रेक्षकांसमोर मांडल्या. त्यामुळे एकाच वेळी ज्यूंची भीषण दुरवस्था आणि जर्मन नाझी अधिकाऱ्यांची विलासी जीवनशैली यांमधील तुलनात्मक विरोधाभास प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. चित्रपटातील फक्त पहिल्या आणि शेवटच्या प्रसंगाचे रंगीत प्रकाशचित्रण करून त्या दरम्यानचा युद्धाचा काळ मात्र जाणीवपूर्वकपणे कृष्णधवल रंगात चित्रित करण्याचा स्पीलबर्गचा निर्णय कलात्मक आहे. कृष्णधवल रंगातील या चित्रणामुळे भूतकाळात घडलेल्या दुसऱ्या महायुद्धातील या गंभीर घटनेशी प्रेक्षक सहजपणे जोडले जातात. या चित्रपटातील अनेक दृश्य प्रतिमा प्रेक्षकांच्या काळजाला हात घालतात. उदा., क्रॅको येथील घेट्टोमधील अमानुष हिंसाचार, तेथील रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेले मृतदेह, लाल रंगाचा कोट घातलेल्या लहान मुलीचा मृतदेह, ज्यूंच्या उखडून काढलेल्या थडग्याने बनवलेला रस्ता, जळणाऱ्या प्रेतांसमोर उन्मादाने ओरडणारे नाझी सैनिक, त्यांच्या डोळ्यातील अमानुषता, शिंडलरच्या गाडीवर पडलेली जळलेल्या प्रेतांची राख. या दृश्य प्रतिमा प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम करतात. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने या कथेतील पात्रांना पूर्णपणे न्याय देणारी भूमिका केली आहे. ॲलन स्टार्स्की आणि एव्हा ब्राऊन या कलादिग्दर्शकांनी अत्यंत काटेकोरपणे दुसऱ्या महायुद्धाचा काळ पडद्यावर जिवंत केला आहे. अविस्मरणीय प्रसंगांनी भरलेला आणि भारलेला हा आशयप्रधान चित्रपट स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो.
या चित्रपटाने रसिकांची आणि समीक्षकांची दाद मिळवलीच; पण त्याचबरोबर अनेक पारितोषिकेही पटकावली. या चित्रपटाने चित्रपटक्षेत्रात मानाचे समजले जाणारे सात ऑस्कर अवॉर्ड्स (अकादमी पुरस्कार) मिळवले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, पटकथा, छायाचित्रण, कला दिग्दर्शन, संकलन आणि पार्श्व संगीत या सात विभागांत हे पुरस्कार मिळाले. तसेच त्याच वर्षी अमेरिकेत संपन्न झालेल्या गोल्डन ग्लोब सोहळ्यात तीन आणि ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सचे सात ‘बाफ्ता’ पुरस्कारही या चित्रपटाला मिळाले होते.
प्रतिकूल काळात एकट्या व्यक्तीने जरी मानवतावादी दृष्टिकोन अंगीकारण्याचे धाडस दाखविले, तरीही अकल्पित घटना घडू शकतात आणि मानवतेचा, नि:स्वार्थी सेवेचा, दयाभावाचा ओघ अबाधित राहू शकतो. हा महत्त्वाचा विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालेल्या या चित्रपटाने जागतिक चित्रपट इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
समीक्षक : गणेश मतकरी