दातार, दामोदर केशव : (१४ ऑक्टोबर १९३२ –१० ऑक्टोबर २०१८). गायकी अंगाने शांत आणि विलंबित व्हायोलिनवादन करणारे कलाकार. त्यांचा जन्म सांगली जवळील कुरुंदवाड येथे सांगीतिक पार्श्वभूमी असलेल्या परिवारात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर त्यांचे वडील केशवराव हे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य होते. म्हणजेच विष्णु दिगंबर पलुस्करांचे ते गुरुबंधू होते. बाळकृष्णबुवांच्या निधनानंतर विष्णु दिगंबरांचे मार्गदर्शन केशवराव यांना लाभले; पण केशवरावांचे अकाली निधन झाले आणि दामोदर यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. यानंतर दामोदर यांना त्यांचे संगीत शिक्षक असलेले वडील बंधू नारायण दातार यांनी सांभाळले व त्यांच्यावर संगीताचे प्राथमिक संस्कार केले. यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक येथे विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडे व्हायोलीन शिकण्यासाठी पाठवले (१९४५). तेथे दामोदर यांनी दहा वर्षे व्हायोलीनवादनाचे शिक्षण घेतले. पं. द. वि. पलुस्कर यांच्या कार्यक्रमात ते सुरुवातीस तानपुऱ्यावर व नंतर व्हायोलिनवर साथीसाठी जात असत. पलुस्कर यांचे अनमोल मार्गदर्शन दातारांना लाभले आणि सादरीकरणातील सुरेल प्रासादिकपणा त्यांच्या वादनात आला. १९५८ पासून आकाशवाणीवरील कार्यक्रमामुळे दामोदर दातार यांचे नाव झाले आणि त्यांचे निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम होऊ लागले.

गायकी अंगाने शांतपणे विलंबित लयीत वादन करून आपली छाप निर्माण करणाऱ्या दातार यांनी १९६० ते १९९२ या काळात फिल्म डिव्हिजनमध्ये नोकरी केली आणि विजय राघव रावसारख्या संगीत दिग्दर्शकांकडून अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या. अनेक ख्यातकीर्त संगीत कलाकारांसाठी त्यांनी वादन केले.

दामोदर दातार यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (१९९६), ‘आइसलँड सरकारचा पुरस्कार’ (१९९८), भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ (२००४) याशिवाय ‘माणिक वर्मा पुरस्कार’, ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ इत्यादी सन्मान त्यांना लाभले. त्यांच्या पत्नी व त्यांची निखिल व शेखर ही मुले आणि स्नुषा वैद्यकीय व्यवसायात प्रथितयश आहेत. त्यांच्या शिष्य मंडळींमध्ये रत्नाकर गोखले, मिलिंद रायकर, राजन माशेलकर, कैलाश पात्रा, श्रुती भावे इत्यादींचा समावेश आहे.

संगीत जगतात डी. के. दातार या नावानेच प्रसिद्ध असलेल्या दातार यांचे मुंबई येथे निधन झाले. आपल्या अजातशत्रू स्वभावामुळे रसिकांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले होते.

समीक्षण : सुधीर पोटे