सांची स्तूपाच्या तोरणावर पटचित्राचे शिल्पांकन

पटचित्रकलेचा तेलंगणा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. प्रामुख्याने कापडावर कुलपुराणाचे अंकन असलेल्या चित्रकलेला पटचित्रकला म्हणून ओळखले जाते. भारतभर पटचित्रांचे वैविध्यपूर्ण नमुने पहावयास मिळतात. प्राचीन संस्कृत साहित्यात यमपटांचे उल्लेख आहेत. सांचीच्या तोरणावर पटचित्राचे शिल्पांकन आहे. बंगाल, बिहार आणि ओरिसा या राज्यांमध्ये प्रामुख्याने हिंदू पुराणकथांची पटचित्रे दिसतात. राजस्थानात जैन तथा तांत्रिक संप्रदायाची आणि गुजरात व राजस्थानमध्ये पाबुजी व देवनारायण फड ही पटचित्रे दिसतात.

चेरियाल आणि दक्षिणापथातील कला केंद्रे

महाराष्ट्रात कुलपुराण हे चित्रकथीच्या चित्रांच्या पैठण आणि पिंगुळी या दोन शैलींत दिसून येते. तर तेलंगणामध्ये कुलपुराण हे पटचित्रे, मूर्ती, मुखवटे यांच्या साहाय्याने सादर केले जाते. ही कथन परंपरा आजही टिकून आहे. दक्षिणापथातील पारंपरिक कलाप्रकारात एकमेकांशी आंतरसंबंध दिसून येतो. हे पारंपरिक कलाप्रकार शासक वर्ग, मंदिरे त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांकरिता निर्माण केलेले दिसतात. तेलुगू प्रदेशातील विभिन्न मंदिरांतील भित्तिचित्रे त्यांच्या प्राचीनतेची साक्ष देतात. नायक शैली तसेच कुतुबशहाच्या दरबारातील कला याच प्रदेशात विकसित झाल्या; पण या सर्वांच्या बरोबरीने सर्वसामान्यांकरिता केली गेलेली पटचित्रकला तिच्या सामाजिक संदर्भामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.

तेलंगणातील कुलपुराण परंपरा : दक्षिण भारतातील लिंगायत आणि वीरशैव या आध्यात्मिक चळवळींनी समाजातील निम्न घटकांमध्ये आत्मविश्वास आणि स्वतःच्या व्यवसायाबद्दल अभिमान निर्माण केला. तेलंगणातील पटचित्रातून याचाच आविष्कार दिसून येतो. जातीपुराण अथवा कुलपुराण हा याच अस्मितेचा एक भाग आहे. प्रत्येक जातीच्या मूळपुरुषाची कथा त्या-त्या जातीच्या प्रेक्षकांसमोर सादर केली जाते, त्याला ‘कुलपुराण’ किंवा ‘जातीपुराण’ असे म्हणतात. इतर जातींचे लोक देखील हे जातीपुराण पाहू शकतात. जातींच्या मूळपुरुषाची कथा प्रामुख्याने रामायण किंवा महाभारताशी संबंधित असते. प्रत्येक यजमान जातीकरिता कुलपुराण सादर करणारी भाट (कथनकार) यांची स्वतंत्र पोटजात असते. उदा., ‘मादिगा’ या यजमान जातीकरिता ‘डक्कल’ ही कथनकार पोटजात आहे. कुलपुराण सादर करणारी पोटजात अन्य जातींकरिता कुलपुराण कथन करीत नाहीत. यजमान जातीकडून भाट कुटुंबाला कुलपुराण कथनाचे मिरासी (वतन) मिळालेले असते. त्यांच्यात रोटी व्यवहार होतो; पण बेटी व्यवहार होत नाही. प्रत्येक भाट कुटुंबाची यजमान घरे ठरलेली असतात. त्यांना यजमान कुटुंबाकडून बिदागीच्या स्वरुपात धान्य, पैसे इत्यादी गोष्टी दिल्या जातात. एका भाट कुटुंबाकडे ६० ते २०० गावे असू शकतात. भाट लोक पावसाळा सोडून वर्षभर कुलपुराण सादर करीत संपूर्ण प्रदेश हिंडतात.

कुलपुराणाचे सादरीकरण

कुलपुराणाचे सादरीकरण : शेतीवाडीशी निगडित अर्थव्यवस्था असल्याने यजमान कुटुंबाकडे वर्षातील ज्यावेळी धनधान्य असते, त्यावेळी कुलपुराण सादर करण्याची प्रथा आहे. काही जातींत घरातील लग्नसमारंभाच्या वेळी तसेच खेड्यातील जातभाई मिळून एकत्रितपणे असेही कुलपुराण करवितात. एखाद्या भिंतीला अथवा झाडाला पटचित्र टांगून त्याच्या आधारे कथा सांगितली जाते. साधारणपणे संध्याकाळी कुलपुराण सुरू होते. पटाच्या सुरुवातीला प्रामुख्याने गणेश प्रतिमा असते. क्वचित ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची चित्रे असतात. गद्य व पद्यामध्ये पुराण सादर केले जाते. मुख्य गायक अथवा कथनकाराला तीन/चार पुरुषांची साथ असते. क्वचित वेळा स्त्रिया देखील गायनाकरिता साथसंगत करतात. प्रत्येक भाट जातीचे वाद्य हे भिन्न असते. त्याची बनावट व आवाजाचा पोत वेगळा असतो.

तेलंगणा पटचित्र

तेलंगणा पटचित्रकला : हे पट प्रामुख्याने उभे असतात. त्यांची रुंदी १ मीटर तर लांबी १० मीटर पर्यंत असते. कथेतील प्रसंगानुसार चित्रे डावीकडून उजवीकडे असतात. पुढे खालच्या ओळीत चित्रांचा तोच क्रम राहतो; परंतु आडव्या पटात मात्र वरच्या पट्टीत उजवीकडून डावीकडे तर खालच्या पट्टीत मात्र डावीकडून उजवीकडे असा चित्रांचा क्रम असतो. हे पट बनविण्यासाठी भाट हा चित्रकाराकडे ३/४ दिवस राहतो. कथानकाप्रमाणे पटावर चित्रकार कच्ची मांडणी करतो, त्याला ‘नक्कल’ असे म्हणतात. नंतर २/३ महिन्यात चित्रकार सावकाशीने व लक्षपूर्वक पटचित्र पूर्ण करतो. पटचित्र पूर्ण झाल्यावर मुलाचा जन्म झाल्याप्रमाणे समारंभ साजरा केला जातो. चित्रकाराला पैसे, धान्य, कपडे इत्यादी दिले जातात. देवीला बकरी अर्पण करून भोजन केले जाते. पटाकरिता लागणारे कापड भाट देतो. तर रंग व इतर साहित्य चित्रकाराचे असते. जुना झालेला पट एखाद्या शवाप्रमाणे जाळला जातो अथवा नदीत विसर्जित केला जातो. कथेतील पात्रांची दृश्यलक्षणे (Iconography) ही ठरलेली असतात. पटचित्रामागे चित्रकार व कथनकाराची नावे लिहिली जातात. १६२५ मधील सर्वांत जुना पट आज उपलब्ध आहे.

कुलपुराण मूर्ती
मुखवटे

तेलंगणातील चित्रकार : या पटचित्रकारांना ‘नक्काश’ असे संबोधतात. नक्काश मूळचे राजस्थानमधील आहेत असा समज अध्ययन क्षेत्रात प्रचलित आहे. फड व कावड या चित्रप्रकारामुळे त्यांचा संबंध राजस्थानशी जोडला गेला असावा; पण याला कोणतीच पुष्टी मिळत नाही. नक्काश लोकांचा वर्ण व शारीरिक ठेवण दक्षिण भारतीय दिसून येते. त्यांची कुलदेवी ‘निमाशाम्बादेवी’ असून तिचे मूळ मंदिर बंगळुरुजवळ आहे. यावरून नक्काश लोकांच्या मूळ स्थानाविषयी दुजोरा मिळतो. कर्नाटकातील विजयनगरच्या पाडावानंतर ते उत्तर कर्नाटक व तेलंगणा या भागात विखुरले गेले असावेत. कर्नाटकातील किन्नल येथे असणाऱ्या चित्र व शिल्प कलेची शैली व तंत्र तेलंगणातील नक्काशांच्या चित्र व शिल्प शैलीशी खूपशी जुळणारी आहे. दोन्हीकडच्या चित्रकारांचे गोत्र ‘मित्रमहामुनी व सोमाक्षत्रिय’ आहे. तेलंगणातील निर्मल या गावातील निम नायडू राजाने ४०० वर्षापूर्वी महाल रंगविण्यासाठी चित्रकारांना कर्नाटकातून बोलविले. नंतर हे चित्रकार तेलंगणाभर विखुरले. निर्मल, आदिलाबाद, चेन्नूर, भिमगल, बालकोंडा व चेरियाल येथे त्यांची वसती दिसते. आज बहुतांशी नक्काश लोक हे शिलाई व सुतारकाम करताना दिसतात. निर्मलमधील नक्काश हे प्रामुख्याने लाकडी खेळणी बनवितात. १९४०च्या आसपास वेमुलवाडा येथून धनालकोट आडनावाचे नक्काश कुटुंब चेरियाल येथे स्थलांतरित झाले होते. त्यांनी तेथे पारंपरिक पटचित्रकला जोपासली आहे. त्यामुळे तेलंगणातील पटचित्रकलेला चेरियाल पटचित्रकला असे नाव रूढ झाले. स्वातंत्र्योत्तरकाळात या कलेचा संकोच झाला. मुखवटे, मूर्ती, पटचित्रे, मंदिरे, भित्तीचित्रे, पूजामंदिरचित्रे, वेष्टने, खेळणी अशा विविध स्वरुपात तेलंगणातील पारंपरिक चित्र व शिल्प या कला दिसून येतात.

चेरियाल भित्तीचित्र
निर्मल येथील लाकडी मूर्ती

भारतभरातील लोककलेच्या स्वरूपापेक्षा तेलंगणा (चेरियाल) कला भिन्न ठरते. भारतभरातील लोकचित्रकलेचे निर्माते हे सर्वसामान्य लोक आहेत; पण चेरियाल चित्रकला ही पूर्णवेळ व्यावसायिक चित्रकार (नक्काश) करीत आले आहेत. या कलेवर एकीकडे लेपाक्षी, नायक व कुतूबशाही दरबारी चित्रकलेच्या शैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या आवडीनिवडीचा देखील प्रभाव आहे.

विश्वकर्मा आणि विविध व्यावसायिकांचे पटचित्र

तेलंगणातील कलेचे सामाजिक स्वरूप : तेलंगणामधील जातीव्यवस्था तसेच खेड्यातील अर्थव्यवस्था यांच्या समन्वयातून विकसित पावलेल्या समाजात हा कलाप्रकार फुलला. जातीपुराणाद्वारे चित्र, संगीत, काव्य, कथा यांचा लोकाविष्कार येथे अनेक शतके होत राहिला. निजामाच्या अंमलामुळे ही परंपरा टिकून राहिली; कारण भारतातील इतर भागात ज्या प्रमाणे इंग्रजी आमदनीत पारंपरिक अर्थव्यवस्था व कारागीर वर्ग मोडून निघाला, तसा प्रकार निजाम राजवटीमुळे तेलंगणामध्ये घडला नाही. त्यामुळे जातीय अस्मितेचे संदर्भ तेलंगणा भागात वेगळे ठरतात. बिदागीचे बाह्य स्वरूप हे वस्तू, धनधान्य यांची देवाणघेवाण असे आहे. कथनकार हे बाह्यदृष्ट्या परावलंबी दिसत असले तरीही त्यांना श्रेष्ठ मानले जाते. तसेच ‘व्यावसायिकांची अस्मिता’ही त्या समाजव्यवस्थेत जपली गेली. व्यवसाय सुरक्षा व व्यवसाय अस्मिता हे मुख्य हेतू कुलपुराणातून साधले गेले. आजही तेलंगणा भागात समाजमंदिरांवर त्या जातीच्या व्यवसायाचे चित्र दिसते. उदा., धोब्यांच्या समाजमंदिरावर धोबीकामाचे चित्र; चर्मकारांच्या समाजमंदिरावर चर्मकामाचे चित्र असते.

स्वातंत्र्योत्तरकाळात झालेले बदल आणि आजचा जागतिकीकरणाचा रेटा या साऱ्यामध्ये ही सामाजिक घडी पूर्णपणे बदललेली आहे. लोककलांचे रूपांतरण होत आहे. भारतातील बहुसंख्य चित्र-शिल्प लोककलांची साधारण अशीच स्थिती आहे. आता तेलंगणामध्ये कुलपुराण पटचित्रे बनणे नाहीसे होत असून सुटी छोटी चित्रे बनत आहेत. मूर्ती व मुखवट्यांच्या बाबतीतही तेच घडत आहे. त्याचा सामाजिक संदर्भ विरून गेल्यावर होणारे रूपांतरण म्हणजे आधुनिक समाजाला हवी असणारी ‘केवळ सजावट मूल्य असणारी चेरियाल कला’ असे तेलंगणा कलेचे स्वरूप झाल्याचे दिसते.

पहा : टंकचित्रे; भित्तिशोभन

संदर्भ :

  • Bittu, Venkateswaralu, A Critical Study of Leather Puppetry in Andhra Pradesh, Hyderabad, 1999.
  • Jain, Jyotindra, ed., Picture Showmen : Insights into the Narrative Tradition in Indian Art, Mumbai, 1998.
  • Rajan, Aditi; Rajan M.P., Crafts of India – Handmade in India, New Delhi, 2007.

समीक्षण : महेंद्र दामले