भूसांरचनिक प्रक्रियेतून या किनाऱ्याची निर्मिती होते. महासागर, समुद्र किंवा मोठ्या सरोवरांचे पाणी आणि त्याशेजारची कोरडी जमीन यांमधील सीमारेषेला किनारा म्हणतात. जेव्हा समुद्र किनाऱ्यालगत आखात किंवा सामुद्रधुनी (चॅनेल) असते आणि त्याच्या पलिकडे समुद्राच्या बाजूला अरुंद व लांबट अशी द्वीपमालिका असते, तेव्हा अशा किनाऱ्याला ‘डाल्मेशियन किनारा’ असे म्हटले जाते. जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते किंवा भूभागाचे निमज्जन होते, तेव्हा सखल भागात पाणी शिरते. या प्रक्रियेत किनाऱ्यालगतच्या खोलगट अशा दरीचे रूपांतर आखात किंवा सामुद्रधुनीत होते; तर किनाऱ्याला समांतर असणारे डोंगर किंवा कटक लांबट व अरुंद अशा द्वीपमालिकेच्या रूपात अस्तित्वात येतात. एड्रिअ‍ॅटिक समुद्रावरील क्रोएशियाच्या (पूर्वीचा यूगोस्लाव्हिया) किनाऱ्याजवळील अशा रचनेच्या किनाऱ्याला ‘डाल्मेशियन’ किनारा या नावाने संबोधले जाते. त्यावरून अशा प्रकारची रचना असलेल्या किनाऱ्यांना डाल्मेशियन प्रकारचा किनारा म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

क्रोएशियाच्या डाल्मेशियन किनाऱ्याजवळ किनाऱ्याला समांतर डोंगररांगांच्या तीन ओळी होत्या. शेवटच्या हिमयुगाच्या अखेरीपासून समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. त्यावेळी किनाऱ्यालगतची एक रांग जमिनीवर पूर्णपणे कोरडी पडली. तिच्यानंतरची दुसरी समांतर रांग अंशत: निमज्जन पावली. तिसरी रांग अधिक निमज्जन पावल्यामुळे तिची फक्त काही शिखरेच तेवढी बेटांच्या रूपाने पाण्याबाहेर राहिली. त्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या दरम्यान किनाऱ्याला समांतर अशा निर्माण झालेल्या दऱ्यांमध्ये (खोलगट भागांत) अंतर्वक्र (संमुखनती) अशा अरुंद भागातून समुद्राचे पाणी आत शिरले. त्यामुळे त्या डोंगररांगांच्या दरम्यान आखाते किंवा सामुद्रधुन्यांची निर्मिती झाली. अशाप्रकारे क्रोएशियालगत ‘डाल्मेशियन’ किनाऱ्याची निर्मिती झाली. डाल्मेशियन किनारा बराच खडबडीत आहे. तेथील किनाऱ्याला समांतर अशी अनेक लांबट आकाराची व अरुंद बेटे असून ती अरुंद सामुद्रधुनींनी (चॅनेल) किनाऱ्यापासून विभक्त झाली आहेत. या किनाऱ्याचा विस्तार उत्तरेस राब बेटापासून दक्षिणेस कोटॉर बेटापर्यंत झालेला आहे. या किनाऱ्याला नद्यांपासून गोड्या पाण्याचा आणि पोषक द्रव्यांचा भरपूर पुरवठा होतो. तेथील हवामान भूमध्य सागरी प्रकारचे आहे.

समीक्षक : शेख मोहम्मद बाबर