एक नामशेष पुरातन मानवी जाती. इंडोनेशियात फ्लोरेस बेटावर सन २००३ मध्ये हॉबिट या वेगळ्या जातीचा शोध लागल्यावर पुढे २००७ मध्ये फिलिपीन्सच्या लूझोन (Luzon) भागातील कॅलाओ गुहेत (Callao Cave) दोन प्रौढ व एका होमिनिन बालकाचे एकूण १३ जीवाश्म मिळाले. त्यांमध्ये दात, हात आणि पायाची हाडे आहेत. त्यांचा काळ ६७,००० वर्षपूर्व आहे.

लूझोन मानवाच्या पायाचे बोट

पॅरिसमधील नॅशनल म्यूझीअम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे फ्लोरेंट डेट्रॉईट व फिलिपीन्स विद्यापीठाचे आर्मंड मिजारेस यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी या जातीला लूझोन या बेटाच्या नावावरून ‘लूझोन मानव’ (होमो लूझोनेन्सिस) असे नाव दिले. ‘कॅलाओ मानव’ (Callao Man) म्हणूनही ते ओळखले जातात. तेथील स्थानिक पातळीवर त्यांना ‘उबाग’ (‘Ubag’ – गुहेतील एका पौराणिक मानवाचे नाव) असेही म्हटले जाते. ही जाती लूझोन या बेटावर कशी आली, याबद्दल मात्र खातरीलायक माहिती अद्यापि उपलब्ध नाही.

लूझोन मानवांचे शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पायाची बोटे वक्र होती. यावरून ते झाडावर चढण्यात व जमिनीवर सरळ चालण्यात निष्णात असावेत, असा निष्कर्ष काढला जातो. तसेच त्यांचे दात छोटे होते व या मानवांचा आकार बहुधा इंडोनेशियातील ⇨फ्लोरेस मानवांपेक्षाही छोटा होता. त्यांची उंची पाच फुटांपेक्षाही कमी असावी, असा अंदाज संशोधक व्यक्त करतात. इरेक्टस मानव आफ्रिकेतून बाहेर पडले त्याच सुमारास आणखी एखादी मानव जात तेथून निघाली असावी आणि लूझोन व फ्लोरेस मानव हे स्वतंत्रपणे तिच्यापासून उत्क्रांत झाले असावेत, असे मानले जाते.

संदर्भ :

  समीक्षक : मनीषा पोळ


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.