मानवामधील सामाजिक वर्तनाची उत्क्रांती. प्राण्यांमधील मानव सोडून इतर प्रायमेट प्राण्यांमध्येदेखील नियमित सामाजिक रचना असते आणि त्यांच्यामध्येही माणसांप्रमाणे आपण स्वतः, आपल्या जवळचे व परके अशा अनेक संकल्पना आढळतात. आपल्याला इतर प्राण्यांपासून स्पष्टपणे वेगळे करणारे वर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे नियमितपणे केले जाणारे सामाजिक सहकार्य व प्रतीकात्मक वर्तन. मानवांमध्ये प्रसामाजिकता (मैत्री व सामाजिक स्वीकारार्हतेसाठी केले जाणारे सकारात्मक वर्तन) हे वर्तन आढळते. प्रसामाजिकता कशी निर्माण झाली आणि या वर्तनाचा उत्क्रांतीच्या संदर्भात अर्थ कसा लावायचा हे पाहणे रंजक आहे. दुसऱ्या लोकांना मदत करणे हा प्रसामाजिकतेचा एक भाग आहे. तसेच त्यात परस्पर सहकार्याखेरीज परहितवृत्ती याचाही समावेश होतो.
मानव ही प्राण्यांची एकमेव अशी प्रजाती आहे की, कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तींबरोबर नियमितपणे वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते आणि एकमेकांवर उपकार केले जातात. मानवांमध्ये श्रमांची स्पष्ट व तपशीलवार विभागणी आहे. मुंग्या आणि मधमाशा यांच्यासारख्या सामाजिक कीटकांमध्ये श्रमविभागणी व सहकार्याची एक पातळी असते. परंतु ती आनुवंशिकरित्या जनुकांवर अवलंबून असून ती मानवांप्रमाणे विचारपूर्वक अथवा सांस्कृतिक मार्गाने निर्माण झालेली नाही. मानवी समाजात विशिष्ट कामे विशिष्ट समूह अथवा व्यक्ती करतात आणि त्या त्या कामांमध्ये तज्ज्ञ माणसांनी बनवलेल्या वस्तूंचा (उत्पादनांचा) नंतर एकमेकांशी विनिमय करतो अथवा व्यापार करतो. मानवी समाजात कुटुंबाच्या बाहेर सहकार्य करण्याच्या अथवा संसाधने मिळून वापरण्यात जवळचे नातेवाईक ते राष्ट्रातील नागरिक अशा अनेक पातळ्या आहेत. बाकीच्या प्राण्यांमध्ये गंध, रंग, चिरकणे आणि गर्जना करणे अशा प्रकारे सहकार्य अथवा कोणतेही इतर सामाजिक वर्तन केले जाते. तथापि मानवांमध्ये सर्व क्लिष्ट सामाजिक कृती करण्यासाठी मानवेतर प्राण्यांमध्ये उपलब्ध परस्पर संदेशवहन मार्गांचा उपयोग नसतो. त्यासाठीच मानवांमध्ये भाषेच्या व चिन्हांच्या (प्रतीकांच्या) माध्यमांतून सामूहिक कार्ये केली जातात.
स्पर्धा, सहकार्य व त्याग :
सामाजिक वर्तनात सहकार्य व त्याग याचप्रमाणे स्पर्धा हा मोठा भाग आहे. मानवेतर प्रायमेट प्राण्यांपैकी माकडे आणि वानरे आपल्या चांगली परिचयाची असतात. त्यांच्या आणि आपल्या दिसण्या-वागण्यामध्ये असणारे साम्य चकित करणारे असते. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘सत्तांतर’ या कादंबरीतून आपल्याला या प्राण्यांमधल्या स्पर्धेचे व सत्तासंघर्षाचे उत्तम दर्शन होते. स्पर्धा हा सजीवसृष्टीला चालवणारा मुख्य घटक आहे ही गोष्ट कोणालाही सहज समजण्यासारखी आहे. संसाधने, अन्न व निवारा आणि पुनरुत्पादनासाठी जोडीदार मिळवणे यांसाठी सर्व सजीवांना आपल्याच समूहातील व इतर प्रजातींमधील सजीवांशी सतत स्पर्धा करावी लागते. काही मायक्रोमीटर लांबीच्या सूक्ष्मजीवांपासून ते मानवापर्यंत कोणालाही जगण्यासाठीची स्पर्धा चुकलेली नाही. एका जागी स्थिर राहणाऱ्या आणि निरुपद्रवी वाटणाऱ्या वनस्पतीदेखील स्पर्धेला अपवाद नसतात. फक्त स्पर्धेचे स्वरूप किंवा पद्धती निराळ्या असतात, एवढाच काय तो फरक; तथापि सजीव फक्त एकमेकांशी गळेकापू स्पर्धाच करतात असे मात्र नाही, तर काही वेळा समूहातील घटक एकमेकांना मदत करतात किंवा एकमेकांची काळजी घेतात. वरकरणी हे परस्परविरोधी वाटणे स्वाभाविक आहे. समाज टिकावा म्हणून मानवी समाजातले काही सदस्य आपल्या बाजूने त्याग करतात किंवा दुसऱ्यांचे (जनहित) हित लक्षात घेऊन काही लाभांवर पाणी सोडायला तयार होतात हे तर आपण पाहतोच. ‘विना सहकार नाही उद्धार’ ही उक्ती आपण अनेकदा ऐकलेली असते. सहकार्य हा समाजरचनेचा महत्त्वाचा भाग आहे. परस्परांवरचा विश्वास आणि एकमेकांना मदत करण्यातूनच मानवी समाज निर्माण झाला आहे हे जरी खरे असले, तरी हे केवळ मानवाचेच वैशिष्ट्य आहे असे मात्र नाही. सहकार्य हा समाजरचनेचा गाभा असल्याने मानवी समाजात व्यक्तीव्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे गुंतागुंतीचे आणि प्रामुख्याने परस्परविश्वासावर आधारलेले संबंध आढळतात. परस्परसंबंधांमध्ये भावनिक बंधांचे स्थान फार महत्त्वाचे असते. उदा., आई-मुले, भाऊ-बहीण आणि आजीआजोबा-नातवंडे. असे परस्परसंबंध निर्माण होण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी भाषा, संस्कृती आणि समाजात वागण्याचे नियम यांचा विकास झाला. या साऱ्यांचा उगम माणसाला प्रगल्भ विकसित मेंदू आहे म्हणूनच झालेला आहे असे मात्र नाही. उत्क्रांतीच्या दृष्टीने सजीवसृष्टीमध्ये आपले निकटचे भाईबंद असलेल्या मानवेतर प्रायमेट प्राण्यांमध्येदेखील अनेक ‘मानवी’ भावना विकासाच्या प्राथमिक स्तरावर आढळतात.
समूहाने राहणे हे प्रायमेट गणातील प्राण्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. एकत्र राहिल्याने संरक्षण, कामाची श्रमविभागणी होणे वगैरे लाभ मिळतात. समूहात राहण्याचे असे अनेक फायदे असले तरी तोटेही काही कमी नसतात. उदा., समूहात राहणाऱ्या एकाच प्रजातीच्या प्राण्यांना अन्न, पुनरुत्पादनासाठी जोडीदार आणि इतर अनेक नैसर्गिक साधनांसाठी एकमेकांशी स्पर्धा करावी लागते. कधीकधी ही स्पर्धा रक्तरंजित आणि जीवघेणी असू शकते. तसेच समूहाची रचना टिकवून ठेवण्यासाठी सदस्यांना काही प्रसंगी तडजोड करावी लागते किंवा अन्नाचा कमी वाटा स्वीकारून जगावे लागते. मानवेतर प्रायमेट प्राण्यांमधे परस्परांवरचा विश्वास, एकमेकांना मदत, सहकार्याची भावना, तडजोड आणि त्याग या मानवी भावनांची बीजे दिसतात. तसेच इतरांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मानवात आढळते तशी प्राथमिक पातळीवरची राजकीय अथवा सत्तेची प्रेरणा देखील दिसते.
प्रायमेट गणातील मानवेतर प्राण्यांपैकी चिंपँझींमधे सहकार्याची भावना सर्वांत प्रभावी असते. या प्रजातीमधे परस्परसंबंध दीर्घकाळ टिकणारे असतात. नरांचे गट एकमेकांना सांभाळून घेत लांबवर मजला मारतात. आफ्रिकेतील ताय नॅशनल पार्कमधे तर चिंपँझींच्या गटांनी सामूहिकपणे नियोजनपूर्वक शिकार केल्याचे डी. वॉल (१९४८-२०२४) या डच-अमेरिकन वैज्ञानिकाला आढळले आहे. बोनाबो प्रजातीच्या माद्यांमधे उच्च दर्जाचे सहकार्य दिसते. एकमेकींशी रक्ताचे संबंध नसलेल्या माद्या आपले गट तयार करून अन्न वाटून खातात. असे अन्न वाटून खाल्ल्याने हे गट दीर्घकाळ टिकतात. कोण कोणाच्या गटात आहे हे सर्वांनाच माहिती असते. जर दोन माद्यांमधे भांडण उद्भवले तर इतर माद्या आपापल्या गटातल्या मादीच्या मदतीला धावून जातात, आणि बघता बघता वैयक्तिक झगड्याचे रूपांतर तुंबळ सार्वजनिक हाणामारीत होते. इतकेच नव्हे तर संकटाच्या घडीला कोणी मदत करण्यात कुचराई केली तर अशा नियम मोडणाऱ्या मादीला गटातल्या इतर माद्या धडा शिकवण्यात मागेपुढे पाहत नाहीत.
फसवणूक :
दैनंदिन जीवनातले आपले निर्णय आणि त्यानुसार होणारे सामाजिक वर्तन हे विचारपूर्वक केलेल्या फायदा-तोटा यांच्या हिशेबावर आधारलेले असते. एकमेकांना मदत, तडजोड आणि त्याग यांखेरीज आपण व्यवहारात अनेक क्लृप्त्या वापरतो. मानवेतर प्रायमेट प्राणीदेखील त्यांच्या सामाजिक वागणुकीत अनेक युक्ती वापरतात असे आढळून आले आहे. त्यांपैकी फसवणूक या गोष्टीचा प्रायमेट वैज्ञानिकांनी भरपूर अभ्यास केलेला आहे.
सहकार्य आणि त्याग याप्रमाणे फसवणूक हा देखील सामाजिक वर्तनाचा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये समाजाचा एक घटक जाणीवपूर्वक काही माहिती दुसऱ्या घटकापासून दडवून ठेवतो. तसेच यात दुसऱ्याच्या वागणुकीचा मुद्दाम चुकीचा अर्थ लावणे याचाही समावेश होतो. मानवेतर प्रायमेट प्राण्यांपैकी चिंपँझी आणि गोरिला या प्रजातींमधे फसवणुकीचे आणि लपवाछपवीचे अनेक प्रकार आढळतात. जेन गुडाल हिने अभ्यास केलेल्या, फिगन आणि गॉलियथ अशी नावे दिलेल्या दोन सुप्रसिद्ध चिंपँझींच्या वर्तनाचा एक नमुना रंजक आहे. एकदा फिगनला इतरांच्या नजरेतून सुटलेले एक केळे दिसले. पण गॉलियथ त्याच्या बरोबर खाली बसलेला होता. तत्काळ फिगन लांब गेला आणि केळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून बसून राहिला. पंधरा मिनिटांनी गॉलियथ तेथून निघून जाताच क्षणाचाही विलंब न लावता फिगनने ते केळे फस्त करून टाकले. फिगनने केळे मिळवण्यासाठी अगोदर प्रयत्न केला असता तर दोघांमधे मारामारी होणे अटळ होते. हे टाळण्यासाठी खूप पुढचा विचार करून फिगनने दुर्लक्ष करत असल्याचे सोंग घेतले होते. चिंपँझींच्या बुद्धीचा विचार करता असे करणे लक्षणीय आहे.
आर. डब्ल्यू. मिशेल या वैज्ञानिकांनी चिंपँझींप्रमाणे ओरँगउटान व गोरिलांमध्ये फसवणूक, लपवाछपवी आणि सोंगढोंग करण्याचे अनेक प्रकार असतात असे दाखवले आहे. यामध्ये स्वतः लपून बसणे, वस्तू लपवणे, वस्तू पाहिलीच नाही असे भासवणे, शत्रू आल्याची खोटी हूल उठवून इतरांची घाबरगुंडी उडवून देणे, मुद्दाम दुसरीकडे लक्ष वेधणे आणि स्वतःच्या गटाशी गद्दारी करून दुसऱ्या गटात सामील होणे यांचा समावेश होतो. यांशिवाय आपली फसगत होते आहे हे लक्षात आल्यानंतर फसवण्याचा प्रयत्न हाणून पाडणे हे देखील करण्यात मानवेतर प्रायमेट प्राणी आणि विशेषतः कपी तरबेज असतात. मिशेल यांनी दिलेल्या उदाहरणातले दोन गोरिला नर एका लहान पोराच्या आईला न कळू देता त्या पोराला पळवण्याच्या खटाटोपात होते. या ‘कामगिरीत’ दोघे एकमेकांना मदत करत असूनही त्याच वेळी एकमेकांना फसवण्याचाही प्रयत्न करत होते. दोघांनाही दुसऱ्याला कळू न देता अगोदर त्या पोराला पळवायचे होते. हे करताना त्यांनी बराच पुढचा विचार करण्याची, दुसऱ्याच्या वागण्याला अनुसरून आपले बेत ठरवण्याची, इतकेच नव्हे तर आपले बेत सतत बदलण्याची थक्क करणारी क्षमता दाखवली होती.
प्रायमेट वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून असे दिसते की, आपण ज्याला मानवी समाजाची व मानवी वर्तनाची वैशिष्ट्ये मानतो ती उत्क्रांतीच्या प्रवासात अलीकडच्या काळात विकसित झालेली नसून त्यांचा उगम कदाचित मानवपूर्व प्राणी असलेल्या पूर्वजांमध्येच झालेला आहे.
परहितवृत्ती :
काही प्रमाणात आपल्याला त्रास सहन करावा लागला तरी दुसऱ्यांचे हित लक्षात घेऊन वागणे अथवा आपल्याला झळ लागली तरी त्याची पर्वा न करता दुसऱ्या व्यक्तीचे हित पाहणे या वागण्याला परहितवृत्ती असे म्हणतात. आपल्या अपत्यांना ती मोठी होईपर्यंत खाऊपिऊ घालणे व त्यांची काळजी घेणे, कुटुंबातील काम करण्यास अक्षम वृद्धांना खाऊपिऊ घालणे, कुटुंबाबाहेरील लोकांनाही मदत करणे आणि समाजहितासाठी दान करणे या सगळ्याचा समावेश परहितवृत्तीत होतो. आपल्या स्वतःला आलेल्या कटू अनुभवांमुळे अनेकजणांना वाटते की मानवप्राणी मुळातच स्वार्थी असून प्रत्येकजण स्पर्धा करताना आपल्यापुरतेच पाहत असतो. तथापि हे खरे नाही. अवघ्या काही दशकांपर्यंत परहितवृत्ती हे खास मानवी वैशिष्ट्य आहे असे मानले जात होते. परंतु मानवच काय पण मानवेतर प्राण्यांमध्येही केवळ सहकार्यच नव्हे तर परहितवृत्तीही आढळत असल्याचे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे.
स्पर्धा हा टिकून राहण्याच्या झगड्यातील महत्त्वाचा घटक असून तो उक्रांतीच्या मुळाशी असतो असे प्रतिपादन करणाऱ्या चार्ल्स डार्विन यांनी सामाजिक वर्तनाचा ‘सहानुभूती’ हा एक भाग असल्याचे नमूद केले होते. मानवेतर प्राण्यांमध्ये या प्रकारच्या संशोधनाची सुरुवात खूप अगोदर झाली असली तरी १९६० नंतर त्यात प्रचंड बदल घडून आले. उत्क्रांतीवादी ब्रिटिश जीववैज्ञानिक विल्यम डोनाल्ड हॅमिल्टन (१९३६-२०००) यांच्या ‘जर्नल ऑफ थिअरीटिकल बायोलॅाजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे ‘नातलग’ आणि ‘परहितवृत्ती’ (जनहितवाद) या माणसांमध्ये आढळणाऱ्या दोन्ही गोष्टींचा उगम मानवेतर प्रायमेट प्राण्यांमधे शोधण्यासाठी आवश्यक सैद्धांतिक बैठक मिळाली (१९६४). मानवेतर प्रायमेट प्राण्यांमध्ये परहितवृत्ती असल्याचे अनेक संशोधनांमधून दिसून येते. आफ्रिकेतील गोम्बे नॅशनल पार्कमधील वन्य चिंपँझींमध्ये जेन गुडाल यांना परहितवृत्ती आढळली होती. अशाच प्रकारे इतर जंगलात राहणाऱ्या प्रायमेट प्राण्यांमध्ये परहितवृत्ती दिसून आली असली तरी मानवाच्या सहवासात असलेल्या अथवा प्रयोगशाळेतल्या चिंपँझींमध्ये मात्र या वर्तनाचा अभाव दिसला. उत्क्रांतीच्या दृष्टीने जिथे स्पर्धा करून टिकणे याला महत्त्व आहे, त्याचवेळी मानव व मानवेतर प्रायमेट प्राण्यांमध्ये परहितवृत्ती का निर्माण झाली असावी याबद्दल अद्याप संशोधकांमध्ये एकमत झालेले नाही.
पाहा : प्राण्यांचे वर्तन; नरवानर गण
संदर्भ :
- Donald, Merlin, Origins of the Human Mind: Three Stages in the Evolution of Culture and Cognition, Harvard University Press, Cambridge, Massachusetts, 1991.
- Murray, Lindsay E.; James R. Anderson & Gordon G. Gallup Jr., 2022. ‘Mirror self-recognition in gorillas (Gorilla gorilla gorilla): a review and evaluation of mark test replications and variants, Animal Cognition, Vol.22, pp. 783-792, 2022. https://doi.org/10.1007/s10071-021-01592-3
- Sorabji, Richard, Animal minds and human morals: The origins of the Western debate, Ithaca, Cornell University Press, New York, 1993.
- Spikins, Penny, How compassion made us human: The Evolutionary Origins of Tenderness, Trust and Morality, Barnsley, South Yorkshire: Pen and Sword, 2015.
- Tattersall, Ian, Becoming Human, Harcourt Brace and Co., New York, 1998.
- Tuttle, Russell H., Apes and Human Evolution, Harvard University Press, USA, 2014.
समीक्षक : सुषमा देव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.