मन्रो, ॲलिस : (१० जुलै १९३१- १३ मे २०२४). नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात कॅनेडियन लघुकथा लेखिका. मूळ नाव ॲलिस ॲन लेडलॉ. जन्म कॅनडा येथील विंघॅम, ऑन्टॅरियो येथे. आई शिक्षिका होती, तर वडील कोल्हे पालनाचा व्यवसाय करायचे. लेडलॉ हे कुटुंब मूळचे स्कॉटलंड येथील असून त्यांच्या पूर्वजांनी १८१८ साली ॲपर कॅनडा (सध्याचे ऑन्टॅरियो) येथे स्थलांतर केले. ॲलिस यांचे बालपण विंघॅम या छोट्या खेड्यात गेले. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. ॲलिस यांची ग्रामीण पार्श्वभूमी, सामाजिक स्तरातील संघर्ष आणि महिलांच्या अनुभवांचे वास्तव हे त्यांच्या पुढील लेखनाचे मूळ ठरले. आई महत्त्वाकांक्षी स्वभावाची होती, तर वडील श्रमशील जीवनशैलीचे होते. वैयक्तिक आयुष्यातील आणि सामाजिक स्तरातील चढउतारांनी त्यांच्या लेखनात सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्ष आकारत गेला. किशोरवयीन अवस्थेपासूनच त्यांनी कविता आणि कथा लिहायला सुरुवात केली. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑन्टॅरियो येथे दोन वर्षांची शिष्यवृत्ती, इंग्रजी आणि पत्रकारितेचे अध्ययन. इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण. काही काळ किरकोळ नोकऱ्या आणि ग्रंथालयात लिपिक म्हणून कार्य. विद्यार्थिनी असताना वयाच्या पंधराव्या वर्षी ‘द डायमेनशन्स ऑफ शॅडो’ (१९५१) ही पहिली लघुकथा प्रकाशित.

जेम्स मन्रो यांच्याशी विवाहानंतर ॲलिस या ब्रिटिश कोलंबियातील वॅनकुव्हर येथे स्थायिक झाल्या. मन्रो`ज बुक्स हे पुस्तकाचे दुकान सुरू केले. १९७२ मध्ये घटस्फोटानंतर युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न, ऑन्टॅरियो येथे गृह-लेखिका म्हणून वास्तव्य. १९७६ मध्ये भूगोलतज्ज्ञ गेराल्ड फ्रेमलीन यांच्याशी विवाह. १९७९ ते १९८२ या काळात ऑस्ट्रेलिया, चीन आणि स्कॅन्डेनेव्हीया या देशात भ्रमंती. अंतॉन चेकॉव्ह, मार्गारेट लॉरेन्स आणि जेन ऑस्टेन यांचा लेखनावर प्रभाव.
१९६० पासून मोठ्या प्रमाणात कथालेखन. ‘आद्य लघुकथाकार’ आणि ‘समकालीन लघुकथांची मास्टर’ म्हणून ओळख. अचूक प्रतिमा आणि काव्यात्म, आकर्षक आणि तीव्र कथनात्म शैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष. बंदिस्त शब्दात गंभीर आणि सखोल आशयाची अभिव्यक्ती. दैनंदिन जीवनातील भावनिक आणि गुंतागुंतीचे प्रकटीकरण करणारे अजोड कथन. नैर्ऋत्य ऑन्टॅरियोच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा वेध घेणारे एकात्मिक सादरीकरण. कथनात भूत-वर्तमान -भविष्य अशा काळाचे लवचिकतेने उपयोजन. ऑन्टॅरियो येथील त्यांच्या मूळ गावी डोंगराळ अशा ‘हरोन’ या ठिकाणी कथांचे घटीत आणि येथील रूढी-परंपरा आणि संस्कृती यांत घट्ट रुजलेली मूळं असणारी पात्रे. ‘डान्स ऑफ द हॅप्पी शेड्स’ (१९६८) या पहिल्याच बहुचर्चित कथासंग्रहाने त्यांना ‘गव्हर्नर जनरल`स ॲवार्ड’ प्राप्त झाले, कॅनेडियन साहित्यात त्यांची प्रतिष्ठा प्रस्थापित झाली. या नंतर ‘लाइव्हज ऑफ गर्ल्स अँड विमेन’ (१९७१) या संग्रहात स्त्रीच्या आत्मशोधाचा आणि सामाजिक ओळखीचा प्रवास चित्रित केला. या लघुकथांच्या एकसंधपणामुळे हे लेखन कादंबरीसारखे वाटते. ‘समथिंग आय हॅव बिन मिनिंग टू टेल यू’ (१९७४), ‘द बेगर मेड: स्टोरीज ऑफ फ्लो अँड रोझ’ (१९७८), ‘हु डू यू थिंक यू आर’ (१९७८), ‘द मून्स ऑफ ज्यूपिटर’ (१९८२), ‘द प्रोसेस ऑफ लव्ह’ (१९८६) लेखनाच्या पहिल्या टप्प्यातील या महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहेत.
लेखनाच्या नंतरच्या टप्प्यात ‘फ्रेंड ऑफ माय यूथ’ (१९९०), ‘ओपन सिक्रेट्स’ (१९९४), ‘अ विल्डरनेस स्टेशन’ (१९९४), ‘द लव्ह ऑफ अ गुड विमन’ (१९९८), ‘हेटशिप, फ्रेन्डशिप, कोर्टशिप, लव्हशिप, मॅरेज’ (२००१) ‘रनअवे’ (२००४), ‘द व्ह्यू फ्रॉम द कॅसेल रॉक’ (२००७) , ‘टू मच हॅपीनेस’ (२००९) आणि ‘डियर लाईफ’ (२०१२) यांचा समावेश. कॅनडातील लहान शहरातील स्त्रियांच्या जीवनाचे सखोल वर्णन, स्त्री जीवन, स्त्रियांच्या दृष्टिकोणातून लेखन पण स्त्रीवादी नव्हे. विशेषतः प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि कष्ट यांसह स्त्रियांचे मनोज्ञ भावविश्व हे केंद्र.एकाचवेळी उपहासगर्भ आणि गंभीर लेखन शैली. आयुष्यातील व्यामिश्रता, स्त्री-पुरुषांच्या सामान्य जीवनातील रहस्ये, आत्मीयता आणि तणाव यांसह यासंबंधांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे, आठवणींच्या माध्यमातून सामान्य जीवनातील खोलीचा अर्थशोध, जीवनेच्छा, इतिहास, कौटुंबिक समस्या, काल्पनिकतेला संशयास्पद चौकशीची किनार आणि मिळणारी अस्पष्ट उत्तरे, वास्तवापलीकडील असंख्य धुमारे, घटना, व्यक्ती आणि प्रसंग, सरळ, कंटाळवाणे पण म्हणूनच आकर्षक असणारे आयुष्य यामुळे लेखनाला विशेषत: प्राप्त. ‘द न्यूयॉर्क’, ‘द ॲटलांटिक मंथली’, ‘ग्रॅन्ड स्ट्रीट’, ‘मेडमोजले’ यासह ‘पॅरीस रिव्ह्यू’ आणि लघुनियतकालिकातून कथा प्रकाशित. तसेच सर्व लघुकथांचे संकलन खंड रूपानेही उपलब्ध. गिब्सन यांच्या ‘मेमोईर्स’ (२०११) साठी प्रस्तावना लेखन. मुलगी शेला मन्रो हिने त्यांच्या नात्याच्या संबंधाने आणि सावत्र वडील गेराल्ड फ्रेमलीन यांनी शेला हिच्यावर केलेल्या शारीरिक शोषणाच्या संदर्भाने लिहिलेले लहानपणीच्या आठवणी आणि घटनांचे पुस्तक ‘लाइव्ह्ज ऑफ मदर अॅन्ड डॉटर्स: ग्रोइंग अपं विथ ॲलिस मन्रो’ (२००२) प्रकाशित. ‘मार्था, रुथ ॲन्ड एडी’ (१९८८), ‘एज ऑफ मॅडनेस’ (२००२ ), ‘अवे फ्रॉम होम’ (२००६), ‘हेटशिप, लव्हशिप’ (२०१३) आणि ‘जुलिटा’ (२०१६) या कथांवर चित्रपटनिर्मिती.
कोलंबिया विद्यापीठ आणि क्विन्सलॅन्ड विद्यापीठात लेखक म्हणून पद. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ चे सन्माननीय सदस्यत्व, ‘रॉयल कॅनेडियन मिंट’कडून चांदीचे नाणे प्रचलित, १९९१ चे कॉमन वेल्थ रायटर्स प्राइज, १९९९ मध्ये ‘ऑथर ऑफ द यिअर’ आणि ग्रंथासाठी लिब्रीस अवॉर्ड, रॉयल सोसायटी ऑफ कॅनडा, नॅशनल आर्ट्स क्लब यांचे मेडल, २००९ चा बुकर पुरस्कार आणि २०१३ चा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. नोबेल पुरस्कार स्वीकारताना ॲलिस यांनी म्हटले होते, ‘‘मी माझ्या प्रदेशाबद्दल लिहिले, पण त्या कथांमध्ये जगभरातील लोक स्वत:ला ओळखतात. हेच लेखनाचं सामर्थ्य आहे.’’ या विधानावरून ॲलिस यांच्या एकूणच लेखनाचे विशेष कळतात. स्वीडिश अकादमीने त्यांचे वर्णन ‘आधुनिक लघुकथांची मास्टर’ असे केले आहे. ॲलिस यांनी लघुकथा या साहित्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे नाव अंतॉन चेकॉव्ह यांच्या बरोबरीने घेतले जाते. जगभरातील भाषांमध्ये त्यांच्या कथांचे अनुवाद झाले आहेत. त्यांचे साहित्य ‘मौल्यवान कॅनेडियन संपत्ती’ म्हणून कॅनडाद्वारे घोषित.
कॅनडा येथील पोर्टहोप ऑन्टॅरियो येथे कॅन्सरने निधन.
संदर्भ :
- Alice Munro – Facts. NobelPrize.org. Nobel Prize Outreach 2025. Tue. 14 Oct 2025. https://www.nobelprize.org/prizes/literature/2013/munro/facts/
- Thacker, Robert. Alice Munro: Writing Her Lives – A Biography, Toronto: McClelland & Stewart, 2005.
- York, Lorraine. Alice Munro and the Anatomy of the Everyday, Journal of Canadian Studies 24, no. 1 (1989): 72–88.
समीक्षक : गणेश सावजी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.